व्याख्यानमाला-१९८९-३२

जोतिराव फुले खंडबडून समाजाला जागे करतात. हे चालणार नाही म्हणून सार्वजनिक सत्यधर्माचा सुंदर विचार जर कोणता असेल तर तो हा स्त्री-पुरुष समानतेचा विचार आणि पुरुषाच्या मानाने स्त्रियांजवळ संस्कृती असते. त्या सोशिक असतात म्हणून स्त्रियांच्यासाठी एक विशिष्ट विचार करण्याची पद्धत जोतिराव फुल्यांनी पहिल्यांदा भारतीय समाजात प्रस्थापित केली.नाही तर आमच्या इतिहास काळामध्ये आमच्या प्रत्ययाला काय येतं गार्गी आहे, लोपामुद्रा आहे, मैत्रेयी आहे, मंडनमिश्रची पत्नी सरस्वती आहे. चार-पाच नावं स्त्रियांची घेतली की संपला आमचा स्त्रियांचा इतिहास, मग दुसरा इतिहास सुरु होतो. हेमामालिनी आहे, श्रीदेवी आहे. चिक्कार आहेत. नंतर आपले टी. व्ही. वाले आहेत. सिनेमावाले आहेत ते आपल्यावर फार प्रेम करतात आपल्या पैशावर फार प्रेम करतात.

जोतिराव फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्म सांगत असतांना सोप्या सोप्या पद्धतीनं मानवी जीवनातील सुंदर आशय, त्या सुंदर आशयाच्या छान छान छटा, त्याचं एक वेगळेपण, वैविध्य आणि मानवी जीवनाला सर्व संपन्न सर्वांग सुंदर बनण्यासाठी लागणारा नियमांचा अतिशय मौल्यवान भाग आपण याला म्हणू समान संधीचं तत्त्वज्ञान आमच्या राज्यघटनेमध्ये आहे. "सार्वजनिक सत्यधर्मामध्ये' जोतिराव फुल्यांनी समान संधीचं तत्त्वज्ञान सांगीतलं आहे. सामाजिक सहिष्णुतेचं तत्व सांगीतलं आहे. धार्मिक सहिष्णुतेचं तत्त्व सांगीतलेलं आहे. एवढेच नव्हे तर सार्वजनिक सत्यधर्मामध्ये जोतीराव फुल्यांनी वैचारिक स्वातंत्र्याचा आग्रह धरलेला आहे. आणि हा वैचारिक स्वातंत्र्याचा आग्रह स्त्री-पुरुषांना लागू आहे. प्रत्येकाला आपल्या मतानुसार, विचारानुसार, बुद्धीनुसार विचार मांडण्याचं, व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. सार्वजनिक सत्यधर्माचं हे सूत्र आहे.

सत्यवर्तन करणा-याविषयी नियम खालीलप्रमाणे - १ ते ३३ नियम

१. आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणीमात्रास उत्पन्न केले. त्यापैकी स्त्री-पुरुष हे उभयता जन्मत:च स्वतंत्र व एकंदर सर्व अधिकारांचा उपयोग घेण्यास पात्र केले आहेत, असे कबूल करणारे, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.

२. स्त्री असो अथवा पुरुष असो, ते आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्यांने या विस्तीर्ण पोकळीतील निर्माण केलेल्या अनंत सूर्यमंडळासह त्यांचे ग्रहोपग्रहास अथवा एखाद्या विचित्र ता-यास अथवा एखाद्या धातू दगडाच्या मूर्तीस निर्मिकाच्या ऐवजी मान देत नसल्यास, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.

३. आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने निर्माण केलेल्या एकंदर सर्व वस्तूंचा यच्चयावत प्राणीमात्रांस उपभोग घेऊं न देता, निरर्थक निर्मीकास अर्पण करुन त्याचे पोकळ नामस्मरण जे करीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.

४.  आपण सर्वांच्या निर्माणकर्त्याने निर्माण केलेल्या एकंदर सर्व प्राणीमात्रांस समस्त वस्तूंचा यथेच्छ उपभोग घेऊन त्यांस निर्मीकाचा आभार मानून त्याचे गौरव करु देतात, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
५. विश्वकर्त्याने निर्माण केलेल्या प्राणीमात्रांस जे कोणी कोणत्याही प्रकारचा निरर्थक त्रास देत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.

६. आपल्या सर्वांच्या निर्मीकाने एकंदर सर्व स्त्री-पुरुषांस, एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहेत. त्यातून एखादा मानव अथवा काही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तीवर जबरी करु शकत नाही व त्याप्रमाणे जबरी न करणारास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.

७. आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व मानव स्त्री-पुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे, ज्यापासून दुस-या एखाद्या व्यक्तीस कोणत्याही त-हेचे नुकसान करता येत नाही, अथवा जे कोणी आपल्यावरुन दुस-या मानवाचे हक्क समजून इतरांस पीडा देत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.

८. आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणीमात्रांस निर्माण केले आहे. त्यापैकी हरएक स्त्रीने एका पुरुषांस मात्र आपला भ्रतार करण्याकरिता वजा करुन, तसेच हरएक पुरुषाने एक स्त्रीस मात्र आपली भार्या करण्याकरिता वजा करुन, तसेच हरएक पुरुषाने एक स्त्रीस मात्र आपली भार्या करण्याकरिता वजा करुन एकंदर जे सर्व स्त्री-पुरुष एकमेकांबरोबर मोठ्या आवडीने बहीण भावंडाप्रमाणे आचरण करतात, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org