व्याख्यानमाला-१९८६-२५

ही झाली १९६४ सालची गोष्ट. १९६६ साली शास्त्रीजींच्या निधनानंतर त्यांचा वारसदार कोण असावा याबद्दल पुन्हा प्रश्न निर्माण झाला. याही वेळी यशवंतराव परदेशी होते. ते ताश्कंदला शास्त्रीजींना सहाय्य करीत होते. ताश्कंदच्या करारावर सही झाल्यानंतर शास्त्रीजींचे आकस्मिक निधन झाले. यावेळी मात्र यशवंतरावांनी पद्धतशीरपणाने पुढाकार घेतला हे मला प्रत्यक्ष माहीत आहे. त्यांनी पहिल्या प्रथम जाऊन इंदिराजींची भेट घेतली आणि त्यांना एवढेच सांगितले की “आपण जर उभ्या राहणार असला तर मी आपल्याला पाठिंबा देईन, आणि जर आपण उभ्या राहणार नसला तर मात्र आपण मला पाठिंबा द्यावा.” अर्थात, कामराज यांना हे मान्य नव्हते. त्यांना असे वाटले की इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाल्या तर आपले जे सिंडिकेट आहे त्याचे प्रभुत्व कायम राहील कारण इंदिराजी अनभिज्ञ आहेत. राजकारणामध्ये मुरलेल्या नाहीत तेव्हा त्यांना प्रधानमंत्रीपद देण्यात आले तर आपण आपल्या पद्धतीने राज्यकारभार चालवू शकू, म्हणजे राज्यकारभारावर आपली छाप कायम राहू शकेल. त्या विचाराने त्यांनी इंदिरा गांधी यांचे  नाव पुढे आणले. ते यशस्वी रीतीने मंजूरही करून घेण्यात आले. यावेळी मात्र यशवंतरावांच्या कॉन्सेन्ससला वाव मिळाला नाही. कारण मोरारजीभाईंनी निवडणूक लढविण्याचे ठरविले. या अटीतटीच्या लढाईत मोरारजी यांचा पराभव झाला आणि इंदिरा गांधी तिस-या प्रधानमंत्री म्हणून निवडून आल्या.

आता इथे थोडेसे मी विषयान्तर करू इच्छितो. मोरारजी भाई तात्विक दृष्ट्या आपली भूमिका पक्केपणाने अमलात आणतात असा एक समज त्यांच्या बाबतीत रूढ आहे. विशाल द्वैभाषिकाच्या मुख्यमंत्रिपदाची निवड करावयाची वेळ आली तेव्हां मोरारजीभाईंनी अशी भूमिका घेतली की मला जर कोणाचा विरोध झाला तर मी पदासाठी उभा राहणार नाही आणि हिरे हे दंड थोपटून उभे राहिल्यानंतर ते खरोखरच उभे राहिले नाहीत आणि मग भाऊसाहेब हिरे व यशवंतराव यांच्यामध्ये सामना होऊन त्यात यशवंतराव मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. परंतु यावेळी मोरारजीभाईंना आपले ते तत्व आठवले नाही. कदाचित् त्यांना स्वतःलाच जाणीव झाली असावी की ही नीती चालणार नाही. राजनीतीचाच आपल्याला अवलंब केला पाहिजे. म्हणून प्रधानमंत्रीपदासाठी होणारी निवडणूक त्यांनी लढविली पण तीत त्यांचा पराभव झाला.

