व्याख्यानमाला-१९८६-२४

सहज आठवले म्हणून सांगतो, काँग्रेसच्या प्रचंड मिरवणुकी होत होत्या. जयघोष निनादत होता, सभाही भव्य होत होत्या. पण शास्त्रीजी किती विचारी होते, त्यांचे जजमेंट किती अचूक होते याचा प्रत्यय दोन दिवसांनी त्यांची माझी भेट झाली त्यावेळी त्यांच्या बोलण्यातून मला आला. मांडवी हॉटेलमध्ये नास्ता घेत असताना त्यांनी मला सहज प्रश्न केला, “कर्णिकजी चुनाव के बारे मे आपका खयांल क्या है?” मी एवढेच म्हटले “काँग्रेसला ५/६ सीटस् सहज मिळतील” त्यावर शास्त्रीजींनी तात्काळ उत्तर दिलं “यह होनेवाला नही है, मामला अपने खिलाफ है” शास्त्रीजींनी दोन दिवसांच्या आत सबंध परिस्थिती पाहिली होती आणि त्यांचे जजमेंट असे झाले होते की काँग्रेसला गोव्यामध्ये यश मिळणआर नाही, ज्याला राजकीय आडाखे म्हणतात ते आडाखे बांधल्यानंतरच व्यक्ती किंवा नेता पुढे जाऊ शकतो. शास्त्रीजींचा मोठेपणा असा की गोव्याच्या परिस्थितीबद्दल त्यांनी जो अंदाज बांधला होता तो थोड्याच दिवसात अचूक ठरला. कारण १९६३ सालच्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. भाऊसाहेब बांदोडकर यांनी आपल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला भव्य विजय मिळवून दिला होता.

यशवंतरावांच्या बाबतीत मला एवढेच म्हणावयाचे आहे की दिल्लीमध्ये त्यांनी आपल्या ध्येयदृष्टीचा प्रत्यय आणून दिला आणि आपली पावले विचारीपणानेही टाकली. पण त्यांनी आपले विचार प्रकट करून नेतृत्वाचा कस मात्र दाखवून दिला नाही. त्यांनी विचारीपणाने पावले टाकली. पण तो विचारीपणा फारच सावधानपणाचा ठरला इतका की नेतृत्वाच्या स्पर्धेत ते हिरीरीने पुढे सुद्धा आले नाहीत. त्यामुळे पुढे सगळे प्रश्न निर्माण झाले, वारसदारीचा प्रश्न पंडितजींच्या निधनानंतर पुढे आला पण यशवंतरावांना स्थान मिळाले ते दुय्यम प्रकारचे होते. वृत्तपत्रांतून जी प्रतिमा त्यांची निर्माण झाली ती दुय्यम प्रकारचीच होती. वृत्तपत्रांशी आणि वार्ताहरांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवण्यात यशवंतरावांनी जी अनास्था दाखविली तिच्यामुळेच त्यांची प्रतिमा तेजाने उजळून निघाली नाही.

पंडितजींचे निधन झाले त्यावेळेचा आपण विचार करूया. ते त्यावेळी अमेरिकेत होते. अमेरिकन परराष्ट्रमंत्री डीन रस्क यांनी त्यांना फोन करून ही वार्ता दिली आणि म्हटले “सारे कार्यक्रम रद्द करा आणि माझ्याबरोबर चला म्हणजे पंडितजींच्या अंतयात्रेला आपण हजर राहू शकू.” दिल्लीतील वातावरण त्यावेळी असे स्फोटक होते की नेतृत्वपदी कोण येईल याचा नियम नव्हता. मोरारजीभाईंनी नेहमीच्या उतावीळपणाने म्हणा किंवा हेकटपणाने म्हणा त्यावेळी एकदम जाहीर केले की “मी या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे, प्रधानमंत्रीपदावर बसण्याचा माझा हक्क आहे.” आता पंडितजींचे अंत्यसंस्कार दुस-या दिवशी व्हावयाचे होते. त्याआधीच मोरारजींनी असे निवेदन करणे हे खात्रीने औचित्यपूर्ण नव्हते. त्यांच्या या चुकीचे फळ त्यांना भोगावे लागले. यशवंतरावांच्या तालमीत तयार झालेले वसंतराव नाईक यांनी मात्र विमानतळावरून तडक शास्त्रीजींचे निवासस्थान गाठले. त्यांनी मुंबईहून येतायेताच आपला विचार पक्का केला होता आणि प्रधानमंत्रीपदासाठी शास्त्रीजींची निवड केली होती. त्यांनी शास्त्रीजींना सांगितले “आम्ही प्रधानमंत्रीपदासाठी आपली निवड केली आहे आणि आपण त्याला संमती दिली पाहिजे.” लालबहादुर असे चाणाक्ष आणि हिकमती की त्यांनी तोपर्यंत एक अवाक्षर सुद्धा काढले नव्हते. त्यांना कोणी विचारले की ते लगेच म्हणत “हा पक्षाचा प्रश्न आहे. पक्षांचे नेतृत्व जे काही ठरवील ते मला मान्य आहे.” त्यांनी पुढे असेही सूचित केले की “पंडितजींची कन्या इंदिराजी आहेत. त्या जर प्रधानमंत्री झाल्या तर मला फार आनंद होईल आणि मग कोणताही प्रश्नच उभा राहणार नाहीं.”

आता त्यावेळी काँग्रेसचा खरा नियंता जर कोणी असेल तर ते कामराज होते. सिंडिकेटचे ते मुख्य होते. सिंडिकेटमध्ये अतुल्य घोष, स. का. पाटील, संजीव रेड्डी अशी मातबर नेतेमंडळी होती. कामराज आणि सिंडिकेट यांनी एक गोष्ट ठरविली होती की काही झाले तरी मोरारजी देसाई यांना प्रधानमंत्री केले जाऊ नये. यशवंतरावांना जेव्हां विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनीच प्रथम ‘कॉन्सेन्सस’ हा शब्दप्रयोग उच्चारला. ते म्हणाले “कॉन्सेन्ससनेच या बाबतीतला निर्णय झाला पाहिजे.” सर्वसंमत अशा निवडीबद्दलचा पर्याय यशवंतरावांनीच अशा रीतीने सुचविला. कॉन्सेन्सस घेण्याचे कार्य अर्थातच कामराज यांच्याकडे सोपविण्यात आले होते. त्यांचा मोरारजी देसाई यांच्याबद्दलचा निर्णय आधीच ठरलेला असल्यामुळे दुसरे नाव जे लालबहादुर शास्त्री यांचे होते ते सर्वसंमतीने मंजूर झाले. कॉन्सेन्ससचा पर्याय स्वीकारला गेल्यामुळे त्यावेळी निवडणूक घेण्याचीही वेळ आली नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org