व्याख्यानमाला-१९८६-१६

याच विचाराने कम्युनिस्ट पक्षाचेही आकर्षण त्यांनी टाळले. त्या वेळचा कम्युनिस्ट पक्ष हा जितका प्रबळ होता तितकाच तरुण मनावर मोहिनी घालण्याइतका ध्येयवादीही होता. विशेषतः सोव्हियट राज्यक्रांतीचे जे वलय त्याच्याभोवती उभे होते त्यामुळे यशवंतरावांच्या सारख्या संस्कारक्षम तरुण पुढा-याला त्याचे आकर्षण वाटणे क्रमप्राप्त होते. स्वतः यशवंतरावांनाही काही काळ असे वाटू लागले होते की आपण कम्युनिस्ट पक्षाच्या तर आहारी जाणार नाही ना? पण विचारीपणा आणि काँग्रेस निष्ठा यांचे आकर्षण त्यांच्या बाबतीत अधिक प्रबळ ठरले आणि पुढे कधीही काँग्रेस प्रवाहापासून ते विचलित झाले नाहीत.

प्रत्येक पेचप्रसंगात त्यांना काँग्रेस संस्कृतीचा स्थायीभाव झालेल्या मतपरिवर्तनाच्या भूमिकेने खराखुरा आधार दिला यात संशय नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी त्यांनी पंडितजींच्या मतपरिवर्तनावर भर दिला. त्याचप्रमाणे संयुक्त महाराष्ट्रातील जे घटक विभाग होते त्यांच्या नेत्यांना धीर, आधार देऊन आणि त्यांच्या मागण्यांचा अत्यंत सहानुभूतीने विचार करून त्यांनी महाराष्ट्र स्थापनेच्या मार्गातील सर्व अडसर दूर केले. त्यांनी जो नागपूर करार केला ते त्यांच्या सहिष्णुतेच्या आणि दूरदृष्टीच्या धोरणाचे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण होय. त्यांनी विदर्भाचे सर्व नेते मग ते कन्नमवार असोत की खेडकर असोत त्यांना कळकळीने सांगितले की तुम्ही संयुक्त महाराष्ट्रासाठी जो त्याग करीत आहात, त्या त्यागाचे आम्ही चीज करू. विदर्भाच्या ज्या काही मागण्या असतील, जे काही हक्क आणि सवलती तुम्हाला हव्या असतील त्या मान्य करण्याच्या दृष्टीने आम्ही कोणतीही कुचराई करणार नाही. यशवंतरावांनी हे नुसते आश्वासन दिले नाही, तर आपल्यापरीने त्यांनी ते तंतोतंत पाळले. त्यांना ही जाणीव होती की आपल्याला मिळणार असलेल्या राज्याचा कोणीही सुखासुखी त्याग करीत नाही. तर त्यांना महाराष्ट्राशी एकरूप होण्यासाठी महाराष्ट्रानेही त्यागबुद्धी आणि न्यायबुद्धी दाखविली पाहिजे. तेवढ्यासाठी त्यांनी नागपूर करारान्वये विदर्भाचे सांत्वन केले, मराठवाड्याचे तसेच मन मिळविले आणि गुजरातचा विरोध नाहीसा करण्यासाठी डांगवर पाणी सोडलं इतकेच नव्हे तर गुजरातची नवी राजधानी बसविण्यासाठी म्हणून न्याय्य इतके अर्थबळ देण्याची तयारी दाखविली. वस्तुतः गुजरात हा बनिया लोकांचा देश. त्या दृष्टीने गुजरातशी तडजोड घडवून आणताना अतिशय काळजीपूर्वक आणि सावधानतेने पावले टाकणे आवश्यक होते. यशवंतराव अर्थातच सावध होते. पण त्यांनी एक भूमिका घेतली आणि ती ही की संयुक्त महाराष्ट्र स्थापन व्हावयाचा असेल तर आपल्याला लहानसहान गोष्टीकडे लक्ष द्यावयाला वेळ नाही. आपण महाराष्ट्र स्थापन होण्यापूर्वीच त्यातील घटक भाग आहेत त्यांना आपल्याबरोबर घेतलं पाहिजे. यशवंतरावांनी निरनिराळे करार मदार करून, देवाण घेवाणीच्या मार्गाचा आश्रय घेऊन गुण्यागोविंदाने सारे प्रश्न मिटविले. याचे श्रेय जसे यशवंतरावांना द्यावयाला पाहिजे त्याचप्रमाणे त्यांच्या भूमिकेलाही द्यावयाला पाहिजे. ही भूमिका मी प्रथमपासून सांगत आलो आहे की ही मतपरिवर्तनाची भूमिका होती, कॉन्सेन्ससची होती. त्या भूमिकेनुसार यशवंतरावांनी आपल्या राजकारणाची सूत्रे हलविली आणि आपल्या हाती खंबीरपणे सत्ता ठेवताना त्यांनी मित्रांना संतुष्ट केले आणि आपल्या विरोधकांनाही शक्य तोवर तक्रारीला जागा ठेवली नाही.

मला माहीत आहे काँग्रेस संस्कृतीचा आज उपहास होत आहे. पण लक्षात ठेवा, या देशात जर कोठली संघटना शंभर वर्षे टिकून राहिली असेल तर ती काँग्रेस होय. तिला इतिहास आहे, परंपरा आहे. काँग्रेसपक्ष वरखाली जातो. त्याचे काही आडाखे बरोबर येतात, काही चुकतात. पण ताकत आणि तपश्चर्या फक्त काँग्रेस पक्षाकडे आहे हे विसरून चालणार नाही. यशवंतरावांनी ते पुरेपूर जाणले होते. आणि त्यांनी हेही जाणले होते की ज्या ज्या वेळी संकटे, पेचप्रसंग येत त्या त्या वेळी काँग्रेस नेतृत्वाने त्या संकटांचा मुकाबला केला आहे आणि संघटनेचा आणि राज्यकारभाराचा गाडा सुरळीतपणे आणि सुरक्षितपणे हाकला आहे. आता  उपहास केल्या जाणा-या काँग्रेस संस्कृतीबद्दल विचार करताना माझ्यासमोर जे एक उदाहरण उभे राहते ते गांधी यांनी पंजाबचा पेचप्रसंग सोडविताना आखलेल्या धोरणाचा होय. लोंगोवाल यांच्याशी करार करताना त्यांनी ही काळजी घेतली की पंजाबमध्ये कोणता पक्ष निवडून येतो याचा विचार करण्याचे कारण नाही. महत्वाची गोष्ट आहे ती ही की राष्ट्रीय प्रश्न सुटला पाहिजे. मग सत्ता कोणाच्या हाती का जाईना, राजीव गांधी यांनी ही जी भूमिका घेतली होती ती काँग्रेस शाहीची भूमिका होती. तिचा गाभा मतपरिवर्तन....... हाच होता आणि काँग्रेसची मूलभूत संस्कृती...........

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org