व्याख्यानमाला-१९८९-२७

व्याख्यान दुसरे - दिनांक १३ मार्च १९८९

शहरातील रसिक मित्रांनो ! काल महात्मा  जोतिराव फुले यांच्या संदर्भातील सामाजिक विचार आणि त्यांची सामाजिक या बाबतीतले काही विचार मी आपल्यासमोर ठेवले. यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेत हा विषय मांडत असतांना आणि आजच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक संदर्भात जोतिराव फुल्यांच्या विचारांचं मूल्यमापन करीत असतांना एक भान सदैव डोक्यात ठेवावं लागतं ते हे की जोतिराव फुल्यांच्या विचारांची परिपूर्ती आजही व्हायची राहिलेली आहे. यशवंतराव चव्हाण एक महाराष्ट्रातील असे नेते होते की, ज्यांच्या विचारावर सत्यशोधकी चळवळीचा आणि आंबेडकरी चळवळीचा खोलवर असा परिणाम आणि प्रभाव पडलेला होता. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात राहूनसुद्धा गरिबांचे नुकसान होईल असे निर्णय त्यांनी कधी घेतले नाहीत. यशवंतराव सर्व कांही होते पण यशवंतराव गरिबांचे शत्रू नव्हते. या संदर्भात मी शेवटचा संदर्भ बोलतांना बोलेन.

आज एका विशिष्ठ स्वरुपाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय पार्श्वभूमीवर आपण जोतिराव फुले यांच्या विचारांच परिशीलन करीत आहोत. आजचे सामाजिक संदर्भ त्यासाठी आपण तपासून घेत आहोत. हा एका पद्धतीने सत्यशोध आहे. सत्यज्ञान समजून घेण्याचा हा आपला एक प्रयत्न आहे. सत्यवर्तनासाठी आज जोतिराव फुल्यांच्या विचारांची आवश्यकता किती आहे हे सुद्धा समजून घेणे गरजेचे आहे. आणि म्हणून या संबंध १९५६ पर्यंतच्या क्रांतीकारी टप्प्यांचा अभ्यास करतांना १९५६ नंतरचं महाराष्ट्रातील देशातील चित्र पाहू नका. मी एक जर विधान केलं तर ते अनाठायी ठरणार नाही. विपर्यस्त मुळीच ठरणार नाही. की, यशवंतराव चव्हाणांनी राजकारणासारख्या धकाधकीच्या आणि काँप्रोमायझिंग अप्रोच घ्यावा लागणा-या क्षेत्रामध्ये राहूनसुद्धा जेवढया प्रमाणात या चळवळीतील मूल्यांना जोपासता येईल तेवढ्या पद्धतीने जोपासलं मी संपादित केलेला. 'युगंधर नेते : यशवंतराव चव्हाण'  हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये माझी कविता समाविष्ट केलेली आहे. आणि यशवंतराव तुम्ही म्हणून त्यातल्या चार ओळी आजचं व्याख्यान सुरू होण्याच्या अगोदर मी म्हणून दाखविल्या तरी या यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेमध्ये अनाठायी ठरणार नाहीत.

'प्रीतिसंगम' आजही गातो, त्या कर्तृत्वाची यशोकहाणी ।
कोयना-कृष्णेच्या शिवारातून, ओठात फुलते हिरवी राणी ।।
यशवंतराव ! आजही वहाते, मळ्यात माझ्या गोदा कृष्णेचं पाणी ।
आवाजच नेत्यांचे जायबंद झाले, कुठे शोधावी तुमची वाणी? ।।
आज तयांचे बाजार झाले, आणि मने देतात ग्वाही ।
यशवंतराव तुम्ही 'यशवंत' च, ऐसा नेता होणे नाही ।।

ही कविता त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून मी आपल्यासमोर म्हणून दाखविली. आज जोतिराव फुल्यांच्या 'शेतकरी आसूड' मधील काही विचार, हंटर कमिशनला सादर केलेल्या शैक्षणिक बाबासंबंधी त्यांनी जो विचार मांडला त्या संदर्भातले काही विचार  आणि त्यानंतर आजचे सामाजिक संदर्भ याचं थोडक्यात विवेचन मी आपल्या समोर करणार आहे. त्या अगोदर आपल्याला जोतिराव फुले यांच्या कार्याची थोडीशी ओळख व्हावी म्हणून थोडक्यात त्यांच्या कामाची यादी मी आपल्याला वाचून दाखवितो. म्हणजे नंतर आपल्याला कांही मुद्दे समजून घ्यायला सोपे पडेल.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org