व्याख्यानमाला-१९८७-२ (28)

आपल्याकडे लेखकांची जात पाहण्याची एक प्रथा आहे. आपण तर प्रत्येकाच्याच जातीचा खुलासा करून घेतल्याशिवाय त्यासंबंधी मत बनवायला तयार नसतो. शेजवलकर आणि राजवाडे यांच्याही जाती शोधण्याचा प्रयत्न झालेला आहे. परंतु त्यांच्या जातींच्यापेक्षा त्यांचे दृष्टीकोण मला इतिहास विषयावरील चर्चा पुढे नेण्याच्या दृष्टीने अधिक मोलाचे वाटतात. आज इतिहासाबद्दलची जी चर्चा वेगाने पुढे चालू आहे तिच्याशी सांधा जुळविण्यासाठी यांचे विचार उपयुक्त वाटतात. ऱाजवाडे आणि शेजवलकरांच्या जाती भिन्न होत्या. त्याप्रमाणेच त्यांचे इतिहासाकडे बघण्याचे दृष्टीकोणही भिन्न होते. राजवाडे कोकणस्थ ब्राह्मण होतेतर शेजवलकर क-हाडे ब्राह्मण होते. ही तर वस्तुस्थिती होती. परंतु या जाती भिन्नतेमुळे त्यांच्या इतिहास विषयक दृष्टीकोणात फरक होता काय ? राजवाडे आणि शेजवलकर यांची मते पुढे ठेवून ती मते त्यांच्या जातीमुळे कशी बनली हे दाखविण्याचे प्रकारही आपल्याकडे झालेले आहेत. राजवाडे कोकणस्थ तर शेजवलकर क-हाडे ब्राह्मण, राजवाडे म्हणत राज्य कोकणस्थांचे गेले आहे म्हणून ते परत मिळविण्याचा प्रयत्न कोकणस्थांनाच करणे भाग आहे. शेजवलकर म्हणत राज्य कोकणस्थांनी घालविले आहे म्हणून या राज्य गमाविणा-या कोकणस्थांचा ब्राह्मणवाद ठोकून काढला पाहिजे. राजवाड्यांनी क-हाड्याजवळ गोडबोलेपणा, साखरपेरेपणा असतो असे म्हटले आहे तर शेजवलकरांनी कोकणस्थांजवळ पैसे मिळविण्यासाठी लाचारीचे सोंग आण्ण्याचा दांभिकपणा असतो असे सुचविले आहे. ही उदाहरणे अशी आहेत. राजवाडे आणि शेजवलकर मोठे इतिहासलेखक होते परंतु शेवटी तीही माणसेच होती. त्यांच्यात क्वचित अभिनिवेश आलाच नसेल असे म्हणता येणार नाही. तसा तो अनेकदा आलेलाही आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी त्या अभिनिवेशाची चर्चा करावयाची नाही तर त्यांच्या भिन्न इतिहासविषयक दृष्टीकोणांची चर्चा करावयाची आहे.
 
इतिहासाचार्य राजवाडे जेव्हा “ झालेल्या प्रसंगाची विश्वसनीय हकीकत निर्लेप व निरहंकारपणाने कोणतेही पूर्वग्रह न ठेवता देणे ”  यावर इतिहास लेखनात जोर देतात. त्यावेळी आपल्याला असे वाटते की, खरोखरच घडलेल्या घटना जशा घडलेल्या असतात तशाच त्या आपल्यासमोर इतिहास लेखनात याव्यात आणि त्या जशा घडलेल्या असतात तशाच सांगण्याचे काम पूर्वग्रहरहित इतिहासकारच करू शकतो आणि त्याचे मन निर्लेप आणि निरहंकार असेल हे घडू शकते. प्रथम दर्शनी राजवाडेंचे हे म्हणणे आपण लगेच मान्य करून टाकतो परंतु हे इतके सोपे नाही. राजवाडे यांच्या या विचारात अनेक गोष्टी संदेह निर्माण करणा-या आहेत आणि त्यासाठी राजवाड्यांच्या या मतातील प्रत्येक शब्दाला आपण प्रश्न विचारू शकतो. त्या प्रश्नांची उत्तरे म्हणजेच इतिहास लेखन कसे होते या प्रश्नाचे उत्तर आहे. तर शेजवलकर “ मी मराठ्यांचा इतिहास अभ्यासिला तो मुख्यत: मराठ्यांच्या सद्य:कालीन स्थितीचा यथार्थ बोध होण्यासाठी ” असे म्हणतात. याचा अर्थ शेजवलकर इतिहासाचा, ऐतिहासिक घटनांचा, भूतकाळाचा सद्य:कालीन स्थिती समजावून घेण्याकरता, वर्तमान समजावून घेण्याकरता एक साधन म्हणून उपयोग करू इच्छितात हे स्पष्ट होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org