व्याख्यानमाला-१९८७-२ (33)

इतिहासाबद्दलची ही कल्पना इतकी सर्वश्रुत झालेली आहे की, इतिहास हा विध्यार्थिवर्गात टिंगलीचा, कंटाळवाणा आणि रटाळ विषय बनलेला आहे. इतिहास शिकविणे म्हणजे काय करणे तर सनावळ्या पाठ करणे, लढाया कुठे झाल्या ती ठिकाणे आठवणे, एलिझाबेथ राण्या किती झाल्या, जेम्स नावाचे राजे किती झाले, शिवाजी राजे किती झाले ? त्यापैकी पहिल्याने काय केले, दुस-याने, तिस-याने काय केले. त्यांच्या वंशावळी कोणत्या ? त्यांच्या राण्यांची किंवा राजांची नावे काय ? आज शाळा कॉलेजातील क्रमिक पुस्तके पाहिली तर त्यात या माहितीच्या ओझ्यापलिकडे काय आहे?  हे माहितीचे ओझे परंपरेने वागवीत रहाण्यापलिकडे आपले इतिहासाचे शिक्षण गेलेले नाही त्याला या ओझ्यातून मुक्त करणे हे केवळ त्याच्याच विकासापुरते मर्यादित नाही तर इतिहास हा फक्त राजघराण्यांना नसतो तर तो सा-याच मनुष्यजातीला असल्यामुळे आणि तो एकाच क्षेत्राला नसतो तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रांना असल्याने त्याची मुक्ती ही अंशत: सर्वच क्षेत्रांची मुक्ती आहे. एका व्यापक दृष्टीकोणाचा स्वीकार केल्याशिवाय ही मुक्ती अशक्य आहे. या मुक्तीकडे आपण लक्ष न दिल्यामुळे आणि इतिहासकारांनी आपले क्षेत्र मर्यादित केल्यामुळे आपल्या इतिहासात फालतू वाद सुरू झाले आहेत आणि या फालतू वादांनी अनेक पिढ्यांना अंधारात भटकायला लावले आहे. आपली मंडळी शिवाजीची जन्मतारीख कोणती ?  इ. स. १६२७ मधील की इ. स.१६३० मधील यावर उत्साहाने चर्चा करण्यात पटाईत आहेत. ज्ञानेश्वर एक की अनेक ? रामदास शिवाजीचा गुरू होता का नाही ? त्या दोघांची भेट राज्यभिषेकापूर्वीची की राज्यभिषेकानंतरची ? या सारखे प्रश्न म्हणजे इतिहास लेखनातील महत्वाचे प्रश्न मानून सारा अविचार चालू होता आणि इतिहास लेखनातील महत्वाचे प्रश्न मानून सारा अविचार चालू होता आणि अद्यापही तो चालू आहे. इतिहासाने यापेक्षा अधिक काही व्यापक विचार करावयाचा असतो याकडे आपले लक्षच जात नाही.
 
आपल्या इतिहासातील एखादे उदाहरण देवूनही हे अधिक स्पष्ट करता येईल. उदाहरणार्थ आपण प्लासीची लढाई इ.स. १७५७ साली झाली असे मानतो. या घटनेचे दोन प्रकारे स्पष्टीकरण करता येईल. पहिले म्हणजे इतिहासकाराच्या दृष्टीने प्लासीची लढाई इ. स. १७५७ साली झाली. ती इ.स.१७५८ साली किंवा १७५६ साली झालेली नाही. दुसरे ती प्लासींलाच झाली. ती रामेश्वर किंवा काशीला झालाली नाही. प्लासीची लढाई इ. स. १७५७ ला झाली आणि ती प्लासीलाच झाली हे सांगण्याचा काटेकोरपणा तर इतिहासकाराकडे असलाच पाहिजे. ते तर त्याचे आद्य कर्तव्य आहे. हा काटेकोरपणा तर त्याच्या लेखनाची पूर्वअट आहे. परंतु त्याच्याठाय़ी असलेला हा काटेकोरपणा पुरेसा नाही. केवळ तोच इतिहासकाराला श्रेष्ठत्व प्राप्त करून देत नाही. तसे झाले असते तर राजदरबारातील लेखनिक आणि बखरकार यांनाच श्रेष्ठ इतिहासकार मानावे लागेल. एखादी ऐतिहासिक घटना अमूक एका ठिकाणी आणि अमूक एका वेळी घडली ऐवढे सांगितले म्हणजे इतिहासकाराचे काम संपत नाही. कारण ही घटना एक सुटी नसते. तिला अनेक पदर असतात. या सा-याच पदरांचे नसले तरी जितक्या जास्तीत जास्त पदरांची माहिती इतिहासकार आपणास देईल तितके त्याचे लिखाण अधिक काटेकोर आणि अधिक श्रेष्ठ दर्जाचे ठरेल. या घटनेच्या काटेकोर ज्ञानासाठी इतिहासकाराला इतिहासाला पूरक अशा इतर शास्त्रांचाही आधार घ्यावा लागतो. अशा सास्त्रात  पुराणवस्तुशास्त्र- आर्कियालॉजी, लिपीशास्त्र - ऐपिग्राफी, नाणेशास्त्र न्यूमिस्मॅटीक्स, कालगणनाशास्त्र – क्रोनॉलॉजी या आणि यासारख्या इतर शास्त्रावर अवलंबून रहावे लागते. इतिहासकार या सर्व शास्त्रात तज्ञ असेल अशी अपेक्षा करणे बरोबर नाही. परंतु या शास्त्रातील अद्ययावत ज्ञानाशी त्याचा किमान परिचय असला पाहिजे अशी अपेक्षा धरणे गैर नाही. कारण इतिहासकार ज्या ऐतिहासिक घटनांना म्हणजेच आपल्याकडे असलेल्या या कच्चा मालाला घेऊन इतिहासाचे मंदिर उभारू इच्छितो त्या ऐतिहासिक घटनावर नवेनवे प्रकाश पाडण्याचे काम ही शास्त्रे करीत असतात.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org