इंदिरा गांधी यांच्या प्रधानमंत्रीपदाच्या कालखंडाकडे आता आपण वळूया. त्या ज्यावेळी पार्लमेंटमध्ये प्रथम आल्या त्यावेळी राममनोहर लोहिया यांनी एकच उद्गार काढला “अरे यह तो गुंगी गुडिया है” गुंगी गुडिया म्हणूनच त्यांनी इंदिरा गांधींकडे पाहिले. इतर बरेच लोकही तसेच म्हणू लागले. त्यावेळी खुद्द कामराज यांना वाटले की, इंदिराजींना फार दिवस राज्य करता येणार नाही, आपण आज ना उद्या त्यांच्या हातातून सत्ता घेऊ शकू किंवा त्यांना आपल्या धोरणाप्रमाणे वागावयाला आपण भाग पाडू. परंतु त्यांची ही अपेक्षा आणि अनेकांचे इंदिराजींच्या बाबतीतील भाकित खोटे ठरले कारण इंदिरा गांधी यांनी थोड्याच दिवसात आपला अधिकार प्रस्थापित केला आणि पार्लमेंटमध्येही त्या प्रभावी भाषणे करू लागल्या. त्यानंतर काँग्रेसच्या प्रत्येक कार्यवाहीमध्ये त्या भाग घेऊ लागल्या आणि काँग्रेस सबळ करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्नही केले. तथापी १९६७ साल आले आणि त्या साली काँग्रेसचा अनेक प्रांतांमध्ये पराभव झाला. उत्तरेकडील प्रांतामध्ये तर हा पराभव विशेषेकरून झाला आणि काँग्रेसची सत्ता विधायक दलाच्या हाती गेली. यावेळी अनेक पक्ष एकत्र येऊन त्यांनी विधायक दल बनविले होते हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. काँग्रेसचा हा सर्वात मोठा पराभव होता आणि इंदिरा गांधी यांना ते सर्वात मोठे आव्हान होते. इंदिरा गांधी यांच्या बाबतीत एक गोष्ट निश्चितपणाने सांगता येईल की त्यांच्या इतकी धीराची आणि जिद्दीने लढणारी बाई पृथ्वीतलावर मिळणार नाही. १९७० साली त्याची उभ्या राष्ट्राला आणि जगाला प्रचीती आली. त्या साली बांगलादेशचे युद्ध पेटले आणि तुम्हाला सांगतो की इंदिरा गांधी यांनी त्यांचे सारे सामर्थ्य पणाला लावले. स्वतः निर्णय घेण्याची त्यांची क्षमता, जिद्दीने लढाई करण्याची त्यांची ताकद यांचा कळस केला. ते युद्ध जिंकल्यानंतर त्यांचे कट्टर विरोधक असलेले वाजपेयी यांनी त्यांची कालीमातेशी तुलना केली हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. म्हणजे ही सामान्य बाई नव्हे ती प्रत्यक्ष कालीमाता दुर्गामाताच आहे अशी त्यांनी घोषणा केली. त्यांच्या तेजस्वी पराक्रमाने सारे राष्ट्रच भारावून गेल्यासारखे झाले होते. त्यानंतर १९७१-७२ साली पार्लमेंटच्या निवडणुका झाल्या, विधानसभांच्या निवडणुका झाल्या आणि त्यात इंदिरा गांधींना प्रचंड बहुमत मिळाले. त्याचक्षणी इंदिरा गांधी यांची राजवट या देशामध्ये रूजली इतकेच नव्हे तर ती अत्यंत प्रभावीपणे मार्ग आक्रमण करू लागली. यशवंतरावांचे त्यावेळचे कार्य अतिशय महत्वाचे होते. ते आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये जे सहकार्य निर्माण झाले ते इतके घनिष्ट होते की इंदिरा गांधी यांच्या किचन कॅबिनेटचे ते सभासद झाल्याचे जाहीर केले गेले. किचन कॅबिनेट म्हणजे अगदी अंतस्थ गट. त्या गटामध्ये सुद्धा यशवंतरावांची गणना केली जात होती. यशवंतरावांनी पूर्ण विचारांनी इंदिरा गांधी यांना आपले सहकार्य अर्पण केले आणि मग ज्या ज्या अडचणी येतील त्या दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या परीने शिकस्तीचे प्रयत्न केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org