व्याख्यानमाला-१९८९-२१

हा तुमचा सारा जो पैसा आहे तो सामान्य माणसाच्या अश्रूंच, घामाचं फळ आहे, जोतिराव फुल्यांचा हा विचार आहे. इंग्रजांना सुद्धा त्यांनी मोकळं सोडलेलं नाही. पण पुरोहितशाहीच्या जागी नवशिक्षित ब्राह्मणांचीच नोकरशाही जेव्हा आली. दोन्हीही व्यवस्थेचं उद्दिष्ट काय होत "शोषण" शेतक-यांच्याकडून पैसे घेतले जायचे.  त्यांची पिळवणूक केली जायची. म्हणजे पुरोहितशाहीच रुपांतर भारतीय नोकरशाहीत झालं. इंग्रज आल्यानंतर तर ते दुहेरी पातळीवर शोषण चालू राहिलं. म्हणून जोतिराव फुल्यांनी या दोन्ही व्यवस्थेला विरोध केलेला आहे. आणि म्हणून पेशवाईच्या अस्तानंतर एकदर देशात जे नवजीवनांचं वार वाहू लागलं त्या नवजीवनाच्या चळवळीशी जोतिराव फुल्यांनी आपला संबंध ठेवला.

त्यावेळी महाराष्ट्रामध्ये किती चळवळी चालू आहेत ते बघा. जोतिराव फुले चळवळ चालवतात आगरकर चळवळ चालवतात. ती कुठली चळवळ आहे. नवभारताची चळवळ आहे. टिळक आणि चिपळूणकर जी चळवळ चालवतात ती कुठली चळवळ आहे. ती पुनरुज्जीवनाची चळवळ आहे. महादेव गोविंद रानडे भांडारकर वगैरे जी चळवळ चालवितात ती उदारमतवादी चळवळ आहे. धर्मसुधारणा झाली पाहिजे, समाज सुधारणा झाला पाहिजे, पण फुले म्हणाले नाही. सगळी व्यवस्थाच बदलली पाहिजे. उदारमतवाद नाही. जोतिराव फुले उदारमतवादाच्याकडून, सुधारणावादाच्याकडून ते क्रांतीवादापर्यंत गेले.

ते क्रांतीकारी होते की नाही, परत चर्चेचा विषय. कारण दक्षिण अमेरिकेचा शिक्षण तज्ञ 'पावलो फिअरी' असं म्हणाला "Education is a political action" अतिशय चांगला विचार मांडला पावलो फ्रिअरीनी उद्याच्या भारतीय समाजाची रचना कशी पाहिजे तर ती ज्ञानावर अधिष्ठित  पाहिजे. तळागाळातल्या माणसापर्यंत ज्ञान जर गेलं नाही तर तो पॉलिटिक्स करणारच नाही.  Education is a Political action. अमेरिकेचा शिक्षण तज्ञ जॉन ड्यूई म्हणाला 'Thinking is Porblem solving' विचार करणं म्हणजे प्रश्न सोडविणं "Education is a Promotion" बढती मिळेल पुढे जा ! यशवंतराव चव्हाण काय म्हणाले आमच्या देवगिरी व्याख्यानमालेत येवून "शिक्षणानं माणूस नवीन होतो" यशवंतराव अधून मधून मजबूत विचार बोलायचे, सोप्या शब्दांत बोलायचे शिक्षणाने माणूस नवीन होतो. ताजा टवटवीत प्रसन्न होतो. सावित्रीबाई फुल्यांनी काय म्हटलेलं आहे. त्यांनी आपल्या कवितेमध्ये फार चांगला विचार मांडलेला आहे -

"माझ्या जीवनात जोतीबा स्वानंद । जैसा मकरंद कळीतला ।।
विषम रचती समाजाची रीती । धूर्ताची ही नीती अमानव ।।
शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा ।
शिक्षणाने मनुष्यत्व, पशुत्व हाटते पहा ।।
विद्येविण गेले वाया गेले पशू । स्वस्थ नका बसू विद्या घेणे ।।
शूद्र अतिशूद्र दु:ख निवाराया । इंग्रजी शिकाया संधी आली ।।
इंग्रजी शिकूनी जातीभेद मोडा । भटजी भारुडा फेकूनिया ।।
जोतीबाचा बोल मनात परसा । जीवाचा आरसा पहाते मी ।।
वाचे जे उच्चारी तैसा क्रिया करी । तीच नर-नारी पूजनीय ।।
मानवाचे नाते ओळखती जे ते । सावित्री वदती तेच संत ।।
- सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई वदती, मी तुम्हाला यासाठीच त्या कवितेचा उतारा वाचून दाखविला बी. एड्. होणा-या आमच्या शिक्षकाला ही व्याख्या माहित नाही. "शूद्रांना सांगण्याजोगा शिक्षण मार्ग हा ।। शिक्षणाने मनुष्यत्व, पशुत्व हटते पहा ।। जॉन ह्युईची व्याख्या माहित असेल, पॉवलो फिअरीची व्याख्या माहित असेल, पण गाडगे महाराजांची व्याख्या मात्र आमच्या बी. एड्. च्या माणसाला माहित नाही. गाडगे महाराज काय म्हणाले - "शिक्षणाशिवाय माणूस म्हणजे निव्वळ धोंडा." सोपं बोलले विचारवंत नव्हते. 'शिक्षणाशिवाय माणूस म्हणजे निव्वळ धोंडा हे समजलं महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या सामान्य माणसांना,  भाषाप्रभू नव्हते ते, तरी लाखो माणसांना तीन तीन तास आपल्या किर्तनामध्ये ते रंगून ठेवायचे आणि त्यातून समाजप्रबोधनाचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये पेरायचा.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org