व्याख्यानमाला-१९८६-९

ग्रामीण समाजाच्या बाबतीत यशवंतरावांनी जी कामगिरी पार पाडली आहे तिचे मूल्यमापन करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यामागील कल्पना मूलतः समाजपरिवर्तनाची होती. गांधीजींच्या ग्राम स्वराज्याच्या कल्पनेला यशवंतराव फार मोठे महत्व देत असत. या कल्पनेचे विकसित स्वरूप म्हणजे रॉय यांची जनसमित्यांची योजना होय. या दोन्ही कल्पनांचा गाभा एकच आहे आणि तो म्हणजे विकेंद्रीकरणाचा. आजच्या जगात केंद्रीकरण इतक्या मोठ्या प्रमाणात झाले आहे की सारी समाजरचना, सारे नियोजन आणि सारा राज्यकारभार केंद्रिभूत झालेला आढळून येतो. म्हणजे वरून येणा-या आदेशानुसार दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे सारे व्यवहार चालतात. यशवंतरावांना जे विकेंद्रीकरण अभिप्रेत होते ते केवळ औपचारिक नव्हे. त्या विकेंद्रीकरणाचे स्वरूप व्यवहार्य करण्यावर त्यांचा कटाक्ष होता. यशवंतराव यांच्या राजकीय शिक्षणाचे बरेचसे श्रेय गांधीजी आणि नेहरू यांच्या प्रमाणेच रॉय यांच्याकडेही जाते. गांधीजींनी ग्रामस्वराज्याच्या कल्पनेतून त्यांच्या मनावर हे बिंबविले की नेतृत्व त्याचप्रमाणे राज्यकारभाराची सूत्रें तळागाळातील लोकांमधूनच विकसित झाली पाहिजेत. नेहरूंनी समाजवादाचे ध्येय त्यांच्यासमोर ठेवले आणि सर्वांगीण नियोजनाच्या भूमिकेचा पुरस्कार केला. रॉय यांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात प्राथमिक काँग्रेस समित्या या संघर्षाच्या घटक त्याचप्रमाणे सत्तेच्या घटक झाल्या पाहिजेत असा दृष्टिकोण पुढे मांडला. त्यानंतरच्या काळात काँग्रेस समित्यांच्या जागी त्यांनी जनसमित्यांची प्रतिष्ठापना केली. या तिन्ही नेत्यांना सामाजिक परिवर्तनाचे उद्दीष्ट कशा रीतीने साध्य करून घ्यावयाचे होते त्याची कल्पना या विवेचनातून येऊ शकेल.

यशवंतरावांनी व्यवहार्य पद्धतीने विकेंद्रीकरणाची योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चाणाक्षपणाने एक धोरण स्वीकारले आणि ते हे की ज्या जिल्हा परिषदा निवडल्या जातील त्यांच्या हाती सत्ता तर हवीच पण आर्थिक सामर्थ्यही त्यांना उपलब्ध करून दिले पाहिजे. म्हणून जिल्हा परिषदा समृद्ध तशाच प्रभावी करण्यावर त्यांनी भर दिला. आता प्रत्यक्षपणे जिल्हा परिषदांचा कारभार कसा चालला आहे, त्यांची कार्यपद्धती कशी आहे, त्यांच्या कार्यात त्रुटी किती आहेत, त्यांचे यशापयश कोणते हा प्रश्न अलाहिदा आहे. यशवंतराव चव्हाण यांनी मूलभूत रचना केली आणि प्रत्येक जिल्ह्याच्या कारभारासाठी जिल्हापरिषदांना विशिष्ट अधिकार बहाल केले, त्यांना सर्व सोयी सवलती उपलब्ध करून दिल्या आणि या जिल्हा परिषदा जिल्ह्याच्या भवितव्याच्या शिल्पकार झाल्या पाहिजेत हे उद्दिष्ट त्यांच्यापुढे ठेवले. त्यातून जे समाजपरिवर्तन झाले आहे ते प्रत्यक्षपणे आपल्या प्रत्ययास येत आहे. यशवंतरावांना भूषण मानता येईल ते हे की महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांचा प्रयोग सर्वश्रेष्ठ ठरला आहे असा निर्वाळा निरनिराळ्या तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

सामान्य जनतेच्या जीवनाला कोणती दिशा दाखविली पाहिजे याचे एक चित्र यशवंतरावांनी आपल्या डोळ्यांसमोर उभे केले होते. त्यात विकेंद्रीकरणाला जसे महत्वाचे स्थान आहे तसेच सहकारी संघटनांनाही आहे. प्रबळ अशा सहकारी संस्था, सहकारी साखर कारखाने, सहकारी बँका महाराष्ट्रातच प्रामुख्याने निर्माण झाल्या. सहकारी उद्योगधंदे उभारण्यालाही यशवंतरावांनी चालना दिली. धनंजयराव गाडगीळ यांच्या प्रेरणेने ही सहकारी चळवळ फोफावत गेली. यशवंतरावांनी समाजसमृद्धीसाठी या चळवळीला उत्तेजन दिलं आणि ते उत्तेजन देताना या घटकांमागे अर्थबळ उभे केले. सहकारी साखर कारखान्यांचे जे जाळे महाराष्ट्रात पसरले त्यांनी सारे समाजजीवन ढवळून निघाले. आज प्रबळ आर्थिक पायावर हे कारखाने उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्यामुळे आजूबाजूचा सारा परिसर उजळून निघत आहे. त्या परिसरात औद्योगिक वसाहती तयार होत आहेत. आणि त्या औद्योगिक वसाहतीतून निर्माण होणा-या उत्पादनासाठी प्रचंड गुदामे, मार्केटिंग यार्डस, मार्केटिंग फेडरेशन्सही तयार केली जात आहेत. समाजपरिवर्तनाच्या या मूलभूत कार्याचा पाया यशवंतरावांनी घातला. आता शिक्षण, विधवा विवाह, सामाजिक सुधारणा यापुरतेच समाज परिवर्तन मर्यादित राहिलेलं नाही. समाजपरिवर्तनाचा जो गाभा आहे तो असा की यातून दुबळा, अडाणी, पीडलेला समाज समृद्धीकडे वाटचाल करू लागावा. महाराष्ट्राचे समाजजीवन आज आमूलाग्र बदलत चाललेले आहे आणि त्या नव्या जीवनाचे शिल्पकार हे खरे यशवंतराव चव्हाणच होते. कारण त्यांच्याच चैतन्यमय प्रेरणेमुळे असे पुढारी निर्माण झाले की ज्यांनी त्यांच्या कार्यक्रमाचा वारसा चालविला आणि असे उद्योग, व्यवसाय निर्माण झाले की ज्यातून ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालटच झाला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org