व्याख्यानमाला-१९८६-१४

काँग्रेस संस्कृतीची ज्यावेळी आपण चिकित्सा करू लागतो त्यावेळी ती गांधी-नेहरूंच्या काँग्रेसची संस्कृती आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्या संस्कृतीत ध्येयवाद होता. प्रचंड ध्येयवाद होता आणि त्या ध्येयवादाचे उद्दिष्ट काय होते? राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी निष्ठा. यशवंतरावांना अभिप्रेत होत्या त्या या तीन निष्ठा. त्याच्या जोडीला महात्मा गांधींची सत्याग्रही निष्ठा येते त्याचप्रमाणे गांधीजींनी नैतिक आचाराचा जो आदर्श उभा केला, जे संस्कार निर्माण केले त्यांचाही समावेश होतो. आजच्या काँग्रेस संस्कृतीबद्दल कोणाला काय म्हणावयाचे असेल ते त्यांनी म्हणावे. पण यशवंतरावांच्या वेळी जी संस्कृती रूढ होती तिचा निकष आपण त्यांच्या कृतीला लावला पाहिजे.

काँग्रेसच्या संस्कृतीत मी आधी म्हटल्याप्रमाणे कॉन्सेन्ससला अग्रस्थान असे. वस्तुतः कॉन्सेन्सस हा शब्दप्रयोग यशवंतरावांनीच काँग्रेसमधील सत्तास्पर्धेच्या, वारसदाराच्या निवडीबद्दलच्या वेळी प्रथम उद्घोषित केला. पंडितजींच्या निधनानंतर जेव्हां त्यांचा वारसदार आणि भारताचा पंतप्रधान निवडण्याची वेळ आली तेव्हां यशवंतराव या देशात नव्हते. ते अमेरिकेला गेलेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना पंडितजींच्या निधनाची बातमी सांगण्यात आली आणि अमेरिकेचे विख्यात परराष्ट्रमंत्री डीन रस्क यांनी स्वतः त्यांना सांगितले की माझ्याबरोबर विमानाने भारतात चला, तुमचे सारे अमेरिकेतील कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. यशवंतराव आणि डीन रस्क हे नंतर पंडितजींच्या अंत्ययात्रेत सामील झाले. दुस-याच दिवशी यशवंतरावांनी जाहीर केले की पंडितजींचा वारसदार कॉन्सेन्ससने निवडण्यात यावा. ते म्हणाले “काँग्रेस पक्षाचे जे पुढारी आहेत, पार्लमेंटचे सभासद आहेत, निरनिराळ्या प्रदेश राज्यांचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या विचाराने ही निवड व्हावी आणि संघर्षातून नव्हे तर सर्वसंमतीने भावी पंतप्रधानांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात यावे.” यशवंतरावांच्या आयुष्यात ज्या ज्या वेळी संघर्ष उभे राहिले त्या त्या वेळी प्रत्येक निर्णय घेताना त्यांनी कॉन्सेन्ससच्या बाजूनेच कौल दिला. यशवंतरावांच्या राजनीतीचं हे खरं स्वरूप आहे, आता मतपरिवर्तन कसं घडवायचं, त्यासाठी कोणते मार्ग स्वीकारावयाचे हा प्रश्न अगदी वेगळा आहे. परंतु एकंदर ध्येय ठरविताना मतपरिवर्तनाला जास्त महत्व द्यावं हीच यशवंतरावांची भूमिका होती. ही भूमिका होती. ही भूमिका राजकारणामध्ये जशी त्यांनी चालू ठेवली त्याचप्रमाणे समाजकारणामध्येही त्यांनी उपयोगात आणली. शक्यतो संघर्ष होऊ द्यायचा नाही, लोकांना सांभाळून घेऊन, त्यांची मने मिळवून राज्यकारभार करावयाचा ही यशवंतरावांची राजनीती होती आणि ती कॉन्सेन्सस या एकाच शब्दातून ती दिग्दर्शित होते.

हे कॉन्सेन्सस कसे घेतले गेले याची कहाणी मात्र मोठी मनोरंजक आहे. त्यावेळी कामराज हे काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि सर्वाधिकारीही होते. यशवंतरावांच्या सूचनेप्रमाणे सर्व पुढा-यांचे मत ऐकून घेण्याचे आणि विचारांती व सार्वमताच्या आधारे निर्णय घेण्याचे कार्य कामराज यांच्याकडे सोपविण्यात आले होते. पण वस्तुस्थिती अशी होती की कामराज आणि त्यावेळी अस्तित्वात असलेला सिंडिकेटचा गट यांचे एका बाबतीत निश्चित मत ठरले होते की कोणत्याही परिस्थितीत मोरारजी देसाई हे पंतप्रधान होऊ नयेत. म्हणून प्रत्यक्षपणे घडून येत असे ते असे की काँग्रेसचे पुढारी, मुख्यमंत्री त्यांच्यापुढे आले की आधीच ते प्रश्न करावयाचे, “नो मोरारजी?” आणि त्यांनी मान हलविण्याच्या अगोदर कामराज जाहीर करावयाचे “परक्कलस” म्हणजे प्रश्न मिटला. ही वस्तुस्थिती ‘फार्स’ म्हणण्याइतकी उघड होती. त्यामागे मुख्य कारण होते ते असे की त्यावेळी लालबहादूर शास्त्री हे अत्यंत लोकप्रिय होते आणि सिंडिकेटचा कल त्यांच्याकडे झुकलेला होता. खरे सांगावयाचे तर भुवनेश्वरच्या अधिवेशनात पंडितजींना पक्षघाताचा झटका आला आणि त्याचवेळी त्यांचे अॅक्टिव्ह लाईफ नाहीसे झाले, त्यापूर्वी कामराज योजनेनुसार पंडितजींनी मोरारजी, पाटील यांच्याप्रमाणे लालबहादूर शास्त्री यांनाही मंत्रिमंडळातून बाहेर काढले होते. पण भुवनेश्वर नंतर लगेच त्यांनी शास्त्रीजींना तेवढे परत बोलावून घेतले आणि आपली महत्वाची राज्यकारभारविषयक कामे त्यांच्याकडे सोपविली. यातून त्यांनी सूचित केले ते हे की आपला वारसदार कोणी होणार असेल तर ते लालबहादूर शास्त्री हेच होत. कामराज यांनी ते जाणलं होतं आणि म्हणून पंडितजींचा वारसदार निवडण्याची त्यांच्यावर जबाबदारी पडली त्यावेळी त्यांनी शास्त्रीजींचीच निवड जाहीर केली. पण ती कॉन्सेन्सस घेतल्यानंतर हे लक्षात ठेवण्यासारखे आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org