व्याख्यानमाला-१९८९-२४

त्या काळातल्या आमच्या ब्राह्मण लोकांचं पाश्चिमात्यकरण सुरूं झालं. म्हणजे तो डायनिंग टेबलवर जेवू लागला. पाटावरचं जेवण संपलं, रामराम संपला, नमस्कार संपला-गुडमॉर्निंग आलं, गुड इव्हिनिंग आलं, वेस्टर्नलायझेशन आलं. आपली भाषा बोलणं अपमान वाटू लागला. गुड मार्निंग-गुड इव्हिनिंग म्हटलं की कल्चर चेंज वाढतो. त्याचं वेस्टर्नंलायझेशन झालं आणि त्यांच्या जवळच्या ज्या जाती होत्या. मराठा, माळी, तत्संबंधी त्यांचं ब्राह्मणायझेशन झालं. आणि मग हा सगळा उच्चभ्रूवर्ग आता त्यांच्यात एकटा ब्राह्मण वर्ग नाही. सगळ्या समाजातील शिकलेले लोक कोजागिरी पौर्णिमेचे दिवशी दूध गोळा करतात. गच्चीवर जातात चांगल दूध गोठवतात आटवतात. बरोबर रात्रीचे बारा वाजलेलें असतात. चंद्रडोक्यावर असतो. चंद्राचं प्रतिबिंब दुधात पडतं. तोपर्यंत वाट पाहतात आणि एकदा चंद्राचं प्रतिबिंब दुधात पडलं तर प्या. मी जेव्हा पाहतो हे, तेव्हा मला आठवतं की १९ जुलै १९६९ ला नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पोहोचला, रशिया चंद्रावर पोहाचला. आम्ही भारतीय माणसं एवढी हुशार, कोजागिरीचा चंद्र आमच्या दुधात, दूध आमच्या पोटात, पोट आमचं खाटेवर मुक्काम पोष्ट औरंगाबाद आणि 'परत' ठेविले अनंते तैसेची रहावे । चित्ती असू द्यावे समाधान ।।

मित्र हो, ही मानसिकता आहे. जोतिराव फुल्यांनी आमच्या समाजाच्या हाडामासाचा भाग झालेली ही जी रुढीशरण मानसिकता आहे, ती मानसिकताच बदलायची चळवळी उभी केली. ही मानसिकता बदलली पाहिजे. या माणसाच्या पायातील रूढीच्या बेड्या तोडल्या पाहिजेत. त्याला अंधश्रद्धेच्या चिखलातून वर  उचललं पाहिजे आणि त्याला ज्ञानाच्या रस्त्यावर नेलं पाहिजे. अशा प्रकारची एक मानवकल्याणवर्धक चळवळ उभी केली आणि आमचा भारतीय समाजाचा परत परत जो राजकीय पाडाव झाला, परत परत जी आम्हाला राजकीय गुलामगिरी स्वीकारावी लागली त्याचं कारण आमच्या समजात आलेली विषमता, आमच्या समाजात आलेलं अज्ञान, आमच्या समाजात आलेली रुढी-शरणवृत्ती, आमच्या समाजात अंध:श्रद्धा, स्त्रीदास्य, निरक्षरता हे सबंध कॅन्सरसारखे रोग आमच्या भारतीय समाजाला आतून पोखरत होते आणि बाहेरून येणा-या मूठभर आक्रमक डोळ्यांसमोर आमचा समाज राजकीय दृष्ट्या पुन्हा पुन्हा कोलमडत होता. पराभूत होत होता.

इतिहास बघा आपला, खैबर खिंडीतून आमच्याकडे कोण कोण आलेले आहेत. तुर्क आले, कुशाण आले, मोगल आले, लोदी आले, गझनी आले, घोरी आले, इराणी-तुराणी आले, पठाण आले. इकडून समुद्रमार्गाने पोर्तुगीज आले, इंग्रज आले, डच आले, फ्रेंच आले, आम्ही मात्र कुठे गेलो नाही. का? समुद्र पर्यटन पाप. गेलो नाही आम्ही का ? ठेविले अनंते तैसेची  रहावे इतकंच. तेहतीस कोटी इथंच, नीळकंठाराव खाडिलकर म्हणाले की "चातुर्वण्याला मी ब्राह्मणांची रोजगार हमी योजना म्हणतो" मी मोठ्या माणसाचा आधार देतो. या ब्राह्मणांच्या रोजगार हमी योजनेला जोतिराव फुले यांनी विरोध केला.

सामान्य माणसाला जीवनाची हमी नाही. मग तुम्हाला रोजगार हमी कशाला? हा त्यांचा सवाल. तुम्ही भूदेव कशासाठी? तर सर्वसामान्य माणसाला संस्कृत भाषा येत नाही म्हणून ! तुम्ही श्रेष्ठ कशासाठी? तुम्हाला वेद वाचता येतात म्हणून ! आणि तो शूद्र अतिशूद्र का? त्याला काहीच येत नाही म्हणून. जो तुमच्या अंगातलं रक्त होणा-या अन्नाला निर्माण करतो, त्याला तुम्ही शूद्र म्हणता ? जी स्त्री तुमच्या समाजाला सभासद पुरविते तिला शूद्र म्हणून अवहेलना करता ! तिची निंदा करता ! एकोणिसाव्या-विसाव्या शतकामध्ये मनुस्मृतीचे गोडवे गाता ? संपून गेलेल्या समाजव्यवस्थेला परत मांडायचा प्रयत्न करता? आणि म्हणून जोतिराव फुल्यांच्यावर चिखलफेक करता? जो महात्म्यांचा महात्मा शोभावा इतका माणूसपणाच्या बाबतीमधला उत्तुंग कीर्तिचा माणूस. तु्मही तुमच्या जातीचं तक्त सोडायला आजही तयार नाही ? सर्व जातींना समानतेची वागणूक द्या म्हणणारा जोतिराव फुले त्यांच्यावर चिखलफेक आता चालणार नाही.

महाराष्ट्रात आता जोतिराव फुल्यांचा पुतळा उखडून टाकू म्हणणाराचे हात सामान्य माणसे वरच्यावर फेकून देतील. चालणार नाही. बदललं पाहिजे. नवा समाज येवू लागलेला आहे. गांव तिथं शाळा पोहोचलेली आहे, नवा तरुण निर्माण होत आहे. कृपा करुन रथाची चाके मागे ओढू नका. घड्याळाचे काटे मागे सरकविण्याचा प्रयत्न करु नका. कोणाला शूद्र म्हणू नका. असा सांगणारा महात्मा आमच्या महाराष्ट्रात झाला. या देशात झाला. हा विचार नव्हता. नव्या माणूसपणासाठी लागणारं हे आमचं रक्त होतं. माणसाचं शरीर जिवंत राहण्यासाठी ताजं रक्त लागतं माणसाला. पण माणसाचं मन जिवंत राहण्यासाठी त्याला विचाराचं रक्त लागतं. त्याला अश्रूंची भाषा माहित पाहिजे. जोतिराव फुल्यांनी स्त्री शोषणाच्या दु:खाचा दर्या आपल्या अक्षरातून, आपल्या शब्दातून, गुलामगिरी मधून तुमच्यासमोर आमच्यासमोर मांडला. दलित शोषित माणसाच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा-कैफिकत त्यांनी आपल्यासमोर मांडली. जे शोषण करीत होते, त्यांच्यासाठी जोतिराव फुले लिहीत होतेच पण त्याचबरोबर ज्यांचं शोषण होत होतं त्यांच्यासाठी ज्यास्त लिहीत होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org