व्याख्यानमाला-१९८६-३८

आता जमीन चिबडविण्याच्या संदर्भात सांगतो (उजनी प्रकल्प) व जायकवाडीचे पाणी वाया जात आहे. ते वापरले जात नाही. पैठणखालची आणि मंगळवेढ्याकडील मंडळी हे पाणी घेत नाहीत. का घेत नाहीत याच्यासाठी जरा विचार करू. जायकवाडीचा खालचा जो भाग आहे अगदी अंबडपासून – पैठणपासून सुरू होणारा तो नांदेडपर्यंतचा दोनशे पन्नास किलोमिटरचा हा सगळा काळपोटी आहे. ज्याला आपण ब्लॅक कॉटन सॉईल म्हणतो असा आहे आणि या जमिनीला दोन किंवा तीन पाणी दिली की ही जमीन चिबडते- सलाइन होते. मग जमिन चिबडविण्याचा उद्योग करायचा का? हे पाणी घेण्याचं पाप आपण करू नये, अडचणीत येऊ नये या भीतीच्या पोटी मंगळवेढ्याचे लोकसुद्धा पाणी घेत नाहीत. कारण निम्मी काळपोटी जमीन आहे. मग पाणी देण्याच्या या पद्धतीने या मंडळींना पाणी जर घेता येत नसेल तर याला काही पर्यायी योजना आपल्याजवळ आहे की नाही? की भरपूर पाणी आहे म्हणून ते उजनीच्या जलाशयात वा जायकवाडीच्या महासागरात साठवून ठेवायचे आहे की, पूजा बांधायची आहे त्याची.

मी आपल्याला इस्रायलचं पुन्हा उदाहरण देतो. इस्रायलमध्ये मी आपल्याला सांगितलं की पाऊस पडत नाही, इस्रायलच्या बॉर्डरवरून वाहणारी जी जॉर्डन नदी आहे. साडे चारशे मिटरखाली देशाच्या. या नदीचा एक नैसर्गिक असा तलाव आहे. ‘सी ऑफ गॅलिलिओ’ असं त्याचं नाव आहे. नैसर्गिक आहे. त्याला मग थोडीशी डागडुजी करून ते पाणी वाढविलं आणि मोठ्या प्रमाणावर मध्ये जलाशय निर्माण केला आहे. आपल्याला ही गोष्ट पुन्हा एवढ्यासाठी सांगतो आहे की पुरुषार्थ कशाला म्हणतात?  महाराष्ट्र दिशाहीन होतो आहे काय? अशा प्रकारचा प्रश्न तुमच्यासमोर आहे, माझ्या समोर आहे. ही गोष्ट नक्की असते की असलेल्या साधन सामुग्रीचा अत्यंत काटेकोरपणे उपयोग करून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा पुरुषार्थ त्या समाजामध्ये आहे की नाही, आणि नसेल तर निश्चितपणे तो त्याला दिशाहीन बनवत चाललेला आहे – असं माझं म्हणणं आहे. इस्रायलची आणि जॉर्डनची चारशे पन्नास मीटर लांबीची बॉर्डर आहे. जॉर्डनने जर त्या पाण्यामध्ये विष टाकलं तर सगळा इस्रायल तडफडून मरेल. नुसतीच शेती नाही तर त्याला प्यायलासुद्धा पाणी मिळायचं नाही. एक इंच सुद्धा जॉर्डनचं विमान त्या जलाशयाकडे येणार नाही एवढा कडेकोट बंदोबस्त इस्रायलने केलेला आहे. आणि पाणी चारशे मिटर वर नेऊन पाईप लाईन संपूर्ण देशामध्ये पसरवून तुषार आणि ठिबक पद्धतीने  त्यांनी सगळ्या देशाच उत्पादन वाढविलं आहे. मग गेल्या वीस पंचवीस वर्षापासून इस्रायलसारखं