व्याख्यानमाला-१९८६-२०

पुन्हा ज्यावेळी दुसरी वेळ आली तेव्हां पंडितजींच्या पुढे प्रश्न आला की राष्ट्रपतीपद कोणाला द्यावे? पंतप्रधान या नात्याने त्यांना आपला अधिकार गाजविता आला असता. पण काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे, पुढा-यांचं मत काय आहे हे समजावून घेतल्याशिवाय पंडितजी हे कुठलेही पाऊल टाकत नसत. त्यांची इच्छा होती की डॉ. राधाकृष्णन् यांना हा सन्मान देण्यात यावा. त्यांनी आपल्या मनाशी ही निवड केलीही होती पण राजेंद्र प्रसाद यांच्याच बाजूने काँग्रेस पक्षाचा कौल पडला. आणि पंडितजींनी पुन्हा एकदा लोकशाहीचा निर्णय स्वीकारला. हा निर्णय त्यांनी स्वतः मात्र राधाकृष्णन् यांना कळविला नाही.

दिल्लीमधील बारा वर्षाच्या वास्तव्यात मला जे प्रत्यक्ष अनुभव आले आहेत त्यांच्या अनुरोधाने मी सांगू शकतो की पंडितजींनी हे काम मौलाना आझाद यांच्याकडे सोपविले. दिल्लीतील राजकीय डावपेचाचाच हा एक प्रकार होय.

मौलाना आझाद हे दिल्लीतील त्यावेळचं एक प्रस्थ होतं. राजबिंडे असे त्यांचे नेतृत्व होते. ज्याला कमांडिंग पोझिशन म्हणता येईल ती त्यांच्यापाशी होती. त्यांनी राधाकृष्णन् यांना शांतपणानं समजावून सांगितलं. एक फारशी शेरही त्यांनी ऐकविला. त्या शेरात असं सांगितलं होतं की वाट पाहणं, पेशन्स दाखविणं ही एक महत्वाची गोष्ट आहे. राधाकृष्णन् यांनी तो संदेश ऐकला. पंडितजींनीही आपली आकांक्षा बाजूला ठेवली आणि आपल्या पक्षाचा जो निर्णय आहे ते शिरसावंद्य मानला.

हे सगळे डावपेच सुरुवातीपासून खेळले जात होते. पंडितजी सरदार पटेल, पटेल आणि मौलाना आझाद, पंडितजी आणि रफी अहमद किडवाई यांच्यामध्ये वेळोवेळी संघर्ष होत असत. व्यक्तिगत संघर्ष सुद्धा होत असे. परंतु यापैकी एकाही पुढा-याला असं वाटलं नाही की आपलं म्हणणं मान्य झालं नाही म्हणून बाहेर पडावं आपण. त्यापैकी कोणत्याही पुढा-याच्या मनातही असं आलं नाही आणि त्यांनी ते केलंही नाही. पंडितजींच्या समोर असे अनेक पेच यावयाचे आणि प्रत्येक वेळी त्यातून ते मार्ग काढावयाचे.

कालच्या भाषणात मी पार्लमेंटातील डेप्युटी लीडरच्या निवडीचा उल्लेख केला होता. त्या बाबतीत पंडितजींनी एक अभिनव तोडगा काढला. त्याला मी डावपेच असे म्हणतो. त्यांनी सांगितलं की डेप्युटी लीडर एकच न निवडता, लोकसभेसाठी एक आणि राज्यसभेसाठी एक असे दोन डेप्युटी लीडर निवडावे. म्हणजे डेप्युटी लीडर हा पुढे वारसदार म्हणून मानला जावा ही जी समजूत झाली होती तिच्यावरच पंडितजींनी आघात केला. पंडितजी जे डावपेच लढवीत असत ते मोठ्या कौशल्याने आणि विलक्षण चाणाक्षपणाने लढवीत असत.

कामराज योजना अमलात आणतांना त्यांनी भावी काळचा वारसदार निवडण्याच्या बाबतीत अडचण येऊ नये अशा पद्धतीने सारा बनाव घडवून आणला. वरकरणी त्यांनी असा भास निर्माण केला की काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी या मंत्र्यांचा ते उपयोग करून घेणार आहेत. पण त्यांच्या योजनेची चीरफाड करताना स. का. पाटील यांनी पंडितजींच्यावर सरळ आरोप केला की पुढेमागे वारसदार होऊ शकतील अशी माणसे बाजूला काढण्याच्या हेतूनेच पंडितजींनी हा व्यूह रचला. आता पंडितजींच्या अंतरंगात काय शिजत असेल या भाकित कोण करू शकेल. आपण एवढीच समजूत करून घ्यावयाची की दिल्लीमध्ये असे डावपेचाचे प्रकार नेहमीच घडत आलेले आहेत. एवढे खरे की दिल्लीला जाण्यापूर्वी यशवंतरावांना याची पुरेपूर जाणीव होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org