व्याख्यानमाला-१९८७-२ (24)

ज्या कालखंडात मराठीत शेजवलकर आणि राजवाडे यांच्यासारखे इतिहासकार इतिहास लिहीत होते तो कालखंड महाराष्ट्राच्या समाज जीवनातील ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाच्या संघर्षाचा कालकंड होता. या वादाचा परिणाम तत्कालीन लेखनावर झालेला आहे. हे त्या काळातील प्रमुख इतिहासकारांच्या लेखनातून स्पष्ट होते. या वादाबरोबरच स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व कोणती जमात करणार आणि स्वातंत्र्योत्तर भारताचे नेतृत्व कोणत्या जमातीच्या हातात राहणार हे त्या काळातील ज्वलंत प्रश्न होते. या गोष्टी स्पष्ट करणारी अनेक उदाहरणे आपल्याला तत्कालीन लेखनात सापडू शकतात. स्वत: शेजवलकरांनी रियासतकार सरदेसाई यांच्या ‘ नानासाहेब पेशवे ’ या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत, एक इतिहास संशोधक शेजवलकरांना काय म्हणत होते ते लिहून ठेवले आहे. ते शेजवलकरांना म्हणाले होते ‘ अहो, पेशव्याबद्दल लिहितांना आपणास जरा जपूनच लिहिले पाहिजे, नाहीतर हे ब्राह्मणेतर आपल्याच वाक्यांचा आहेर आपणास करावयाचे व त्यांचा ब्राह्मणाविरूध्द उपयोग करून घ्यावयाचे.’  म्हणजे हे इतिहास संशोधक पेशव्यांच्याबद्दल काय लिहायचे आणि काय लिहायचे नाही याबद्दलचा आपला दृष्टीकोन सांगत होते. इतिहास कसे लिहिले जात होते हे यावरून स्पष्ट होते. यासंबधीचे दुसरे उदाहरण तर फारच मजेशीर आहे, आणि ते उघडपणे जाहिरातीच्याच स्वरूपात सांगितले आहे. मी समर्थ रामदासावर जे लिहिलेले आहे. त्यात एक प्रश्न असाल उपस्थित केलेला आहे की, एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरवातीला रामदासांवरच एवढे लिखाण का झाले  ?  त्याचे उत्तर मी विस्ताराने दिलेले आहे. परंतु रामदास फार मोठे संत होते, त्यांनी कर्मयोग शिकविला, लोकजागृती केली, या गोष्टी या लेखनाच्या मागे गौण होत्या तर रामदास हे शिवाजीचे गुरू कसे होते. त्यांच्या आशिर्वादाशिवाय शिवाजीला राज्यच स्थापता येणे कसे अशक्य होते आणि मराठा बहुजन समाजाला ब्राह्मणाचे नेतृत्व असल्याशिवाय कर्तृत्वच कसे गाजविता येणार नाही हे महाराष्ट्राच्या बहुजन समाजावर बिंबवायचे होते आणि स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व ब्राह्मणाकडेच कसे राहील यासाठी वातावरण निर्माण करायचे होते. “ महाराष्ट्र भाषा चित्र मयूर ”कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी ‘समर्थांचे सामर्थ्य किंवा श्री रामदासस्वामींचा लीलानुग्रह’ नांवाचे एक पुस्तक लिहिलेले आहे. अशा या ग्रंथाची जाहिरात केशव भिकाजी ढवळे, बुकसेलर, ठाकुरव्दार मुंबअ यांनी श्री. मोरो केशव दामले यांचा ‘शास्त्रीय मराठी व्याकरणाच्या’ दुस-या आवृत्तीत १९२५ साली प्रसिध्द केली आहे ही जाहिरातच महाराष्ट्रातील सुशिक्षित इतिहासाकडे कोणत्या दृष्टीने बघत होते व त्यामागे त्यांची मनोवृत्ती कोणती होती यावर पुरेसा प्रकाश पाडते. ती जाहिरात अशी आहे “ भक्ती, मुक्ती, युक्ति आणि विरक्ती हा चतुर्बीज मंत्रात्मक ग्रंथ आम्ही मुद्दाम श्री आठल्ये यांच्या कडून लिहविला आहे. इतके सांगितले म्हणजे त्यातील भाषा व विचार कसे आहेत हे निराळे सांगण्याची गरजच नाही.”  अशी सुरवात करून या ग्रंथात काय काय आहे हे सांगितले आहे व या ग्रंथाचे वैशिष्टय सांगताना जाहिरात म्हणते “ आणखी सर्वात विशेष हे की, या चरित्राचा हल्लीच्या ‘ स्वराज्य’ जागृतीच्या कामी कसा उपयोग करून घेता येण्याजोगा आहे आणि त्यात विशेषेकरून ब्राह्मणांनीच पुढारी होऊन आपण समर्थ कसे बनावे ही तर शेवटची गुरूकिल्ली आहे. ह्यामुळे हा ग्रंथ सर्वांग-सुंदर झाला आहे.”

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org