उपनिषद् ऋषीची ही कबूली फार महत्वाची आहे. ही कबूली म्हणजेच माणसाच्या मर्यादांची कबूली आहे. माणूस एकटा कधी राहूच शकत नाही. जी माणसे अकटी राहतात ती परमेशवर तरी असतात किंवा पशू तरी असतात असे म्हणतात. माणूस हा नेहमी समूहात राहणारा प्राणी आहे आणि समूहात राहिल्यामुळे त्याला ‘माणूसपण’ प्राप्त झालेले आहे. धर्म हा माणसाचा मनोव्यापार तर खराच परंतु हा मनोव्यापार कशाबद्दलचा आहे ? हा मनोव्यापार ज्या विश्वात राहतो ते विश्वच त्याच्या मनोव्यापाराचा विषय असते. या विश्वात आपले जगणे काही काळापुरतेच असते. पन्नास, साठ किंवा फारच झाले तर सत्तर वर्षापेक्षा अधिक काळ आपण या विश्वात राहू शकत नाही. ही मृत्युची जाणीव माणसाला बेचैन करणारी असते. त्याला त्याच्या मर्यादांची, त्याच्या आयुष्याच्या क्षणभंगूरतेची जाणीव देणारी असते. परंतु त्याच बरोबर माणूस त्यांच्या अस्तित्वासाठी, ते सुकर व्हावे म्हणून प्रयत्नशील असतो. त्याला या विश्वाच्या रहस्याचे गूढ उकलविण्याची अनिवार इच्छा असते. त्याच्या मर्यादाप्रमाणे तो ते उकलविण्यात काही प्रमाणात यशस्वीही झालेला आहे परंतु त्याला विश्वाच्या गूढतेचे पूर्ण आकलन होणे शक्य झाले नाही. फार गोष्टी अद्याप त्याच्या आकलना बाहेरच्या आहेत. आपल्या मर्यादांची जाणीव माणसाला श्रध्दावान बनवते. सा-या व्यक्तिगत धर्मांचा उद्य या मर्यादांच्या भान सर्वानाच येते का?
या प्रश्नाचे उत्तर देणे फार कठीण आहे. ते भान सर्वांनाच आले असते तर संघटीत धर्माची आणि राज्यसंस्थेची जरूरच मानव समाजाला उरली नसती. असे झाले असते तर हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन यासारखे संस्थात्मक धर्म बाद ठरले असते. आजपर्यतच्या मानवी विकासाच्या वाटचालीत असे भान सर्व समूहांना कधी आल्याचा इतिहास नाही. फारच थोड्यांना ते आले. हेच सत्य आहे.
हे सारे खरे असले तरी माणसाला आपले जीवन सुरक्षित आणि सुखी करण्याचीही ओढ होती. ज्या निसर्गावर त्याचे जीवन अवलंबून होते त्याला काबूत ठेवण्याचा तो सतत प्रयत्न करीत आलेला आहे. त्यासाठी तर कळपाने राहू लागला. आपल्यातील पशूवृत्ती कमी व्हावी. आपले जीवन सुरक्षित असावे आपल्याला जे जे हवे, आपण जे जे इच्छू ते सर्व आपल्याला प्राप्त व्हावे. आपल्याकड जे आहे ते सुरक्षित रहावे, ते सुरक्षित राहील यासाठी काही तरी करणे आवश्यक होते. माणसात शिस्त येण्यासाठी काही नियम घालून देणे आवश्यक होते. त्यासाठी त्यांच्या जीवनाचे नियमन करणे आवश्यक होते. त्यासाठीच आज्ञा आणि कायदे हवे होते. सुरूवातीला ते नीतीच्या रूपानेच होणार होते म्हणून नीतीही ठरविणे आवश्यक होते. सा-या संस्थात्मक धर्माचा उगम या मानवी समाजाच्या आवश्यकतेपोटी झालेला आहे.