व्याख्यानमाला-१९८६-२९

यशांचा विचार केला तर यशवंतरावांनीं दिल्लीच्या मुक्कामात देश विदेशातील मुत्सद्यांशी कौशल्याने वाटाघाटी केल्या हे प्रथम नमूद करावे लागेल. अमेरिका, ब्रिटन आणि रशिया या तीन प्रबळ राष्ट्रांशी त्यांचे संबंध आले, आर्थिक आणि लष्करी या दोन्ही क्षेत्रातील मागण्या त्यांना कराव्या लागल्या. त्याविषयी डावपेच खेळावे लागले. यशवंतराव त्या बाबतींत उणे पडले नाहीत, देशातील प्रश्नांच्या बाबतीत त्यांनीं चांगले कार्यक्रम आखले, वेळोवेळी सरकारचे व लोकांचे चांगल्या रीतीने मार्गदर्शनही केले. आणि निरनिराळ्या खात्यांचा कारभार समर्थपणे सांभाळला. त्यांचे हे यश त्यांच्या टीकाकारांनाही मान्य करावे लागेल.

पण दुस-या दृष्टीने आपण विचार करावयाला लागलो तर मला असे वाटते की दिल्लीतील अखेरच्या दिवसात यशवंतरावांच्या पदरीं काहीसे अपयशच आले. त्या अपयशाचे एक प्रमाण जनता पक्षातील फाटाफुटीच्या वेळी त्यांनी ज्या नेतृत्वाला साथ दिली त्यातून प्रकर्षाने प्रगट होते. ती वेळ व परिस्थिती अशी होती की जनता पक्षाचे नेतृत्व मोरारजी देसाई यांच्या व्यतिरिक्त कोणत्या नेत्याकडे जावे याचा खल होत असताना प्रामुख्याने दोन नावे पुढे आली होती – एक चरणसिंग आणि दुसरे जगजीवन बाबू. मला स्वतःला असे वाटते की यशवंतरावांनी जगजीवनराम यांच्या बाजूने कौल दिला असता तर जनता पक्षाची राजवट पुढील पाच वर्षेपर्यंत टिकूही शकली असती. कारण जगजीवनराम हे एक निष्णात अॅडमिनिस्ट्रेटर म्हणून नावाजले गेले होते. त्यांच्यामध्ये अनेक प्रकारच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचे मुत्सद्दीपणही होते. त्या दृष्टीने ते जनता पक्षाची आवळ्याची मोट एकत्रितपणे सांभाळू शकले असते. तथापी यशवंतरावांना त्यांच्याबद्दल विश्वास वाटला नाही याचे प्रमुख कारण असे आहे की त्यांच्या बरोबर त्याचवेळी प्रबळ असा जनसंघ आणि त्यांचे नियंते असलेली आर्. एस्. एस्. ही संघटनाही होती. त्यामुळे त्यांच्याशी आपल्याला सहकार्य करता येणार नाही असे यशवंतरावांना वाटले. त्यांनी माझ्याशी बोलताना ते स्पष्टही केले. मला आठवते, त्यावेळी मी त्यांना प्रश्न केला की आपल्या आशीर्वादाने जे शरदराव पवार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांच्या मंत्रीमंडळामध्ये जनसंघ आहे त्याचे काय? त्यावर यशवंतरावांनी स्पष्टपणे मला सांगितले “मी शरदला सांगितले होते की तू राज्यकारभार आपल्या हाती घेऊ नकोस, मला ते मान्य नाही” आता हे खरे की खोटे हे कोण सांगू शकणार? शरदरावही सांगू शकतील किंवा नाही याची शंका आहे. परंतु मला असे वाटते की त्यावेळी यशवंतरावांचे जजमेंट चुकले आणि त्यातून अखेरच्या काळामध्ये त्यांच्या पदरी अपयश आले, एवढेच नव्हे तर लोकांमध्ये अशी एक भावना निर्माण झाली की यशवंतरावांची भूमिका सतत बदलत असते आणि तिला आता तर कोणते स्थिर अधिष्ठान राहिलेले नाही.

नंतरच्या काळामध्ये त्यांनी ज्यावेळी घोषणा केली की मी स्वगृही जात आहे त्याचा अर्थ साधारणपणे लोकांनी असा केला की यशवंतराव चव्हाण यांचा हा पराभवच आहे. अर्थात याबद्दल जो तो आपल्या परीने चिकित्सा करू शकेल. माझ्या दृष्टीने मात्र ज्या परिस्थितीत यशवंतरावांनी हा निर्णय घेतला त्याचा विचार केला तर यशवंतरावांचे हे अपयश मानता येणार नाही. त्याचे कारण असे आहे की यशवंतरावांनी ज्या काँग्रेसबद्दल निष्ठा बाळगली होती ती गांधी-नेहरूंची काँग्रेस होती, तीच पुढे इंदिरा काँग्रेस झाली. अर्थात काँग्रेसमधील दुफळीनंतर ती इंदिरा काँग्रेस म्हणून ओळखली जाऊ लागली. आता १९७०, ७१, ७२ साली ही काँग्रेस अत्यंत प्रबळ झाली. १९७७ साली तिच्या पदरी अपयश आले. पण १९८० साली इंदिरा गांधी यांनी पुन्हा निवडणूका जिंकल्या आणि आपल्या काँग्रेसची अधिकच घट्ट पायावर त्यांनी प्रतिष्ठापना केली. या प्रतिष्ठापनेला मान्यता देणे अपरिहार्य होते. यशवंतरावांनी ती मान्यता देताना निःसंकोचपणे जाहीर केले की इंदिरा काँग्रेस हीच खरीखुरी गांधी नेहरूंची काँग्रेस आहे आणि म्हणून आपण स्वगृही परत जात आहे. माझ्या मते यशवंतरावांनी काही अपेक्षा, आकांक्षा डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला नव्हता. त्यांना त्यातून काही साध्य करावयाचे होते असेही मला वाटत नाही. या बाबतीत त्यांचे माझे जे वेळोवेळी बोलणे झाले होते त्याचा मी निर्वाळा देऊ शकतो. हा निर्णय घेण्यापूर्वी कित्येक दिवस आधी त्यांनी मला सांगितले होते की मला जे काही मिळवावयाचे होते ते मी मिळवले आहे. आता मला कोठलीही अपेक्षा, आकांक्षा राहिलेली नाही. त्या भूमिकेमागे त्यांचा एक दृष्टीकोण होता तो मात्र स्पष्ट केलाच पाहिजे. माझ्याशी बोलताना त्यांनी मला म्हटले होते “यातून मला स्वतःला काही साध्य करून घ्यावयाचे नाही. परंतु माझ्याबरोबर जी माणसे राहिली, सतत राहिली, निस्वार्थीपणे लढत राहिली त्यांची परिस्थिती आता दुर्धर होत चालली आहे. त्यांना यापुढे मी फार काळ अंधारात ठेवू इच्छित नाही. माझे जे एकनिष्ठ अनुयायी आहेत, जे अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या पाठीमागे आलेले आहेत, माझ्यासाठी ज्यांनी अतिशय कष्ट उपसले आहेत, त्याग केला आहे, यातना सहन केल्या आहेत त्यांच्यासाठी इंदिरा काँग्रेसमध्ये जाण्याखेरीज माझ्यापुढे मार्ग राहिलेला नाही. त्यांचे भवितव्य यातून घडेल अशी माझी धारणा आहे” ती धारणा ठेवून यशवंतरावांनी इंदिरा काँग्रेसमध्ये पदार्पण केले. त्यानंतरचा सारा इतिहास आपल्यापुढे उभा आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org