व्याख्यानमाला-१९८७-२ (5)

धर्माचे स्वरूप  
आजवर धर्मसंकल्पनेची चर्चा विपुल प्रमाणात झालेली आहे. अनेकांनी तर धर्म म्हणजे काय हे नेमके सांगण्याऐवजी धर्म म्हणजे काय नाही हे विस्ताराने सांगितलेले आहे. आपल्याकडे ‘ धारयति स: धर्म:’ अशी धर्माची एक प्रसिध्द आणि मान्यताप्राप्त व्याख्या आहे. जो समाजाची धारणा करतो त्याला धर्म असे म्हणतात असे ही व्याख्या आपल्याला सांगते. धर्माने आजवर समाजाची धारणा केली हे तर खरेच परंतु धर्माने व्यक्तीसाठी काहीच केले नाही का ? असा एक प्रश्न या ठिकाणी उभा करता येईल. धर्माला ज्या वेळी समाज धारणेचे प्रयोजन चिटकविण्यात येते, त्यावेळी या धर्माला आपण कायद्यांचे, नियमांचे, अमूक करा आणि तमूक करू नका या प्रकारच्या आज्ञांचे रूप देत असतो. कारण समाजाची धारणा या कायद्यांच्या, नियमांच्या आणि आज्ञांच्या शिवाय होवूच शकत नाही. कारण समाज हा केवळ व्यक्तींचा समूह नसतो तर विशिष्ट उद्देशाने एकत्रित आलेल्या व्यक्तींचा समूह असतो. आणि ही उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी समाजबंधनांची आवश्यकता असते. ही व्याख्या आपल्याला समाजबंधने म्हणजेच धर्म आहे असे सांगते. लोकमान्य टिळकांनी म्हणूनच ‘ गीता रहस्यात ’ धर्म आणि कर्म यांच्यात अभेद मानला आहे आणि आंबेडकरांनी हिंदू धर्म हा आज्ञांचा एक समुच्चय आहे अशी त्यावर कडवट टीका केलेली आहे. तरी सुध्दा आंबेडकरांनी समाजधारणेसाठी धर्माची आवश्यकता नाकारलेली नाही. परतु टिळकांच्या समाज धारणेच्या स्वरूपात आणि आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या समाजधारणेच्या स्वरूपात आमूलाग्र फरक आहे. हा तपशिलाचा मतभेद आहे. मूळ प्रश्न धर्म समाजाची धारणा करण्यास आवश्यक आहे की नाही हा आहे. या प्रश्नाचे उत्तर आजवर परस्पर विरूध्द विचारांच्या विचारवंतांनी सुध्दा ‘होय’ असेच दिलेले आहे. याचे कारण मला वाटते धर्मसंकल्पनेच्या सामर्थ्याची त्यांना जी जाणिव झाली त्या जाणिवेत असावे. मला स्वत:ला धर्माची ही व्याख्या परिपूर्ण वाटत नाही म्हणजे या व्याख्येतून धर्माचे अंतरंग उलगडत नाही. त्याच्या अंतर्यामी असलेल्या सामर्थ्याची कल्पना येत नाही. या व्याख्येतून फार तर मानवी समाजाच्या विकासाबरोबरच आपल्याला धर्मसंस्थेचा विकासही स्पष्ट होतो. म्हणूनच अनेक विचारवंत धर्माचा दोन पातळ्यावर विचार करीत आलेले आपल्याला दिसतात. एक विचार व्यक्तीच्या पातळीवरचा आहे तर दुसरा समाजाच्या. त्यांच्या मताप्रमाणे आजवर धर्माने विविध बंधनांच्या सहाय्याने जशी समाज धारणा करून समाज विकासाच्या विविध टप्प्यात स्वत:ला सतत बदलवीत आणले आहे तसे धर्माने व्यक्तीला सम्यक समाधीही प्राप्त करून दिली आहे. या व्यक्तींची संख्या लहान असेल. त्यांना अपवादात्मक व्यक्तीही म्हणता येईल. परंतु समाज धारणेशिवाय धर्म अधिक काही करूच शकत नाही असे मानले तर व्यक्तीच्या अंतर्मनात धर्म जी खळबळ माजवतो, व्यक्ती आपल्या मनाशी आणि बाह्य वास्तवाशी जो संघर्ष आणि संवाद करते त्या खळबळीची आणि संघर्ष संवादाची उपेक्षा होईल. म्हणून ते आपल्याला बुध्द आणि महावीर, कबीर आणि तुकाराम यांच्या सारख्या व्यक्तींच्या जीवनाची उदाहरणे देतात. व्यक्तीचा समाजाचा एक घटक म्हणून एक अविभाज्य भाग म्हणून तिच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनाचा सुटा विचार करणे केवळ अशक्य आहे हे तर खरेच. परंतु प्राप्त परीस्थितीशी, दु:खमय जीवनाशी त्यांच्यात राहूनही अलिप्त होण्याची शक्ती माणसाला मिळविता येते असा त्यांचा दावा आहे. म्हणूनच धर्म ज्या प्रमाणे समाज धारणा करणारी एक संहिता असतो त्याच प्रमाणे व्यक्तीने स्वत:चा शोध घेण्याच्या, आपल्यात असलेल्या सामर्थ्याचा जर पुरेपूर उपयोग केला तर त्याला ते आत्मभान प्राप्त होवू शकते एवढेच त्यांचे म्हणणे आहे. या आत्मभानाच्या प्रवासाला ते ‘धर्म’ ही संज्ञा देतात.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org