व्याख्यानमाला-१९८७-२ (27)

इतिहासाचार्य राजवाडे यांनी विद्यासेवक मासिकातील ( वर्ष १ अंक ७ ) ‘ भारतीय इतिहासाची मूल तत्वे ’ या लेखात इतिहासाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या मताप्रमाणे ‘ इतिहास ’ शब्दाचे दोन अर्थ आहेत. १) गतकाली होऊन गेलेली जी कृत्ये त्यांना इतिहास हे जसे नाव लावतात तसेच २) गतकाली होऊन गोलेल्या कृत्यांच्या परंपरित वर्णनालाही इतिहास हा शब्द लावतात. कृत्ये व त्यांची वर्णने या दोहोंचा वाचक एकच शब्द आहे. पैकी कृत्य परंपरा वाचक इतिहास शब्द तो इष्ट समजावा. इतिहासाची मूलतत्वे म्हणजे कृत्य परंपरेची मूल कारणे. मूल कारणे दोन प्रकारची, बाह्य व आंतर. मनुष्याच्या पिंडावर बाह्य सृष्टीचे आघात होतात. आघाताचे सातत्य होऊन मनोरचना बनते. सृष्टी ही मनोरचनेचे ऊर्फ स्वभावाचे बाह्य कारण आणि कृत्य रूपाने फलद्रुप होणारा स्वभाव कृत्याचे आंतरकारण ठरते. ”  राजवाड्यांची ही व्याख्या निश्चितच वैज्ञानिक आहे म्हणूनच राजवाडे ‘ केवळ मोठमोठ्या व्यक्तींच्याच चरित्राने समाजाचा इतिहास संपूर्ण होत नाही. मोठ्या व्यक्ती समाजात थोड्या असल्यामुळे त्यांच्या इतिहासाला लहान व्यक्तींच्या म्हणजेच बहुजन समाजाच्या इतिहासाचा जोड द्यावा लागतो ’ असे सांगतात. राजवाड्यांच्या मते निर्लेप व निरहंकारपणाने इतिहासाचा विचार करावयाला लागणे ही इतिहासाचे खरे स्वरूप जाणण्याच्या मार्गाला पहिली पायरी आहे. या मार्गाला लागण्याची दुसरी पायरी सर्व प्रकारचे अर्धवट ग्रह सोडून देणे ही होय. ”

राजवाडे आपल्याला इतिहास म्हणजे “ वर्तमान क्षणाच्या पाठीमागील गतकाळी पृथ्वीवरील नव्या व जुन्या दरोबस्त सर्व समाजाच्या सर्व त-हांच्या उलाढालीची साद्यंत व विश्वसनीय हकीकत होय ” असे सांगतात आणि असा इतिहास पृथ्वीवरील कोणत्याही भाषेत अद्याप लिहिला गेलेला नाही याची कबूलीही देतात. कारण या इतिहास लेखनात वैयक्तिक मते आणि स्वदेशाभिमानाचा दर्प बाजूला ठेवणे आवश्यक असते. तसा तो ठेवला जात नाही. अशी त्यांची तक्रार आहे. त्याच प्रमाणे राजवाडे ‘ मूल्यमापन ’ हे सुध्दा इतिहासकाराचे उद्दिष्ट मानीत नाहीत. ते काम नीतीशास्त्राचे आहे असे मानतात. नीतीशास्त्र हे स्थल व कालसापेक्ष असल्यामुळे ते शाश्वत निकष देण्यास असमर्थ आहे असे त्यांचे मत होते. म्हणूनच ते म्हणतात “ सूक्ष्मतेने पहाता निर्भेळ इतिहास म्हणून ज्याला म्हणता येईल त्याचे काम फक्त झालेल्या प्रसंगांची विश्वसनीय हकीकत देण्याची आहे. कालाचे पौर्वापर्य लावून व प्रसंगांचे कार्यकारत्व सिध्द करून भूत गोष्टी अशा अशा सातत्याने घजल्या इतके सांगितले म्हणजे अतिहासाची कामगिरी आटोपली.....इतिहास भूतवृत्ताचा विश्वसनीय सारांश देतो व नीतीशास्त्र त्याचे उत्तमाधमत्व ठरविते. नि:पक्षपाताने काढलेला सारांश मात्र, यावच्चंद्रदिवाकरौ अजरामर राहतो.”
 
शेजवलकर आणि राजवाडे यांच्या विचारांचा मागोवा घेत आपण ही चर्चा सुरू केली कारण ते दोन्हीही आपल्याला परिचित आहेत म्हणून. मराठी भाषेत इतिहासलेखन करून त्यांनी या भाषेला समृध्द करण्याचा आणि इतिहासाबद्दलचा विचार सामान्य मराठी माणसापर्यंत नेण्याचा परिश्रमपूर्वक जो प्रयत्न केला त्याची तुम्हाला विस्मृती होऊ नये म्हणून आणि तुमच्यात उद्या निर्माण होणा-या इतिहासकारांना या नावांनी प्रेरणा मिळावी म्हणून. याचा अर्थ मराठीतील अन्य इतिहासकारा कमी दर्जाचे आहेत हे सुचविण्याचा हेतु अजिबात नाही. त्या सर्वांनीच आपआपल्या परीने हे दालन समृध्द करण्याचा प्रयत्न केलेला आहे याची नम्रपणाने कबूली दिली पाहिजे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org