राष्ट्र हे काम करून मोठ्या प्रमाणात उत्पादन काढत आहे. मग आम्हा मंडळींना अशी काय काळझोप लागलेली आहे की ही टेक्नॉलॉजी इथं वापरून असलेल्या जलाचा जास्तीतजास्त उपयोग करून उत्पादन वाढवायचं नाही? ती मंडळी करू शकतात, आम्ही का करू शकत नाही. ते पुरुष आणि आम्ही कोण आहोत. तेव्हा आपले जे प्लॅनर्स आहेत – नियोजनकार आहेत, या नियोजनकाराला इस्रायल का बंद आहे. डोळे झाकून बसलेलो आहोत आम्ही. अहो जर्मनीमध्ये चाललेलं आहे, इटालीमध्ये चाललेलं आहे. आणि आता जर्मनी, इटाली आणि इस्रायलची जी नवीन टेक्नॉलॉजी झालेली आहे. ते जास्तीचा पैसा देऊन सगळे इंजिनिअर आता अमेरिकेमध्ये जाऊन सगळी इरिगेशन सिस्टिम आता स्पीक्लर ड्रीप, मिनीस्पीक्लर, मायक्रोस्पीक्लर आणि काँप्युटरवर आलेली आहे. आज इस्रायलचा शेतकरी शेतावर काम करीत नाही. एक उन्नत समाज आपल्याला निर्माण करावयाचा आहे. म्हणून मी आपल्याला सांगतो आहे. आणि मग लोक थोडेसे थट्टेनेही बोलतात – अहो ते इस्रायल – मध्ये आहे, ते इथं काय होणार आहे. असे इस्रायलमध्ये काहीच नाही. कोणतेच ऋतू असत नाहीत. तिथं ती माणसे करतात आणि तुम्हाला सगळं व्यवस्थित करून दिल असताना तुम्ही काहीच करू शकत नाही. तिथं काँप्युटरवर शेती चालते. शेतीवर कोणी काम करीत नाही. सगळ्यात धीट माणसे आहेत ती, इस्रायलच्या सगळ्या बॉर्डरवर शत्रू आहेत. इजिप्त शत्रू आहे. पॅलेस्टिनी मंडळी अधून-मधून त्रास देत आहेत. तुमच्या आमच्या देशामध्ये अतिरेकी जे उपद्रव करतात अशी मंडळी आहेत. तेव्हा शेतावर जाऊन काम करणं धोक्याचं आहे. म्हणून इस्रायली माणूस आता आपल्या घरात बसून आपल्या खोलीतील काँप्युटरच्या साहाय्याने उत्तम शेती करतो. आपल्यापेक्षा अडीचपट जास्तीच उत्पादन काढतो. मी असं म्हणतो की काँप्युटर पर्यंत तुम्ही गेला नसला तरी ड्रीप आणि स्पीक्लरपर्यंत तुम्ही सहज जाऊ शकता आणि ही कामगिरी तुम्ही केली तर जायकवाडीचं पाणी हे आज लाख-लाख हेक्टरला पुरणारं आहे, पाणी देण्याच्या पाट-पद्धतीने जे पाणी तुम्हाला सात लाख हेक्टरला पुरते तेच पाणी तुषार आणि ठिबक सिंचन पद्धतीने सतरा-अठरा लाख हेक्टर जमिनीला पुरेल, पण ते आज फक्त तुडुंब भरलेलं आहे. ही नियोजनाची पद्धती – परिस्थिती बदलली पाहिजे असं आपल्याला वाटलं पाहिजे ते वाटत नाही. जायकवाडीचं पाणी शेतकरी घेत नाहीत आणि म्हणून ते जलाशयात तुंबून आहे. शेतीच्या संदर्भात आणखी उत्पादनाच्या संदर्भात आपणास माहिती दिली तशीच लोकसंख्येच्या संदर्भात दिली पाहिजे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org