व्याख्यानमाला-१९८७-२ (25)

यासारखी अनेक उदाहरणे देता येतील परंतु ही दोनच उदाहरणे ब्राह्मण ब्राह्मणेतरातील अंतर्विरोध स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहेत. त्याच बरोबर इतिहासाचा उपयोग जातीय अहंकार जतन करण्यासाठी व जातीय पुढारीपण निर्माण करण्यासाठी कसा केला जात होता याचीही कल्पना येते. या प्रवृत्तीमुळेच ‘ महाराष्ट्राच्या इतिहासाची झालेली आबाळ ’ शेजवलकरांना अस्वस्थ करीत होती. ते म्हणतात, “ महाराष्ट्रातील ब्राह्मण मराठ्यामध्ये जे कायम तट पडले आहेत व त्याचे सर्वनाशक दुष्परिणाम परवाच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पदोपदी स्पष्ट झाले त्याचे एक बौध्दिक कारण महाराष्ट्रेतिहासाबद्दल निश्चित मते उघडपणे सांगण्यात आजवर ब्राह्मणांकडून अक्षम्य टाळाटाळ झालेली आहे हे होय. संशोधक ब्राह्मण, इतिहास लेखक व विवेचण ब्राह्मण, विषय ब्राह्मणांच्या अभिमानाच्या राज्याचा, संपादक ब्राह्मण, शिक्षक ब्राह्मण, व्याख्याते ब्राह्मण, चळवळी त्यांनीच काढलेल्या आणि या सर्वांचे श्रोते, अनुयायी वाचक ते ही ब्राह्मण, यात क्वचित कोठे अपवादात्मक ब्राह्मणेतर असेल. या सर्व बनावाचा दुष्परिणाम असा की, ब्राह्मणांची कर्तबगारी अगदी गागाभट्ट रामदासापासून आरंभ करून तो ‘ अप्रबुध्द ’ गोळवलकर यांच्यापर्यंत अशा त-हेने फुगविण्यात, सोज्वळ करण्यात चुकीची व म्हणूनच खोटी करून सांगण्यात शक्य तेवढी जास्त कोशीस करण्यात आली आहे. याचा दुष्परिणाम मुख्यत:ब्राह्मणावरच जास्त वाईट त-हेचा झालेला आहे ” शेजवलकरांचे हे शब्द जरा जास्त कडक असले तरी ते वस्तुस्थितीचे निदर्शक आहेत. त्यात त्यावेळी अवास्तव काहीच नव्हते. आज परिस्थिती झपाट्याने बदलत आहे हे खरे परंतु शेजवलकरांच्या या कडक शब्दांच्यामागे खोट्या जातीय अहंकारातून निर्माण झालेल्या क्रौर्याची जी सामान्य माणसे बळी ठरली आणि ठरत आहेत त्यांच्याबद्दलची कणव आहे. मग ती ब्राह्मण असोत की मराठा, शीख असोत की हिंदू, मुस्लीम असोत की हरीजन, बळी जातात ती सामान्य माणसेच. हे जातीच्या कोषात ज्यांची मानसिकता अडकली आहे त्याना समजणे कठीण आहे.

गेल्या काही वर्षापासून महाराषट्रात पुन्हा जातीय तणाव निर्माण होत आहेत याचे कारण समाजात विविध तट पडलेले आहेत. शेजवलकरांच्या काळातही ते होते. त्याची कारणमीमांसा सांगताना शेजवलकर प्रामाणिकपणे आपल्याला सांगतात की ‘ याचे कारण महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलची निश्चित मते उघडपणे सांगण्यात इतिहास लेखन करणा-यांनी अक्षम टाळाटाळ केलेली आहे हे आहे.’  म्हणूनच शेजवलकर-पूर्व आणि शेजवलकर-समकालीनाकडून जो इतिहास लिहिला गेलेला आहे तो तपासला पाहिजे. बहुजन समाजातील तरूण सुशिक्षित मुले राजकारणात अडकलेली आहेत. त्यांना आमदार, खासदार, मंत्री होण्याची स्वप्ने पडत असतात. निदान जिल्हापरिषद किंवा तालुका पंचायत तरी हातात यावी हेच त्यांचे सर्वंस्व बनले आहे. उरले्ल्या मंडळींनी तर हातात टें टेंभे नाहीतर तलवारी घेऊन हिंदु राज्य स्थापण्याची पहिली पायरी म्हणून गोरगरीब दलीत जनतेच्या झोपड्या जाळणे सुरू केले आहे आणि पुढची पायरी जास्तीत जास्त मुस्लीमव्देष कसा फैलावेल यासाठी ते जिवाचे रान करीत आहेत. हा तर इतिहासाचा क्रम आहे. त्यांनी लगेच गीतेवर भाष्य करावे किंवा ब्रह्मचर्चा करावी असे मी म्हणत नाही. ते तर ती तशी करूही शकणार नाहीत कारण त्यांनी अद्याप बौध्दिक दास्य झुगारलेले नाही. माणसाला त्याच्या शक्तीचा त्याचवेळी राष्ट्रनिर्मितीसाठी उपयोग करता येणे शक्य असते ज्यावेळी तो बौध्दिक दृष्टया स्वतंत्र होतो. हे परंपरेने आलेले बौध्दिक दास्य एकदम नष्ट होईल असे मी मानीत नाही. परंतु त्यासाठी गंभीरपणे प्रयत्न होत नाहीत एवढीच माझी तक्रार आहे. या तरूणांच्या शक्तीचा विध्वंसक गोष्टीसाठी आणि मोजक्या मंडळींचे हितसंबंध सुरक्षित ठेंवण्यासाठी उपयोग होत आहे हे स्पष्ट दिसूनही याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे एक आख्खी पिढी उध्वस्त करणे आहे. मग हा इतिहास कोण तपासणार ? ते अकट्याचे काम नाही. त्याला सांघिक प्रयत्न करावे लागतील. एक टीम तयार करावी लागेल. कधी तरी स्वत:च्या जीवनाचा, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा आणि राष्ट्राचा अंतर्मुंख होऊन विचार करावा लागेल. याकडे द्यावे लागेल. शेजवलकर- पूर्व आणि शेजवलकर- समकालीन यांनी कोणत्या दृष्टीकोमातून इतिहास लेखन केले, ऐतिहासिक सत्य शोधण्यासाठी कोणती दृष्टी वापरली हे नीट समजावून घेतल्याशिवाय शेजवलकरांच्या म्हणण्यातील सत्यासत्यता कळणे कठीण आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org