व्याख्यानमाला-१९८७-२ (35)

घटनांचे मूल्यमापन
या विवेचनावरून आपल्यासमोर इतिहास लेखनासंबंधी जो प्रश्न निर्माण झालेला आहे, तो हा की, गतेतिहासातील असंख्य घटनांच्यामधून काही निवडक घटनाच इतिहासकार आपल्या लेखनात लेखनात का निवडतो. त्या निवडण्यासाठी त्याच्याकडे काही कसोट्या आहेत का ? इतिहासकार इतिहासलेखन करतांना घटनांची निवड कशावरून करतो ? त्याचे उगमस्थान कोठे असते ? आपले बरेचसे इतिहास लेखन आपण काळजीपूर्वक पाहिले तर आपल्याला असे दिसेल की, या घटना शोधण्याचे आपल्या इतिहासकारांचे मुख्य ठिकाण आहे ते जुने दस्तऐवज, रेकॉर्ड. त्यानंतर आपल्या इतिहासकारांनी धर्मग्रंथांच्या नावानी आजवर जे लिहिले गेलेले आहे त्याचाही भरपूर उपयोग केलेला आहे. इतिहास लेखनात या ऐतिहासिक घटनांचे आणि जुन्या दस्तऐवजांचे फार महत्व आहे. परंतु केवळ ऐतिहासिक घटना आणि जुन्या कागदपत्रांचे दस्तऐवज स्वत:च इतिहास बनवीत नसतात. ते काम तर इतिहासकारांचे आहे. त्यालाच या ऐतिहासिक घटना शोधून काढायच्या असतात आणि जुनी कागदपत्रे धुंडाळायची असतात. परंतु या जुन्या कागदपत्रात घटनांच्या ज्या नोंदी असतात त्या तरी विश्वसनीय असतात का ? या नोंदी करणा-या लेखकांचे त्या घटनांच्याकडे बघण्याचे दृष्टीकोण समजावून घेतल्याशिवाय त्या नोंदीतील सत्यासत्यता कशी समजेल ? आपल्याकडे या नोंदींनाच इतिहासाची अस्सल साधने समजण्याची प्रथा दीर्घकाळ होती. त्यामुळे राजवाडे वगैरे इतिहास संशोधकाकडूनही इतिहास लेखनात आणि सामाजिक प्रश्नावर विशिष्ट भूमिका घेण्यात प्रचंड घफलती झालेल्या आहेत. शिवचरित्रातील वाकेनशी टिपण हे त्याचे उत्तम उदाहरण सांगता येईल. त्याच प्रमाणे इतिहासकार जे जुने कागदपत्र वाचण्याचा प्रयत्न करतो, त्यातून ऐतिहासिक घटना शोधण्याचा प्रयत्न करतो ती कागदपत्रे तरी त्याला नीट समजलेली असतात का ? निदान त्या कागदपत्रातील विशिष्ट नोंदी करीत असतांना त्यांच्या लेखकांनी त्यासंबंधी स्वीकारलेली भूमिका तरी या इतिहास लेखकांना माहित असते का ? याबद्दल वाद होऊ शकतो. परंतु बहुतांश इतिहासलेखनात ही समज शंकास्पद दिसते. जुने कागदपत्र वाचतांना ते इतिहासकारांना नीट न समजल्यामुळे अनेक घोटाळे झालेले आहेत. सेतु माधवराव पगडी यांनी त्यापैकी काही दाखवून दिलेले आहेत. त्याना त्यांनी ‘ इतिहास संशोधनातील विनोद ’ म्हटलेले आहे. परंतु या गोष्टी इतिहास लेखनाच्या संदर्भाने अतिशय गांभिर्याने घ्यावयाच्या असतात. हे घोटाळे केवळ दुय्यम दर्जाचे इतिहासकारच करतात असे नाही तर पहिल्या दर्जाच्या मानल्या गेलेल्या इतिहासकाराकडूनही ते झालेले आहेत. जदुनाथ सरकारांच्या पासून तो वा. सी. बेन्द्रे, सरदेसाई आणि शेजवलकर, हे इतकेच नव्हें तर राजवाडे यांच्याकडूनही ते झालेले आहेत. उदाहरणादाखल येथे काहींचा उल्लेख करता येईल. औरंगजेबाचा चिटणीस साकी मुस्तैदकखान याने ‘ मासिरे आलमगिरि ’ या नावाचे औरंगजेबाचे चरित्र लिहिलेले आहे. त्यात औरंगजेबाने इ. स. १७०३ च्या एप्रिल महिन्यात सिंहगड किल्ला घेतला. त्याने त्या किल्याचे नांव ‘ बख्शिंदाबख्श ’ असे ठेवले. इ. स. १७०४ मध्ये औरंगजेब कर्नाटक प्रांतातील बेडर जमाती विरूध्द लढण्यासाठी गेला. त्याची पाठ फिरताच मराठ्यांनी सिंहगड पुन्हाजिंकला. औरंगजेब जेव्हा इ. स. १७०६ मध्ये अहमदनगर भागात आला त्यावेळी त्याने आपला सेनापती जुल्फिकारखान यास सिंहगड परत जिंकून घेण्यासाठी रवानगी केली. त्याने सिंहगड म्हणजेच बख्शिंदाबख्श परत जिंकून घेतला ही हकीकत लिहिलेली आहे. जदुनाथ सरकार यांनी या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केलेले आहे. आणि त्यातील हा मजकूर वा. सी. बेन्द्रे यांनी त्यांच्या छत्रपती संभाजी महाराज या ग्रंथात मराठी भाषांतर करून सामाविष्ट केला आहे. त्यांनी लिहिले आहे. “ २३ जानेवारी १७०६ रोजी जेव्हा बादशाहाची स्वारी अहमदनगरास जाण्यास निघाली तेव्हा नसरत जंगखान यास बक्षीस देऊन बक्षेन्द्रबक्ष याचेवर रवाना केले ” आणि पुढे लिहिले आहे “ हराक-यांनी बादशहाकडे बातमी आणली की नस्त्रतजंगने बक्षेन्द्र बक्षीस पुन्हा पकडले.”

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org