व्याख्यानमाला-१९८६-४४

असे किती लोक या क्षेपणास्त्रामध्ये तुमची कामं करतात. तुमची किती माणसं आहेत. एक भाभा अॅटोमिक रिसर्च न्यूक्लिअर सेंटरमध्ये अभ्यास करणारे सेंटर जवाहरलाल नेहरूंच्या पुण्याईमुळे निघालं. त्या भाभा अॅटोमिक सेंटरमध्ये किती महाराष्ट्रीयन शास्त्रज्ञ आहेत तर बोटावर मोजण्याइतके. अमेरिकेत मी गेलो, सिलीवून व्हॅलीमध्ये गेलो तर भारतातील वीस टक्के इंजिनिअर तिथे आहेत. आम्ही मोठ्या अभिमानाने हे सांगतो की अमेरिकेची इकॉनॉमी ज्यू लोकांनी काबीज केलेली आहे. आणि अमेरिकेची टेक्नॉलॉजी हिंदुस्थानने काबीज केलेली आहे. हीच टेक्नॉलॉजी काबीज करणारे आपले लोक आहेत. त्यातले मराठे, मराठी किती आहेत. आनंद आहे. म्हणतोय काय, मी सेकंडरी सेक्टर मध्ये तुमची लोकसंख्या वळवायची असेल तर आज सेकंडरी सेक्टर मध्ये उद्योगधंदा काय प्रकारचा आहे त्याची प्रकृती काय आहे आणि त्याच्या प्रकृतीला मानवेल अशा प्रकारची मॅन पॉवर करण्याची व्यसस्था महाराष्ट्र करतो आहे की नाही हा मुद्दा विचारात घ्या. मग जर हे काम होत नसेल तर आम्ही निश्चित दिशा घेऊन निघालो का ? आज तुम्हाला लागणारे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर पाहिजे तेवढे नाहीत. आणि तुम्हाला माहिती आहे की देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रावर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्मिती फार मोठ्या प्रमाणावर टाकली आहे. आज आम्ही जेमतेम दोनशे कोटींची उत्पादने करतो आहोत. एकोणीसशे नव्वद पर्यंत आम्हाला ती पस्तीसशें कोटीची करावी लागणार आहे. कोणाच्या बळावर हे काम होणार ! तुमच्या माझ्या, जाधव – पवार – भोसले – पाटील – देशपांडे – देसाई – गोखले यांच्या. परंपरेने जी मंडळी उद्योगधंद्यात आहेत त्यांनीच इलेक्ट्रॉनिक्सची इंडस्ट्री काढली आहे. त्यांच्यासाठी उद्योगधंद्याचे धोरणसुद्धा शिथिल झाल आहे. पुन्हा तीच माणसे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपले वर्चस्व कायम ठेवणार आहेत. ही कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राने काही पावले टाकली नाही तर काय आम्ही दिशा घेऊन चाललो असे म्हणता येईल. ही सर्व संपत्ती पुन्हा याच मंडळींच्या हातात. मग आम्ही म्हणायचं मुंबई महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्र मुंबईत नाही. उद्याही महाराष्ट्रातील मंडळी तेच म्हणणार, महाराष्ट्राच हे दुःख आहे. आज रायभान जाधवांच्या पिढींचं, उद्या रायभान जाधवांच्या मुलाचं तेच दुःख असणार आहे. या दुःखाचं निराकरण होणार आहे की नाही ? येणा-या काळाचा जो वेग आहे तो घेण्यासाठी बौद्धिक कुवत मानवामध्ये लागते ती बौद्धिक कुवत निर्माण करण्याचा उद्योग तुम्हाला केल्याशिवाय पर्यायच नाही. ते झालेलं नाही. मग तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स उद्योग चालवायला जे इंजिनिअर लागतील, काँप्युटर चालवायला जे इंजिनिअर लागतील ती माणसे आहेत काय तुमच्याजवळ ? आज बाहेरची मंडळी व मुली त्या काँप्युटर चालवतात, तुमच्याकडे काल त्या टाइपरायटरवर काम करीत होत्या. त्या आज काँप्युटर चालवत आहेत. आज तुमच्या मुली अजून घरात आहेत. काय आहे स्त्रियांच्या क्षेत्रामध्ये मॅन पॉवर डेव्हलपमेंटचे काम? महाराष्ट्रानं किती केलं? कौतुक करायचं, सावित्रीबाई फुल्यांच नाव घ्यायच, काय केले. पुढे आणि जर आम्ही खरोखरच काही केले नसेल तर आम्ही कधी अंतर्मुख होणार आहोत की नाही.

