व्याख्यानमाला-१९८७-२ (22)

व्याख्यान - दुसरे
१३ मार्च १९८७

काल मी आपल्यासमोर धर्मासंबंधी, त्याच्या उद्यासंबंधी, त्याच्या विविध रूपासंबंधी आणि त्याने निर्माण केलेल्या दहशतीसंबंधी सूत्ररूपाने बोललो आहे कालच्या भाषणाचा शेवट करतांना मी असे म्हणालो होतो की, समाज जीवनात इहवादी भूमि घेतल्याशिवाय, सेक्युलर भूमिका घेतल्याशिवाय हे धर्मवेड आपल्याला समाजातून हद्दपार करता येणार नाही. आणि त्याशिवाय माणसाला ख-या अर्थाने माणूस म्हणून जगताही येणार नाही. परंतु ही इहवादी, सेक्युलर भूमिका आपण स्वीकारणार कशी ? ती केवळ स्वीकारतो म्हटल्याने स्वीकारता येत नाही. त्यासाठी आतून, मनातून आपली तयारी झाली पाहिजे. परंतु ही मनाची तयारी कशी करता येईल.? ती करण्याचे अनेक मार्ग आहेत. ती होण्यासाठी अनेक गोष्टींची मदत होऊ शकते. हा सेक्युलर किंवा इहवादी विचार आपल्याला लवकर आकर्षित करीत नाही कारण लहानपणापासून आपल्या मनावर धर्माचे संस्कार कळत नकळत होत असतात. या संस्कारात सर्व धर्म सारखेच आहेत या पेक्षा माझा धर्म सर्वश्रेष्ठ आणि इतरांचे फालतु आहेत हाच संस्कार मोठ्या प्रमाणावर होत असतो. वाढत्या वयाबरोबर शूरवीरांच्या गोष्टी आणि त्यांनी केलेले धर्माचे रक्षण हा आपल्या जसा करमणुकीचा विषय होतो तसाच तो अस्मितेचाही विषय होतो. इतिहास लिहिणारांनी, ऐतिहासिक पुरूषावर व्याख्याने देणारांनी, कीर्तनकार आणि प्रवचनकारांनी आणि प्रामुख्याने ऐतिहासिक कादंब-या लिहिणा-या लेखकांनी व नाटककारांनी आपल्या मनाची विशिष्ट वयात पकड घेतलेली असते. त्यातील फार थोडा मजकूर आणि फार थोडे बोलणे वस्तुस्थितीचे निदर्शक असते. बाकी सारे स्वत:चे आणि समाजाचे अहंकार सुखावणारे आणि वाढविणारेच असते. या अहंकारी माणसांना मोक्ष तर अजिबात मिळणार नाही कारण सर्वच धर्मांनी मुक्तीची पूर्वअट अहंकाराचे विसर्जन ही सांगितलेली आहे. परंतु आपापल्या धर्माच्या नावाने विविध स्तरावर विविध पध्दतींनी ओरडणा-यांना मोक्षाची मुळी काळजीच नाही. त्यांना तर धर्मरूढींनी मिळालेल्या सुरक्षिततेची, सामाजिक प्रतिषेठेची, संपत्तीचीच अधिक काळजी असते. आपल्याकडे खरा इतिहास सांगणारी माणसे फार थोडी आहेत. मराठी भाषेत तर इतिहासाचार्य राजवाडे वा.सी.बेंद्रे, त्र्यं. शं.शेजवलकर, स.अ.आळतेकर, न.र.फाटक, ग.ह.खरे, सरदेसाई, दत्तोपंत आपटे यांच्यासारख्या हाताच्या बोटावर मोजणा-या व्यक्तींनी इतिहास लेखन केलेले आहे. त्यात खरे किती आणि खोटे किती हा विवाद्य प्रश्न आहे. प्रत्येक माणसाला आपला इतिहास माहित असावा. इतिहासाच्या नावाने ज्या भाकड कथा सांगितल्या जातात त्यांना इतिहास म्हणता येत नाही.
 
आमच्या संगमनेर गावात नव्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे इतिहास कसा शिकवायचा यासंबंधी हायस्कूलच्या शिक्षकांचे शिबीर चालू होते. या शिबिरात एका सत्रासाठी मलाही बोलावले होते. हे नवे शैक्षणिक धोरण समजावे म्हणून मी उत्सुक होतो. तिथे चाललेली चर्चा ऐकल्यानंतर तर मी चक्रावूनच गेलो. त्या ठिकाणी शिक्षक जमलेले होते ते शिक्षक असले तरी माणसेच असतात आणि त्यांच्यावरही या सा-या प्रचारी गोष्टींचा प्रभाव होता. त्यामुळे साहजिकच अभिनिवेशनही होता. या शिक्षकांना दोष देण्यात अर्थ नाही कारण एक तर इतिहासाच्या तत्वज्ञानावर मराठी भाषेत अगदी नगण्य वाङमय उपलब्ध आहे. आणि जे आहे ते वाचावे असे वाटण्यासारखी शिक्षकांना परिस्थितीही उपलब्ध नाही. आज यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेत या निमित्ताने या विषयावर विचार मांडण्याची मला संधी मिळते आहे त्यामुळे आनंद होतो. आजचे भाषण थोडे लांबले तरी हरकत नाही. एवढ्या लांब पुन:पुन्हा येणे होत नाही आणि आपली ही भरगच्च उपस्थिती आणि ऐकण्याची इच्छा लक्षात घेऊन शक्य तो या विषयाचा सूत्ररूपाने उलगडा होईपर्यंत मी बोलेन. या विषयाचा मूळ प्रश्न इतिहास लेखन कसे होते? या प्रश्नापासून आपण सुरूवात करू आणि त्या अनुषंगाने पुढील चर्चा करू.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org