व्याख्यानमाला-१९८७-२ (34)

इतिहासाचार्य राजवाडे यांनी “ काल, स्थल व व्यक्ती या त्रयींची जी सांगड घातली जाते तिलाच प्रसंग व ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते ” असे म्हटलेले आहे. यात सामान्य प्रसंग आणि ऐतिहासिक प्रसंग यात काटेकोर भेद दिसत नाही. राजवाड्यांना तसा तो दिसणे शक्यही नव्हते. कारण त्यासंबंधीची चर्चाच मुळी त्यांच्या निधनानंतर सुरू झालेली आहे. एकतर सा-याच गतेतिहासातील घटनांना ऐतिहासिक घटनांचा दर्जा देणे कुणालाच शक्य नाही आणि ज्यांना इतिहासकार मुख्य ऐतिहासिक घटना मानतात आणि ज्यांना दुय्यम घटना मानतात त्यांचे स्थान सदैव अचल असते असे नाही. एखादी दुय्यम घटनाही ऐतिहासिक घटना बनू शकते आणि एखादी मान्यताप्राप्त बनलेली ऐतिहासिक घटना सुध्दा दुय्यम स्थानावर जाऊ शकते. हे महाराषट्राच्या एका अलिकडील इतिहासातील ऐतिहासिक घटनेवरून समजावून घेता येते. इतिहासकारांना एखादी सामान्य वाटणारी घटना कालक्रमांत ऐतिहासिक घटना कशी होते हे समजावून घेणे अतिशय मनोरंजक आहे. परंतु ते तेवढ्यापुरतेच मर्यादित नाही तर इतिहास लेखन ही एक सतत चालणारी प्रक्रिया कशी आहे यावरही प्रकाश टाकणारे आहे. उदाहरणार्थ दुसरा बाजीराव नाशिक क्षेत्री गेला असता तेथील गोदावरी नदीच्या ब्राह्मण घाटावर स्नानास गेला होता ही एक घटना घडली. ही घटनासुध्दा इतर घटनाप्रमाणे एक सामान्य घटनाच आहे. इतिहासलेखनात तिची नोंद एक सामान्य घटना म्हणून तळटीपेत येऊ शकते. परंतु या उत्तर पेशवाईतील कालखंडावर जेव्हा एखाखा इतिहासकार पुणे जिल्ह्यातील घोडनदी जवळ झालेल्या लढाईचा तपशील देईल त्यावेळी तो एका बाजूला तमाम देशस्थ ब्राह्मण व दुस-या बाजूस तमाम चित्पावन ब्राह्मण घोडनदीला लढत होते असे सांगेल. परंतु ते का लढत होते याबद्दल तो विविध तर्क सांगेल. दुसरा इतिहासकार या लढाईचे तात्कालीन कारण ‘ पेशव्यांचे नाशिक क्षेत्री गोदावरीच्या ब्राह्मणघाटावर स्नानास जाणे ’ या घटनेत शोधील तर तिसरा इतिहासकार तपशीलाच्या मुळाशी जाऊन अनेक घटनांची साखळी बांधील आणि निष्कर्ष काढील की दुसरा बाजीराव नाशिक क्षेत्री गेला असता तेथील ब्राह्मण घाटावर गोदावरी स्नानाला त्याला मज्जाव करण्यात आला. कारण तो देशस्थ ब्राह्मणांचा घाट होता आणि पेशवे राजे असले म्हणून काय झाले ?  ते राजे असले तरी कोकणस्थ आहेत आणि कोकणस्थ हे देशस्थांच्यापेक्षा हीन दर्जाचे. त्यांना ब्राह्मण घाटावर देशस्थ स्नानाची परवानगी कशी देणार ? कारण देशस्थ ब्राह्मणांनी चित्पावनांची आपणाबरोबर समानता आहे असे केंव्हाच कबूल केलेले नव्हते. पुरंद-याच्या सारख्या घरंदाज देशस्थाच्या सदरेत खुद्द पेशव्यांची पंगत निराळीच असे. त्यामुळे या दोन पोट जातीतील सुप्त तेढ घोडनदीच्या लढाईत जगजाहीर झाली. म्हणजे दुस-या बाजीरावाची गोदावरीवरील ब्राह्मणघाटावर स्नानाला जाण्याची ही घटना एका इतिहासकाराच्या तळटीपेचा, दुस-याच्या ग्रंथलेखनातील मूळ भागाचा, तिस-याच्या एखाद्या शोधनिबंधाचा तर चौथ्याच्या स्वतंत्र ग्रंथ निर्मितीचा विषय होऊ शकतो. याचा सरळ अर्थ असा आहे की, इतिहासकार एखाद्या घटनेकडे कोणत्या दृष्टीकोणातून बघतो यावर त्या घटनेचा दर्जा अवलंबून असतो. इतिहासातील कोणतीही घटना स्वत:च स्वत:चा दर्जा ठरवीत नसते तर इतिहासकार त्या घटनेला त्याच्या मनाप्रमाणे दर्जा प्राप्त करून देत असतो. त्यामुळे आज आपल्या समोर जो लिखित इतिहास आहे तो म्हणजे दुसरे तिसरे काही नसून इतिहासकारांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे केलेल्या ऐतिहासिक घटनांचा संग्रह आहे. त्या घटना जशा निवडक आहेत तशाच त्या निवडीमागे इतिहासकारांचा त्या घटनाकडे पाहण्याचा विशिष्ट दृष्टीकोण असतो. त्यामुळेच इतिहासातील घटना स्वत:च बोलक्या असतात. त्यांना स्वतंत्र अस्तित्व असते आणि इतिहासकार पूर्वग्रहरहित असतात या म्हणण्याला निदान इतिहास लेखनात तरी फारसे स्थान दिसत नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org