व्याख्यानमाला-१९८६-४०

कृपा करून असं कोणी समजू नका की प्रत्येक माणसाला काहीतरी वाईट व्हावं असं वाटतं. नाही, प्राण्यालासुद्धा वाईट व्हावं असं वाटत नाही. ते सुद्धा अशी अपेक्षा करतात की आपल्यावर सगळ्यांनी प्रेम करावं, आपण नीट वागावं. मग माणूस तर असा, प्रत्येक माणसाला असं वाटतं की मी समाजामध्ये प्रतिष्ठित असलो पाहिजे, मला चांगलं जगता आलं पाहिजे, मला चांगलं राहता आलं पाहिजे. कोणीही माणूस वाईट नसतो. आणि तरी हे असं कां होऊ लागलेलं आहे याचाही आपण विचार केला पाहिजे. मी आपल्यासमोर विषय मांडत होतो तो हा की ही जी लोकसंख्या आहे वर्किंग पॉप्युलेशन दोन कोटी शहाण्णव लाख आहे. या दोन कोटी शहाण्णव लाख लोकसंख्येपैकी जवळ पास एक कोटी चोपन्न लाख लोकसंख्या ही शेतीवर आहे. राहिलेली लोकसंख्या (पहिलं सूत्र आपण लक्षात घ्या की उन्नत समाजाच्या संदर्भामध्ये प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टरची कल्पना तुमच्यापुढे मांडलेली आहे. की जेणे करून तिन्ही सेक्टरमध्ये सगळ्या समाजातल्या मंडळींना आपापल्या बौद्धिक कुवतीप्रमाणे किंवा शारीरिक ताकदीनुसार काम करण्याची संधी उपलब्ध झाली पाहिजे. त्याला ती आदर्श समाज व्यवस्था होईल.) तर ही शेतीवर जी मंडळी आहेत ती दर सहा वर्षांनी वाढते आहे. कमी होत नाही. सेकंडरी सेक्टरमध्ये आपल्या जुन्या मुंबईचा जर भाग सोडला तर आनंद आहे. एकदा हा भाग झाला आहे, पुण्या-मुंबईचा, ठाणे-पनवेलचा महाराष्ट्राचा भाग सोडला तर सेकंडरी सेक्टरमध्ये उर्वरीत महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी किती लोकसंख्या उद्योगात गुंतलेली आहे. तर ती तीन टक्के आहे, आणि आमच्या मराठवाड्यात एक टक्का, मग बाकीची लोकसंख्या कुठे आहे, प्रायमरी सेक्टरवर म्हणजे शेतीवरच. म्हणजे तुमच्याकडची मंडळी तिकडे कापडाच्या मिलमध्ये काम करण्याला जातात. त्याही कापडाच्या मिल्स उद्धस्त झालेल्या आहेत. सध्या बंदच आहेत. तेही आपल्या घरी आलेले आहेत, कोरडवाहू शेतीवर जगताहेत. परिणाम काय होऊ लागलेला आहे की या शेतीची लोकसंख्या सामावून घेण्याची जी ताकद आहे ती (इरिगेशन ज्या प्रमाणात वाढावयास पाहिजे त्या प्रमाणात वाढत नसल्यामुळे) एकीकडे कमी होत आहे. तर दुसरीकडून पावसाळे कमी होऊ लागल्याने ती उद्ध्वस्त होऊन लोकसंख्या सामावून घेण्याची ताकद आणखी कमी होत आहे. आणि तिसरीकडे वाढलेली लोकसंख्या त्याच जमिनीवर जाऊन बसत असल्यामुळे त्याचे तुकडे होऊ लागलेले आहेत. आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेला जेवढा भाग आहे तेवढा वगळता तर एकच उपद्व्याप चाललेला आहे, तो म्हणजे कोरडवाहू शेतीचे तुकडे पाडून गरिबी वाटून घेण्याचा. मग तुम्हाला आणि मला हा विचार करायला पाहिजे की, ज्या शेतीची एवढी लोकसंख्या सामावून घेण्याची क्षमता नाही त्या शेतीवरून ही माणसं दुसरीकडे उठविली पाहिजेत, त्यांचं औद्योगिकरण केलं पाहिजे. आणि औद्योगिकरणाला तुम्ही जर लेटेस्ट (अद्ययावत तंत्रज्ञान) टेक्नॉलॉजी वापरून औद्योगिकरण केलं तर तुमची त्या उद्योगामधील उत्पादन किंमत कमी होईल. जगाच्या बाजारपेठेमध्ये तुम्हाला स्पर्धा करता येईल. खरं म्हणजे हा विषय तुमच्यासमोर आज मला मांडावयाचा होता. पण मी येईन पुन्हा केव्हातरी तुमची सेवा करण्यासाठी. काय झालं आज महाराष्ट्रात जे औद्योगिकरण झालं. जी काही उद्योगशीलता आज तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये दिसते आहे ती कोणाच्या जीवावर? तर जी मंडळी आपला देश सोडून तुमच्याकडे निर्वासित म्हणून आली त्यांचा तीत मोठा वाटा आहे. जी मंडळी हातामध्ये लोटा व खांद्यावर पंचा घेऊन आली महाराष्ट्रामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. आणि हा प्रश्न केला की, असं सांगितलं जातं की ती सगळी महाराष्ट्रीय माणसं आहेत. ही लोणी चोपडण्याची भाषा माझी पिढी काही मान्य करणार नाही! पंधरा वर्षे महाराष्ट्रात राहिली तरी ही महाराष्ट्रीय माणसे आहेत. आमचं नपुसकत्व लपविण्याचा हा प्रयत्न आहे. तुमचं त्याच्यामध्ये काय योगदान आहे? तुमची उद्योगशीलता वाढली ती शेतीला पाणी मिळाल्यामुळे त्याच्यातून जे थोडंसं कृषिऔद्योगिकरण उभं राहिलेलं ते. त्यातला एक भाग पश्चिम महाराष्ट्राचा. त्याचीही आता काय अवस्था झालेली आहे हे मी सांगणार आहे. मी आता सध्या त्याच्यात काम करतो आहे. पी. डी. साहेबांना मी मघाशी सांगत होतो. या क्षेत्राचा विचार केला तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की कृषिउद्योगाचा हा भाग सोडला तर तीन टक्के लोकसंख्या आणि मराठवाडा विदर्भासारखे मागासलेले प्रांत घेतले, भाग घेतले तर दीड टक्का लोकसंख्या बिगरशेतीच्या व्यवसायावर अवलंबून आहे. आता ही मंडळी कोण आहेत, तर ज्यांनी मॅनपॉवर डेव्हलपमेंटचं काम शिस्तबद्धरीत्या केलं ती ही सगळी मंडळी आहेत. तुम्हाला एक काळ असा होता की टाईपिस्ट मराठा माणूस मिळत नव्हता. तो सुब्रह्मण्यम्-रंगनाथन किंवा वैद्यचलम् अशी माणसं आमच्या ऑफिसमध्ये कड्कट्-कड्कट् करायला आली. आज हीच माणसं काँप्युटरवर बसताहेत. जी माणसं काल टाईपरायटरवर बसत होती तीच माणसं आज पुन्हा काँप्युटरवर बसायला लागली आहेत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org