व्याख्यानमाला-१९८६-४२

नोंदलेल्या या संस्थेसंबंधीचीसुद्धा आकडेवारी मी एकदा विधानसभेत दिली होती. एम्. एस्. एफ्. सी. ने जन्माला आल्यापासून कराडमध्ये उद्योग धंद्यावर किती पैसे खर्च केले, आणि मिरा-घोडबंदर – ठाणे – बेलापूर – पनवेल यांच्यावर किती पैसे खर्च केले. नव्याण्णव टक्के तिकडे आणि एक टक्का आमच्या वाट्याला आला. आणि या संस्था काढल्या कशासाठी यशवंतरावजींनी? तर ग्रामीण महाराष्ट्राचे गतीने औद्योगिकरण व्हावे म्हणून ! मग कोणी ओरड केली? सिकॉम ही संस्था त्यांनी ग्रामीण भागात औद्योगिकरण करण्यासाठी काढलेले हे पण ते मुंबईच्या भोवतीच तेथेच खुडबूड करायला लागले. मग महाराष्ट्राच्या ग्रामीण नेतृत्वाने दिशा घेऊन महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेच्या औद्योगिकरणाच्या प्रक्रिया चालू केल्या काय? काळजी घेतलीय का त्याची? आमच्या आय्. टी. आय्. आहेत हे खरं आहे. पण या कराडच्या आय्. टी. आय्. मधून निर्माण झालेल्या मुलाला आताच्या टेक्नॉलॉजीवर आधारीत असलेल्या उद्योगधंद्यावर काम मिळणार आहे का ? त्याचा कोण विचार करतो. मग कराडच्या आय्. टी. आय्. मधून शिकून तयार झालेला मुलगा बेकार, मुंबईचासुद्धा आय्. टी. आय्. झालेला मुलगा बेकार आणि पनवेलचासुद्धा बेकार. का? पेट्रोकेमिकलवर आधारित इंजिनिअरिंग त्याला माहिती नाही. ही टेक्नॉलॉजी त्याच्या आय्. टी. आय्. मध्ये शिकविली जात नाही. आमचे सगळे ट्रेड हे बाबा आदमच्या जमान्यापासून चालू आहेत. सगळे आय्. टी. आय्. मधील ट्रेड सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कार्पेन्ट्री, ब्लॅकस्मिथी. आणि काय? अरे हे युग कशाचे आहे. गेल्या १५-२० वर्षापासून या आय्. टी. आय्. इमारतीतील ट्रेडस् बदललेले का नाहीत? मॅन पॉवर डेव्हलपमेंटचं हे काम का झालं नाही. आम्ही गेल्या तीन-चार वर्षापासून यासंबंधी महाराष्ट्रात हाकाटी केली तेव्हा आता टेक्निकल बोर्ड जागं झालं. त्या बोर्डावर काम करण्याची माझेवर जबाबदारी आली. आणि इंजिनिअरींग बोर्डाचे चेअरमन पदाची जबाबदारी माझेवर आली. त्या वेळी मी सांगितलं की टेक्निकल एज्युकेशन या ज्या संस्था आहेत त्याला रिसर्च आणि डेव्हलपमेंटची विंग जोडा. इंडस्ट्रीज मध्ये कोणत्या प्रकारची मॅन पॉवर पाहिजे, इंडस्ट्रीमध्ये कोणती टेक्नॉलॉजी आलेली आहे. तिला सोयीस्कर असा ट्रेड आय्. टी. आय्. मध्ये झाला, इंजिनिअरींग कॉलेज मध्ये झाला, तुमच्या आय्. टी. आय्. मध्ये झाला तरच या सर्व मंडळींना काम मिळेल. मी आपल्याला फार काही सांगत नाही परंतु हे अत्यंत हृदयद्रावक असं उदाहरण सांगतो. आणि मला एक नेहमी चिंता आहे हे हरवलेलं आहे. कायमचं हरवलेलं आहे. तुम्ही-मी आता कायमचे दुर्भागी ठरलो आहोत. बॉम्बे हायचा गॅस तुमच्या माझ्या उशाशी मिळाला पण बाँबे हायचा गॅस तुमच्या माझ्या उशाशी मिळून तुम्हाला मला झोपेत ठेवून कानपूरपर्यंत निघून गेला. आम्हाला पत्ता नाही. या गॅसवर आधारीत जी टेक्नॉलॉजी नागोठाण्याला उभी करायची म्हणून आम्ही एकोणीसशे ऐंशी सालापासून ओरडतो आहोत. एकोणीसशे शहात्तरसाली शंकररावजी चव्हाण मुख्यमंत्री होते त्या वेळी त्या गॅसचा शोध लागला. अतिशय आनंद झाला. डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहिले की केवढी प्रॉपर्टी, लक्ष्मी आपल्याकडे साक्षात देवाने दिली. आणि लक्ष्मी वापरण्याची बौद्धिक आणि तांत्रिक कुवत माझ्यामध्ये नसल्यामुळे कोट्यावधी रुपयांचा गॅस आम्ही महाराष्ट्रीय लोकांनी काडी लावून पेटवून दिला – जाळला. का? कारण त्याच सेपरेशन करण्याची जी टेक्नॉलॉजी होती त्या क्षेत्रात आम्ही अनभिज्ञ होतो? हा असोसिएटेड गॅस होता. त्यात असलेले सी-१, सी-२, सी-३, सी-४ आणि सी-५ हे स्वतंत्र आम्ही करू शकत नव्हतो. आज ते झालेले आहे. त्याच्यापैकी चूल पेटवायला काही वापरला जातो, आपल्या अंगावरील कापड विणायला जो धागा लागतो तो धागा निर्माण करण्यासाठी वापरला जातो. अनेक प्रकारचं बाय-प्रॉड्क्शन आहे. मी अशी मागणी केली होती, बॉम्बे हाय गॅसवर आधारित अशी डाऊन स्टीम इंडस्ट्रीजची जेवढी काही उत्पादने आहेत त्या उत्पादनांची टेक्नॉलॉजी समजावून सांगणारी एक प्रयोगशाळा, एक रसायनशाळा आपण उभी केली पाहिजे बाँबे हायजवळ. हे मान्य झालं, पुढे काय झालं-काही झालं नाही. पंधराशे कोटीची इस्टेट आम्ही तुम्हाला दिली. अरे पण पंधराशे कोटीची इस्टेट वापरण्यासाठी लागणा-या मॅन पॉवरचं काय करता. गॅस, तेल टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीजमधून उत्पादनं तयार करायची आहेत. त्याच्या संबंधीची निर्मितीची जर मला अक्कल नसेल तर मी काय निर्माण करणार ! महाराष्ट्रामध्ये तुम्ही केमिकल इंजिनिअरींग, गॅस प्रॉडक्टस्, सामुद्रिक उत्पादने वाढवून तुम्हाला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे. जे देवाने दिलेलं तेल ते वापरण्यासाठी लागणारी पुंजी तुम्ही कमावणार आहात का नाही. आणि ती कमावली नाही तर तुम्हाला धोका होणारच. मग तुम्ही ओरडणार आहात- कोणाच्या नावाने तुम्ही शंख करणार ? नाही मिळाला तुम्हाला एल्. पी. सी. गॅस. तो फक्त मुंबईला. परंतु त्याच्यावर प्रक्रिया करणारा एक कारखाना सोडला नऊशे कोटीचा आणि ज्याच्यामध्ये एक्झिक्युटीव्ह आणि मॅनेजरीयल कॅटेगरीमध्ये अंशतः ही मराठी माणूस नाही असा एक प्रकल्प मिळाला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org