व्याख्यानमाला-१९८७-२ (26)

राजवाडे आणि शेजवलकर  
महाराष्ट्रात इतिहास लेखन करणारे इतिहासाचार्य राजवाडे हे शेजवलकरांच्या समकालीन होते. मराठी भाषेत इतिहास लेखनाचे एक नवे युग ख-या अर्थाने राजवाडे यांनीच सुरू केले. त्यांनी इतिहासाला दैवी शक्तीच्या आणि गूढ वादाच्या आवर्तातून बाहेर काढले आणि इतिहासलेखनाला विज्ञाननिष्ठ दृष्टी देण्याचा प्रयत्न केला. शेजवलकरांच्या लिखाणातही याच बाबी प्रकर्षाने जाणवतात परंतु तरीही त्यांच्या ऐतिहासिक लिखाणात एकवाक्यता नाही. अनेक प्रसंगी तर ते परस्परविरूध्द टोकालाही जाताना दिसतात. असे का व्हावे हा इतिहासाची आवड असणा-या वाचकापुढील खरा प्रश्न आहे. यासाठी ते इतिहासाकडे कोणत्या दृष्टीकोणातून बघत होते हे समजावून घ्यावे लागेल.

‘ ज्या राष्ट्रास भूतकाळ नाही त्याला भविष्यकाळही नाही’  अशी इतिहासकारात एक समजून होती. अद्यापही ती काही प्रमाणात आहे. सा-या मूलतत्ववाद्याचे ही समजूत एक आकर्षक घोषवाक्य आहे. म्हणूनच आपआपल्या भूतकाळ किती भव्य आणि दिव्य आहे हे सांगण्यात त्यांची जीवघेणी चढाओढ चालू असते. इतिहासाबद्दलच्या या समजुतीचा फायदा राजकारणातील सत्तास्पर्धेत आणि समाज जीवनात इतरांना दडपून आपले वर्चस्व टिकविण्यात अनेक नेते मंडळी करीत होती आणि आजही करतांना आपण पहात आहोत. या समजुतीवर शेजवलतरांनी निकराचा हल्ला चढविला. ते इतिहासाबद्दलच्या या समजुतीला, सिध्दांताला  ‘ अशुध्द ’ म्हणत असत. या समजुतीप्रमाणे बघितले तर भारतात मराठे, शीख, रजपूत वगैरे लोकांनी इतिहासात नाव गाजवले म्हणून त्यांनाच भविष्यकाळ उज्वल आहे असे मानावे लागेल व जगात रोमन, ग्रीक आणि फ्रेंच वगैरे लोकांच्या वंशजांचाच भावी इतिहास बनणार आहे, असे मानावे लागेल. जर्मनसुध्दा या समजुतीमुळे खोट्या अहंकारांनी ग्रासले होते आणि या दृष्टीनेच तेथे इतिहास लेखन होत होते व तसेच शिकविलेही जात होते. परंतु महायुध्दात जर्मनीचा निकाल लागला, ज्यांना इतिहास नाही असे समजले गेले त्या गुजराथी वाण्यात गांधीजींच्या सारखा जगव्दंद्य महापुरूष निर्माण झाला, अमेरिकेततील निग्रोत ड्युबाथ व पिढे मार्टिन ल्युथर किंग जन्माला आले आणि मूठभर उंचीच्या जपान्यात टोगे निपजले. आज तर जपान अमेरिकेसारख्या सर्वात समृध्द देशाशी जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्पर्धा करीत आहे. या सा-या घटना बघितल्यानंतर ‘ ज्यांना भूतकाळ नाही त्यांना भविष्यही नाही’ हा सिध्दांत फोल ठरलेला दिसतो. शेजवलकरांच्यामतें इतिहासाचा खरा उपयोग हा ‘ शहाणपण शिकणे’  हा आहे मागील चुका व दोष नेहमी डोळ्यापुढे वागवून ते दोष आपल्यातून जावेत, तशा चुका पुन्हा घडू नयेत याकडे लक्ष देणे आवश्यक आहे हे दोष नाहीसे करतांना आपल्या भूतकाळाची काळजी करण्याचे आपल्याला कारण नाही. तो चांगला असला तर उत्तमच, तरी त्याचा भविष्यावर मोठासा परिणाम घडणार  आहे असे नाही. इतके स्वच्छ आणि शास्त्रीय विवेचन शेजवलकर आपणास देतात. म्हणूनच ते इतिहासाकडे एक उपयुक्त कला म्हणून बघत नाहीत तर ते एक शास्त्र आहे अशी त्यांची इतिहासाबद्दलची धारणा आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org