व्याख्यानमाला-१९८६-२७

इंदिराजी डावपेच खेळण्यात मोठ्या प्रवीण होत्या. बंगलोरच्या बैठकीत त्यांनी आकस्मिकपणे बाबू जगजीवनराम यांचे नांव राष्ट्रपतिपदासाठी पुढे आणले. पण स्वतः जगजीवनराम राष्ट्रपतीपदी प्रतिष्ठित व्हावयाला तयार नव्हते. त्यांनी लगेच जाहीर केले की, “मी इतका काही म्हातारा झालेलो नाही की प्रत्यक्ष सक्रीय राजकारण सोडून मी राष्ट्रपती बनावे.” एवढे खरे की बंगलोरच्या बैठकीने इंदिरा गांधी यांचा तात्पुरता का होईना पराभव केला. मी म्हणतो ‘तात्पुरता’ कारण त्यानंतर इंदिरा गांधी यांनी लगेच असा एक पवित्रा घेतला की ज्यामुळे सारे राष्ट्र हादरून गेले. दिल्लीतील डावपेचाच्या दृष्टीनेही या पवित्र्याने कळस गाठला असे म्हटले पाहिजे.

या डावपेचाचे दोन भाग होते. एक आघात करणारा आणि दुसरा क्रांतिकारक पण विधायक स्वरूपाचा. त्यांनी आघात केला तो मोरारजी देसाई यांच्यावर. मोरारजी देसाई यांचे त्यांनी अर्थमंत्रिपदावरून उच्चाटण केले. त्याचबरोबर त्यांनी चौदा बँकांच्या राष्ट्रीयीकरणाची घोषणा केली. आता बँकांच्या राष्ट्रीयीकरणाची हिरीरीने भूमिका घेतली होती ती यशवंतरावांनी. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्र काँग्रेसने बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा ठराव आधीच मंजूर करून घेतला होता. त्या दृष्टीने महाराष्ट्राने या विषयावर अग्रस्थान पटकावले होते, पण त्याबद्दलची प्रसिद्धी मात्र भारतात करण्यात आलेली नव्हती वस्तुतः यशवंतराव दिल्लीत असल्यामुळे त्यांना ही प्रसिद्धी मिळविता आली असती आणि या विषयावर महाराष्ट्र काँग्रेस अग्रस्थानी असल्याचे श्रेयही मिळविता आले असते. पण वृत्तपत्रांना आणि वार्ताहरांना महत्व देण्याच्या बाबतीत यशवंतरावांनी नेहमीच अनास्था दाखविली आणि दिल्लीतील मातबर वार्ताहरांची तर त्यांनी उपेक्षा केली हे एक कटू सत्य आहे.

आता इंदिरा गांधी यांनी दुहेरी डावपेच टाकून आपल्या प्रतिपक्षीयांना अक्षरशः नामोहरम करून टाकले होते. यशवंतरावांपुढे सुद्धा असा एक पेच निर्माण झाला होता की मोरारजीभाई यांच्या विरुद्ध केलेल्या कृतीबद्दल नापसंती व्यक्त करावी तर बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या ऐतिहासिक निर्णयाला दुय्यम स्थान दिले असा त्यांच्यावर आक्षेप येण्याचा संभव होता. म्हणून त्यांनी विचारांती पहिल्या विषयाबद्दल मौन धारण केले आणि बँकांच्या राष्ट्रीयीकरणाबद्दल मात्र इंदिरा गांधींचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यात त्यांनी हेही सूचित केले की यापुढे त्या जी जी पावले टाकतील त्यात आपले हार्दिक सहकार्य त्यांना लाभेल आणि आपल्या निष्ठेबद्दल इंदिरा गांधी यांनी अणुमात्रही संदेह बाळगू नये.

सिंडिकेटला अर्थातच हे मान्य नव्हते. त्यांनी काँग्रेसमध्ये दुफळी पाडण्याचा निर्णय घेतला आणि मग या गटाने त्या गटाला पदच्युत करणे, एका गटाने दुस-या गटाविरुद्ध विषारी प्रचार करणे आणि खरी काँग्रेस कोणती याबद्दलचा वाद अटीतटीने लढविणे या सर्व राजकारणाला ऊत आला. यशवंतरावांच्या पुरते एवढे म्हणता येईल की त्यांनी जी भूमिका घेतली ती एकजुटीची भूमिका होती आणि त्यापासून ते पुढे ढळले नाहीत. इंदिरा निष्ठेचीच ही भूमिका होती असेही तिच्याबद्दल म्हणता येईल. त्यावेळी मुंबईमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे जे शिबिर यशवंतरावांनी भरविले होते त्यात अधिकृतपणे एकजुटीचा हा ठराव त्यांनी मंजूर करून घेतला. त्यावेळी भाषण करताना यशवंतरावांनी कळकळीने सांगितले की जे काही झाले गेले ते विसरून जा आणि काँग्रेसच्या निष्ठेने कार्याला लागा. एकजुटीच्या ठरावाचे समर्थन करताना के. के. शहा यांनी असे म्हटले की हा ठराव म्हणजे काँग्रेसची गीता, कुराण आणि बायबल आहे, असे मानून आपण मागील इतिहासावर पडदा टाकला पाहिजे. यशवंतरावांची ही भूमिका त्यावेळी इंदिराजींनाही मान्य झाली होती हे मी निःसंदिग्धपणे सांगू शकतो. खरे तर त्यांनाही आधार हवा होता आणि यशवंतरावांचा आधार मिळाल्याबरोबर त्यांनाही खात्री पटली की आपले राजकीय स्थान आता डळमळीत होणार नाही. पुढील काळामध्ये इंदिराजींनी जी जी पावले टाकली ती यशवंतरावांच्या सल्लामसलतीने टाकली यात तिळमात्रही संशय नाही.  

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org