सरप्लस पॉप्युलेशन सेकंडरी सेक्टरमध्ये गेली पाहिजे म्हणजे उद्योगधंद्यात गेली पाहिजे आणि पुन्हा ही जास्तीची लोकसंख्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये गेले पाहिजे. त्यासाठी निश्चित स्वरूपाचे माणूसबळ निर्माण करण्याचे धोरण असले पाहिजे. ते आज आहे काय? मला माझ्या शर्टाला इस्त्री करायला वेळ नाही, ते धुवून इस्त्री करणारी सर्व्हिसेस इंडस्ट्रीज तयार झाली पाहिजे. मला माझ्या व्यक्तिगत गरजा अनेक प्रकारच्या आहेत. त्या पूर्ण करायला मला वेळ नाही. त्या गरजा पूर्ण करण्याला सगळी सर्व्हिस इंडस्ट्रीज, सपोर्टींग इंडस्ट्रीज उभारली पाहिजे त्याच्यामध्ये माणसे गेली पाहिजेत. इंडस्ट्रीज पॉप्युलेशनची ही घडण आहे. आणि म्हणून टर्सरी सेक्टर हे सगळ्यात महत्वाचं समजलं जात. आज अमेरिका टर्सरी सेक्टरवर चालत आहे. अमेरिकेला तुम्ही तिला प्रगत म्हणता की नाही? या प्रगत अमेरिकेमध्ये प्रायमरी सेक्टरवर शेतीच्या अॅक्टिव्हीटीजच्या कामावर केवळ सहा टक्के लोक आहेत. हिंदुस्थानच्या पेक्षा कितीतरी जास्त लोकांचे क्षेत्रफळ आहे. त्यामुळे एक माणूस दहा हजार हेक्टर पासून त्रेपन्न हजार हेक्टर पर्यंत जमीन करतो. उत्पादन मेकॅनाइझ नसल्यामुळे, तांत्रिक पद्धतीची शेती मंडळी करीत असल्यामुळे तुमच्या कितीतरी पट जास्त उत्पन्न आहे. हे जास्तीचं इतकं आहे, की जगातल्या सगळ्या भुकेल्या राष्ट्रांना ते पुरवू शकतील. पण ते पुरवत नाहीत. कारण त्यांचे हितसंबंध त्यात गुंतलेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेमध्ये आपल्या अन्नधान्याचे भाव पडू नयेत याची ते खबरदारी घेतात. यास्तव प्रसंगी अन्नधान्य जाळणे वा खत करणे पसंत करतात. सहा टक्के शेतीवर तर जवळपास त्रेचाळीस ते चव्वेचाळीस टक्के लोक इंडस्ट्रीजमध्ये काम करतात. राहिलेले पन्नास टक्के लोक टर्सरी सेक्टरवर काम करतात. आणि टर्सरी सेक्टर आता इन्फर्मेशनवर चाललेले आहे. आता कुणी काहीच करीत नाही. आता हे पुस्तक छापायची गरज नाही. हे पुस्तक मी लायब्ररीमध्ये विठ्ठलरावजींच्याकडे ठेवले आणि घरी माझं स्क्रीन सुरू केले की टेलिव्हीजनवर मला ते पुस्तक दिसू शकतं, मी ते वाचू शकतो. आता प्रिंटींग टेक्नॉलॉजी कालबाह्य होऊ घातलेली आहे. आज जगाच्या ज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणावर भर पडत आहे. जगाची फार मोठी व्यवस्था झाली आहे. त्या ऑडिओ-व्ही. सी. आर्. इंडस्ट्रीजमध्ये आम्ही कुठं आहोत? काय दिशा आहे? जगाची प्रगती करणेच्या गतीत आज आम्ही कुठं नसलो तरी हिंदुस्थानचं नेतृत्व करू शकतो का ? मी मेल्ट्रॉनच्या संदर्भात सांगू इच्छितो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org