व्याख्यानमाला-१९८७-२ (20)

विज्ञानाच्या या प्रगतीमुळे चिकित्सक बुध्दीवादी दृष्टीकोनातून जेव्हा या सा-या धार्मिक संकल्पनाचे परिक्षण सुरू झाले त्यावेळी या संकल्पनांचा पायाच ढासळला. धार्मिक नीतीचाही त्यामुळे पाया ढासळला. धर्मप्रधान नीती जी पारलौकिक कल्याणाची भाषा करीत होती ती सुस्थिर आणि सुव्यवस्थित होत चाललेल्या ऐहिक जीवनाने बंद करून टाकली. माणसांना पारलौकीक कल्याणापेक्षा ऐहिक कल्याण फार महत्वाचे वाटू लागले. त्यामुळे हळू हळू धार्मिक नीतीची जागा ऐहिकतावादी नीतीने घेतली. सुरूवातीला तिलाही धार्मिक संकल्पनांचे आवरण होते परंतु अलिकडे तेही हळूहळू गळून पडत चालले आहे. आज माणसांचे ऐहिक हित साधणे हेच नीतीचे उद्दीष्ट ठरले आहे. नीतीला धर्माच्या तुरंगातून लवकरात लवकर सोडविले पाहिजे.
 
धर्माने जी नीती सांगितली ती त्याच्या संस्थेच्या किंवा पीठाच्या सुरक्षिततेसाठी, त्याच्या समृध्दीसाठी. संस्थात्मक धर्मांनी ऐतखाबूंचा एक फार मोठा वर्ग तयार केलेला आहे. हा वर्ग नेहमीच शोषकांच्या आणि सत्ताधा-यांच्या बाजूने उभा राहिलेला आहे. त्याने सामान्यमाणसांचे आणि विशेषत: स्त्रियांचे जीवन बेचिराख केलेले आहे. त्यामुळे जे धर्माला एक फालतू बाब समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात त्यांना समाज परिवर्तनाच्या चळवळी करता येणार नाहीत. त्यांना धर्माची एक सामाजिक शक्ती म्हणून, एक सोशल फोर्स म्हणून दखल घ्यावी लागेल. त्याची चिकित्सा करावी लागोल. अलिकडे  ‘सर्वधर्मसमभावाचे’  टाळ आपल्या देशात फार जोर जोरात कुटणे चालू आहे. त्यात फार मोठमोठी माणसे सामिल झालेली आहेत. जसजसे आपल्या देशात हिंदू-मुसलमानांचे, शिख आणि हिंदूंचे व सवर्ण आणि अस्पृश्यांचे दंगे तीव्र होत जातील तसतसा या ‘ सर्वधर्म-समभाव’ पंथाला अधिक जोर येईल. आपले शासनही जेव्हा पार गोंधळून जाईल तेव्हा तेही या पंथाला आर्थिक मदत करील. हा सर्वधर्म समभावाचा पंथ म्हणजे वैचारिक गोंधळामुळे दिशाहीन झालेल्या मानवतावाद्यांचा पंथ आहे. त्यांच्या हेतुबद्दल मी शंका घेणार नाही परंतु त्यांचा कार्यक्रम शंकास्पद आहे. सर्व धर्म फार चांगले आहेत हे त्यांच्या विचारांचे सत्र आहे. असा इतिहास मुलांना शिकविला पाहिजे की ज्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. सगळेच धर्म जर फार चांगले आहेत तर मग त्यांचे अनुयायी या धर्मांच्या उद्यापासूनच पशूप्रमाणे हिंसक का झाले ?  इतिहासात जर हिंदु आणि मुसलमानांच्या राजकीय लढाया झाल्या असतील, ख्रिश्चन आणि मुसलमानांची क्रूसेड्स् झाली असतील तर इतिहासकारांनी काय लिहायचे ? अफजलखान आणि शिवाजी यांची भेट प्रेमाने आलिंगन देण्यासाठी झाली असे लिहायचे काय  ? सुधारक मुसलमानांच्या नातेवाईकांना ते मेल्यानंतर सुध्दा दफन करण्यासाठी दफनभूमीत जागा नाकारणारे मौलवी प्रेमळ आणि उदार अंत:करणाचे आहेत असे लिहायचे काय ? चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा, संतीचा, जातीसंस्थेचा आणि अस्पृस्यतेचा पुरस्कार करणारा शंकराचार्य हा मानवतेची पूजा बांधणारे महामानवतेची पूजा बांधणारे महामानव आहे असे सिध्द करायचे काय ? विधवेचा विटाळ होतो, तिची सावलीही अंगावर पडायला नको म्हणून इंदिरा गांधी सारख्या देशाच्या सत्तेवर जनतेने बसविलेल्या व्यक्तीशी शंकराचार्य खिडकीतून बोलतो त्याला जगाचा उध्दारकर्ता समजायचे काय ? असे अनंत प्रश्न विचारता येतील.

 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org