व्याख्यानमाला-१९८७-२ (37)

आज आपण मध्ययुगातला कोणत्याही समाजाचा इतिहास वाचू लागलो तर आपल्याला असे दिसते की मध्ययुगीन माणसे फार धार्मिक होती असेच आपल्या मनावर बिंबते. त्याचप्रमाणे या इतिहासात मध्ययुगीन राजघराण्यातील प्रमुख व्यक्तींच्या हालचालीच्या नोंदींचा, त्यांच्या ऐश्वर्याचा आणि त्यांनी गाजविलेल्या शौर्यांच्या कथाच  आरल्याला वारंवार दिसतात. त्यामुळे मध्ययुगीन जीवन म्हणजे धार्मिकता आणि शौर्य यांचे मिश्रण आहे अशीच सर्वसाधारण वाचकांची समजूत होते. सामान्य माणसांच्या जीवनात ज्या वेळी बाकी कशातही रस रहात नाही. माणसे गांजलेली असतात आणि करण्यासारखे त्यांच्याकडे काहीही नसते त्यावेळी असे इतिहास त्यांना भारावून टाकतात. इतिहासात, भूतकाळात रममाण होतात. परंतु मध्य युगाचे हें धार्मिकता आणि शौर्याचे  मिश्रण असलेले रूप आपल्यासमोर येते कसे ? ते तसेच का आणले जाते ? याचे प्रमुख कारण आपले इतिहास लेखन करणारे इतिहासकार ज्या बखरकारांच्या बखरीतून ऐतिहासिक घटना शोधतात ते बखरकार आहेत. या बखरकारांच्या बखरींचा जर चिकित्सकपणे अभ्यास केला नाही तर यापेक्षा वेगळे चित्र आपल्यासमोर उभेच राहू शकणार नाही. या संदर्भात एक महत्वाची गोष्ट आपल्याला कायम ध्यानात ठेवणे आवश्यक आहे आणि ती म्हणजे हे सारे बखरकार एक तर मध्ययुगीन धर्मसंस्थेशी एक पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून निगडीत होते किंवा ते एखाद्या राजघराण्यातील एकाद्या गटाचे मानकरी तरी होते. त्यामुळेच सा-या लिखाणाचा केन्द्र बिंदू एकतर धर्म- संस्था तरी असतो किंवा राजघराण्यातील एखादा हितसंबंधी गट तरी असतो. यांचा परिणाम अटळपणे असा झालेला आहे की, त्यांच्या लेखनात धर्मसंस्थेभोवती त्यांनी गुंफण केलेली दिसते. त्याचप्रमाणे त्यांचे सारे लेखन आपल्या गटातील राजा राणी आणि त्यांचे सरदार, त्यांचे ऐश्वर्य, आणि त्यांच्या वंशावळीवरच केन्द्रीत होते. हे सारे लेखन किंवा अप्रत्यक्षपणे राज दरबाराशीच संबंधित असते. म्हणून मध्ययुगाचा जो इतिहास आपल्याला आज उपलब्ध आहे तो बहुतांश संपूर्ण समाजातील एका अतिशय छोट्या गटाभोवती फिरणारा आहे. समाजातील या फार लहान वर्तुळाचा हा इतिहास आहे. याच्या वाचनाने सामान्य वाचकाची दिशाभूल होते. या छोट्या गटाच्या इतिहासावरून संपूर्ण समाजाचा इतिहास असाच ऐश्वर्याने भरलेला होता असा त्याचा समज होतो. कारण तो या छोट्या गटाचा इतिहास म्हणजेच संपूर्ण समाजाचा इतिहास आहे असे मानतो. हा इतिहास धर्मसंस्था आणि राजघराण्याभोवतीच फिरत राहिल्याने आपल्याला त्या काळातल्या कोट्यावधी मानव समूहाचे जीवन कसे होते हे समजूच शकत नाही. आपल्याला शिवाजी – संभाजी माहीत आहेत. परंतु त्यांच्या राज्यारोहणासाठी जी हजारो सामान्य माणसे आपल्या प्राणांना मुकली त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. तान्हाजीने उद्यभानूशी लढतांना जो त्याग केला तेवढाच आपल्याला माहीत आहे परंतु तान्हाजी आणि त्याचे अनेक साथीदार मावळे डोंगर कुशीतील ज्या झोपड्यामध्ये रहात होते. त्यांच्याबद्दल आपण काहीच जाणीत नाही. ते कायखात होते, त्यांचे कपडे कसे होते, त्यांच्या शेतात काय पिकत होते, त्यांचे जीवन कसे होते याबद्दल आपण फारसे काही सांगू शकत नाही. असे का होते तर आपण राजा राण्यांचा इतिहास म्हणजेच या सामान्य माणसांचा इतिहास मानतो. वस्तुत:तो तसा नसतो. सामान्यांची सुखदु:खे, त्यांचे संसार आणि त्यांचे कामजीवन राजे – राण्यांची सुखदु:खे त्यांचे संसार आणि त्यांचे कामजीवन यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. म्हणूनच मध्ययुगाचा पाश्चात्य इतिहासकार प्रा. बारक्लफ हा या मध्ययुगीन इतिहासाबद्दल अतिशय सूचक उद्गार काढतांना दिसतो. तो म्हणतो “ आपण जो इतिहास वाचतो तो जरी वास्तव घटनामच्यावर उभा असला तरी, काटेकोरपणाने बोलायचे ठरले तर तो अजिबात वास्तविक नसतो. तर तो स्वीकृत निर्णयांची, अँक्सेप्टेड जजमेंटची शृंखला असतो एका अर्थाने मध्य युगाचे जे चित्र इतिहास वाचून आपल्यासमोर उभे रहाते ते इतिहासकारांना आपल्यासाठी आधीच निवडलेले, प्रिसिलेक्टेड आणि पूर्व नियोजित प्रडिटर्मिन्ड असते.”

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org