व्याख्यानमाला-१९८६-२३

यशवंतरावांचे ध्येयधोरण सुद्धां याच प्रकारचं होतं ते यशस्वी ठरले, अगदी प्रत्येक खात्यात. त्याचे कारण असे आहे की अतिशय श्रेष्ठ, हुशार, बुद्धिमान् आणि अभ्यासू अशा व्यक्तींची ते निवड करीत असत आणि कारभाराचे सर्व काम ते त्यांच्याकडे सोपवून मोकळे होत असत. त्यामुळे कामाच्या बाबतीत कोठल्याही प्रकारचे पेचप्रसंग त्यांच्यापुढे कधीही आले नाहीत. यशस्वी कारकीर्द जी त्यांची झाली त्याचे कारण असे आहे की ते आपल्या अधिका-यांवर विश्वास टाकीत असत आणि अधिका-यांनाही त्यांच्याबद्दल नितांत विश्वास वाटत असे.

आता यशवंतरावांनी ज्या एका गोष्टीकडे दुर्लक्ष केले त्याबद्दलची हकीकत मी तुम्हाला सांगतो. दिल्लीमध्ये अत्यंत प्रबळ अशी जर कोणती एक शक्ती असेल तर ती वृत्तपत्रे ही होय. त्यात वृत्तपत्रांच्या संपादकांचा जसा समावेश होतो, तसाच वार्ताहरांचाही, “स्पेशल कॉरेस्पॉण्डट” म्हणून ज्यांना म्हटले जाते त्यांच्या हाती तर राजकारणी पुरुषांचे भवितव्य घडविण्याचे सामर्थ्य असते. प्रधानमंत्री आणि प्रत्येक मंत्री यांच्याकडे खास लक्ष पुरवीत असतात. पंडितजींची तर अशी प्रथा असे की मंत्रिमंडळात फेरबदल करताना नव्या मंत्र्यांची निवड करताना त्याचप्रमाणे राष्ट्रीय धोरणांची आखणी करताना काही प्रथितयश वार्ताहरांच्या तर्फे भावी घटनांबद्दल ते वावड्या उडवीत असत. आपल्या कृतीबद्दलच्या प्रतिक्रिया काय होतात, आपले ध्येयधोरण कशा रीतीने जनमनाचा ठाव घेते हे अजमावून पहाण्याचा एक मार्ग म्हणून ते या वावड्या उडविण्याला सहाय्यभूत होत असत. त्यासाठी ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरला काही प्रमुख पत्रकारांना ते बोलावून घेत असत आणि त्यांच्याशी ते खाजगीपणे विचारविनिमय करीत असत. काही वृत्तपत्रातून काही वेळी असा काही मजकूर प्रसिद्ध होत असे की ज्यातून पंडितजींच्या ध्येयधोरणाची चुणुक लोकांना पहावयाला मिळत असे. म्हणजे त्यातील बातम्यानुसार प्रत्यक्षपणे कार्य होत असे असे मुळीच नव्हे. पंडितजी लोकांच्या प्रतिक्रिया बघून आपले निर्णयही बदलत असत. पण वार्ताहरांशी स्नेहसंबंध ठेवून ते आपला कार्यभाग मात्र साध्य करून घेत असत. वृत्तपत्रकारांशी असा स्नेहबंध निर्माण करण्याचा यशवंतरावांनी कधीच प्रयत्न केला नाही अशी माझीच नव्हे तर अनेक पत्रकारांची त्यांच्याबद्दल तक्रार होती. वृत्तपत्रे ही ‘फोर्थ इस्टेट’ म्हणून मानली जाते आणि त्यांचे आपण सहकार्य घेणे आवश्यक आहे याची यशवंतरावांनी जाणीवच ठेवली नाही. त्याचा परिणाम असा झाला की एक समर्थ, कर्तबगार आणि राष्ट्राचे भवितव्य घडवून आणणारे पुढारी म्हणून वृत्तपत्रातून त्यांची प्रतिमा कधीच प्रगट झाली नाही.

यशवंतराव चव्हाणांचे वैभव मी गोव्यामध्ये पाहिले होते. १९६३ साली गोव्यामध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या वेळी संरक्षणमंत्री म्हणून पहिल्या प्रथमच निवडणुकीत भाग घेण्यासाठी यशवंतराव आलेले होते. सबंध गोव्यातील जनसमुदाय दाभोळी विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी जमा झालेला मी पाहिला. योगायोग असा की त्यावेळी त्याच विमानाने किंवा त्याच्या आधीच्या विमानाने लालबहादूर शास्त्रीही आले होते. ते निरीक्षक म्हणून आलेले होते. गोव्यातील परिस्थिती पाहण्यासाठी आणि हाताळण्यासाठी काँग्रेसने त्यांना पाठविले होते. काँग्रेसच्या निवडणुकीतील परिस्थितीबद्दल त्यांना अंदाज घ्यावयाचा होता, ती समजावून घ्यावयाची होती. त्यावेळी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष प्रबळपणे पुढे आलेला होता. आणि तो काँग्रेसला विरोध करीत होता. तेव्हां अशा परिस्थितीत काँग्रेसचे चॅन्सेस तरी काय आहेत हे पहाण्यासाठी काँग्रेस श्रेष्ठीनी लालबहादूर शास्त्री यांना पाठविले होते. मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे म्हणून सांगतो लालबहादूर शास्त्री विमानतळावर एकटे बसलेले होते. माझी आणि शास्त्रीजींची पूर्वीची ओळख होती म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. त्याचक्षणी यशवंतरावांची भव्य मिरवणूक सुरू होण्याच्या बेताला आली होती. मी शास्त्रीजींना म्हटले, “आपण मिरवणुकीत सामील होत नाही का?” त्यावर शास्त्रीजी लगेच म्हणाले “अरे भाई, यह जुलूस मेरा नही है, यह डिफेन्स मिनिस्टर के सन्मान में चल रहा है” आणि मग शांतपणे ते आपल्या वाहनाची वाट पहात बसले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org