व्याख्यानमाला-१९८६-४५

हरियाणा हे लंगोटी एवढे राज्य आहे. पण मेल्ट्रानची एक टेक्नॉलॉजी सिटी काढलेली आहे, दिल्लीच्या जवळ गुरूगावच्या पलिकडे. या टेक्नॉलॉजीच्या पार्कमध्ये (सिटीमध्ये) जगातली सगळी अद्ययावत टेक्नॉलॉजी या मंडळीने मांडलेली आहे आणि सगळ्या हरियाणामधल्या इंजिनिअर्स कॉलेजना, आय्. आय्. टी. ना, पॉलिटेक्निकला इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत की ही नवी डिसीप्लीन आहे यातील ट्रेड सुरू करा. आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारचे साहित्य पुरवितो आणि तुमच्याकडे ही मॅन पॉवर डेव्हलप झाली तर त्यांना आम्ही उद्योगधंदा चालवायला पैसा देतो, त्यांना आम्ही नोकरीसुद्धा देतो आणि एक मोठे शहर उभे करायचे काम चालू आहे.

विवेकानंद स्वामीचा वेश घेऊन वावरणारा माणूस, तुम्ही आम्ही त्याला रामाचा अवतार म्हणतो. एन्. टी. रामाराव यांनी हैद्राबादला टेक्नॉलॉजीकल पार्ट काढला. ज्या आंध्रला तुम्ही मागासलेले म्हणत होता तो आंध्रसुद्धा टेक्नॉलॉजीच्या संबंधीत तुमच्यापेक्षा पुढे गेलेला आहे. तुमची पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी अजून उभी राहात नाही तर तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीची आज काय अवस्था आहे. एका पुण्याच्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स संदर्भामध्ये आम्हाला सुविधा उपलब्ध आहेत. बाकीच्या कुठल्याही कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या संदर्भामध्ये आम्हाला सुविधा उपलब्ध होत नाहीत. तर उद्याचा काँप्युटर आम्ही चालवावयाचा कसा कराडच्या मंडळींनी. आणि मग कराडच्या मंडळींना काँप्युटर चालवायला आला नाही तर कराडातला माणूस येवून सांगेल, माझ्यासारखा माणूस येऊन सांगेल की त्यांनी महाराष्ट्राच्या मोठेपणाची स्वप्नं पाहिली. त्याच्या मातीमध्ये जन्माला येऊन तुम्ही काय नाव कमावलंत. दोष तुमचा आहे की आणखी कोणाचा आहे, तुमचा आहे आणि म्हणून ही जी नवीन नवीन शास्त्रें येऊ लागली आहेत, त्यात आपल्याला पारंगतता संपादिली पाहिजे. माझं दुःख जसं इलेक्ट्रॉनिक्सच्या आणि पेट्रोकेमिकल्सच्या संदर्भात आहे तसेच महाराष्ट्राने मोठं नुकसान करून घेतलेलं आहे ते जेनेटिक्सच्या क्षेत्रात. आज जेनेटिक्समध्ये प्रचंड मोठा शोध लागलेला आहे. आता जेनेटिक्स इंजिनिअरींगमध्ये काम करणारी माणसे तुम्हाला भेटायला येऊन सांगतील की मी महात्मा गांधी निर्माण करू शकतो. मी डाकू, गुंड आणि हरामखोर निर्माण करू शकतो. मी उंदराएवढा हत्ती आणि हत्तीएवढा उंदीर निर्माण करू शकतो. जेनेटिक्स इंजिनिअरींगच्या सहाय्याने मी माणसाला गुलाम करू शकतो, हिप्नॉटिझम करू शकतो, इतक ते अमानुष आहे.

अॅटोमॅटीक कंट्रोल ही अॅक्टीव्हिटीज तुमच्या मेंदूच्या सगळ्या प्रक्रिया मी होऊन हातात घेऊ शकतो आणि तुम्हाला मी माझ्या तिथून उठवू शकतो. तुम्हाला हसायला लावू शकतो. तुम्हाला रडायला लावू शकतो, तुम्हाला गायला लावू शकतो, ही जर जगाच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती झालेली असेल तर या प्रगतीचा मागोवा घेण्याची अंतर्मुखता आम्ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करणार आहोत की नाही आणि महाराष्ट्राला जर हिंदुस्थानचे नितृत्व करायचे असेल तर याचे शिवाय दुसरा काय पर्याय आहे का? तुमच्या जवळ आहे का? हिंदुस्थानचे नेतृत्व करण्याच्या बाता तर सोडाच, तुमचं स्वतःच जीवन तुम्हाला उत्तम प्रकारे जगता येईल अशा प्रकारच्या साधन सामुग्रींनी युक्त असा महाराष्ट्र तरी तुम्ही उभा करणार आहात की नाही ? कृषी-औद्योगिक करणातही एक प्रक्रिया आम्ही उभी करून सेकंडरी सेक्टरमध्ये साखर कारखाने उभारावेत, कागद कारखाने उभारावेत, अशी अपेक्षा होती पण दारूचे कारखाने उभे राहिले आणि कराडच्या गावामध्ये गल्ली गल्लीमध्ये काय उद्योग चाललेले आहेत. महात्मा गांधींच्या देशामध्ये काय उद्योग चाललेले आहेत हे तुम्हाला मी काही सांगावयाची आवश्यकता नाही. बौद्धिक मशागतीकडे ग्रामीण भागातील लोकांनी वळावं आणि शेतीचा जास्तीचा बोजा उद्योगधंद्यामध्ये लावावा याच्याऐवजी आता आम्ही कोरडवाहू शेतीवर पोट भरत नाही म्हणून आठ आण्याची किंवा पन्नास पैशाची हातभट्टी उतारा घेऊन गटारात लोळून स्वतःला विसरायचा प्रयत्न करतो, आणि ही प्रक्रिया जर अशीच चालू राहिली तर काय होईल मला माहीत नाही ?

साखर धंद्यामध्ये आम्ही लक्षणीय प्रगती केलेली आहे हे खरं. परंतु या शक्तीचा उपयोग करून घेऊन मोठ्या प्रमाणात कृषीऔद्योगिककरणाचे जाळे आम्ही पसरू शकलो नाही. हा साखर उद्योग सुद्धा आम्ही पारंपारिक तंत्रज्ञानावर चालवतो आहोत. त्याचेही आधुनिकीकरण आम्ही करू शकलो नाही. शिवाय व्यापार बाह्य प्रेरणा आज या धंद्यात वर्चस्व गाजवत आहेत. साखर उद्योग कृषि औद्योगिकरणाचे केंद्रबिंदू होण्याऐवजी राजकीय अड्डे होऊन बसू पहात आहेत. या कीडेला वेळीच आवर घातला नाही तर हा उद्योग सुद्धा डबघाईला आल्याशिवाय राहणार नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org