व्याख्यानमाला-१९८६-४७

टेलिव्हिजनचा आत्मा, पिक्चर ट्यूब बाहेरची. तुमच्याकडे होत नाही. आता नवीन एक पिक्चर ट्यूबचा कारखाना हिंदुस्थान सरकार टाकणार आहे कोलॅबरेशन खाली. आपल्या स्वतःच्या अकलेवरती टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर करायची मग टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर तुम्ही केली तर ज्या मंडळींनी अद्ययावत टेक्नॉलॉजी देतील ती त्यांच्याकडे अॅक्च्युअली असणारी टेक्नॉलॉजी देतील. आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये तुम्हाला दुय्यम स्थान नेहमी कायम ठेवतील. कारण त्यांचा कॉम्प्युटर हिंदुस्थानमध्ये विकायचा आहे. त्यांची पिक्चर ट्यूब हिंदुस्थानामध्ये विकायची आहे. त्याची इलेक्ट्रॉनिक्सची उपकरणे हिंदुस्थानमध्ये विकायची आहेत. त्यांचे डिफेन्समधले सगळे सामान त्यांना हिंदुस्थानमध्ये विकायचं आहे. म्हणून तुमचे डिफेन्सचे डिपार्टमेंट ते सेल्फ सपोर्टींग होऊ देणार नाहीत. प्रगत राष्ट्रे प्रगतिशील राष्ट्रांना त्यांच्या हितसंबंधासाठी आपल्या पायावर उभे राहूच देणार नाहीत. महाराष्ट्र या संदर्भात देशाला टेक्नॉलॉजीच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी काही करू शकतो का?

एकेकाळी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम महाराष्ट्राने केलं. नेतृत्व केलय. आज प्रगत राष्ट्राचा औद्योगिक वसाहतवाद अप्रगत राष्ट्रामध्ये स्थिरावलेला आहे. तो औद्योगिक वसाहतवाद उखडून काढायचा असेल तर मग महाराष्ट्राला त्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये नेतृत्व करावे लागेल. हिंदुस्थानला मोकळं करावं लागेल. मग मला आता पुन्हा म्हणता येईल, जसं एक वेळ सेनापती बापट म्हणाले तसं मला म्हणता येईल, ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्रगाडा न चाले’ जोपर्यंत मला हे म्हणता येत नाही तोपर्यंत महाराष्ट्राभिमान बाळगण्यात काय अर्थ?

काळाची दिशा घेऊन महाराष्ट्राची साधनसामुग्री त्याकाळाचा वेध घेण्यासाठी आपल्याला काटकसरीने वापरली पाहिजे, खर्ची घातली पाहिजे. नवीन माणसाची ताकद उभी केली पाहिजे. आणि ही ताकद पुढचा आणखी विकास गतीमान कसा घडेल त्याच्यासाठी वापरली पाहिजे. ही जी एक दिशा आपण घेऊन चालायला पाहिजे त्या दिशेमध्ये आपण कमी पडलेलो आहोत. गेल्या पाच ते सात वर्षांपासून राजकीय नेतृत्वच दरवर्षी आम्ही अस्थिर करण्याच्या उद्योगाला लागलेलो असल्यामुळे ज्याला आपण कन्टीन्यूटी म्हणतो, सातत्य म्हणतो, हे सातत्यसुद्धा महाराष्ट्राच्या प्लॅनिंगमध्ये राहिलेले नसल्यामुळे आम्ही अनेक ठिकाणी मार खाल्लेला आहे. इलेक्ट्रिकच्या क्षेत्रामध्ये मार खाल्ला, इरिगेशनमध्ये मार खाल्ला, इंडस्ट्रीजमध्ये तर आमच्या मंडळींनी पुरुषार्थ करायला पाहिजे होता तो पुरुषार्थ आम्ही मंडळी अनेक कारणांमुळे करू शकलेलो नाही. त्याला कुणीही बाहेरची माणसं कारणीभूत नाहीत. त्याला आमचं नाकर्तेपण कारणीभूत आहे किंवा आमचं प्लॅनिंग कारणीभूत आहे. मॅन पॉवर डेव्हलपमेंटच्या संदर्भातसुद्धा जे काम करायला पाहिजे होतं ते काम आम्ही न केल्यामुळे बाहेरची माणसं आमच्या इलेल्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीजमध्ये आली, पेट्रोकेमिकल्समध्ये आली. आमच्या इंडस्ट्रीजमध्ये येऊन बसलेली आमची इंडस्ट्रीज त्यांनी ताब्यात घेतली, आर्थिक सत्ता त्यांच्याकडे राहिली. तांत्रिक सत्तासुद्धा त्यांच्याकडेच राहिली.

वरील विवेचनावरून आपल्या हे लक्षात यावे की महाराष्ट्राचे कृषी उत्पादन दर हेक्टरी चिंताक्रांत इतके इतर राज्यांच्यामानाने कमी आहे. सर्वच उत्पादनांचा विचार केला तर देशाच्या पातळीवर उत्पादनाच्या संदर्भात महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर जातो. या उद्योगधंद्याच्या वाढीचा आम्ही नेहमीच गौरवाने उल्लेख करतो (ज्याची कर्तबगारी ही अभावानेच आमच्याकडे जाते.) त्यातसुद्धा गेल्या पाच-सात वर्षामध्ये वाढीच्या संदर्भात आम्ही पाचव्या-सहाव्या क्रमांकावर जाऊन उभे राहतो. सिंचनाची गतीसुद्धा याला अपवाद नाही. गेल्या पाच-सात वर्षांत इतर राज्यांनी सिंचनाचा वेग महाराष्ट्रापेक्षा जास्तीचा ठेवलेला आहे. मनुष्यबळ विकासाच्या संदर्भात तर आमची अवस्था दयनीय आहे. आमच्या गरजा भागविण्यासाठी लागणारे तंत्रज्ञसुद्धा आम्हाला इतर राज्यातून आणावे लागतात. कोरडवाहू शेती आणि दुष्काळी परिस्थिती ही सापासारखी सरपटत आमच्या समोर येते आहे. अत्याधुनिक ज्ञानविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तर आमच्या पूर्वजांचे नाव घेण्यास लाज वाटावी इतके आम्ही मागे रेंगाळतो आहोत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org