व्याख्यानमाला-१९८६-१२

या भूमिकेच्या बाबतीत यशवंतरावांच्या पुढे साहजिकच पेच निर्माण झाला. त्यांनी आधीच गांधीजी आणि नेहरू यांना आपली निष्ठा वाहिलेली होती आणि काँग्रेसचा जो प्रवाह म्हणून त्यांनी मानला होता त्यात अखंडपणे वाहत राहण्याची जणू त्यांनी खूणगाठ बांधली होती. अशा परिस्थितीत साहजिकच त्यांना वाटले की रॉय यांच्या बरोबर प्रतिस्पर्धी नेतृत्व निर्माण करण्याला आपण मान्यता दिली तर काँग्रेसच्या प्रवाहापासून आपण दूर फेकले जाणार नाही काय? काँग्रेस संस्कृतीचा स्वीकार केल्यानंतर विचारांची दिशा कशी ठरते याचे हे एक उदाहरणच मानता येईल.

एम्. एन्. रॉय यांच्यासारखा एक श्रेष्ठ पुढारी आणि निरनिराळ्या देशांमधील क्रांत्यामध्ये सहभागी होणारा एक क्रांतिकारक विचारवंत एका बाजूला संदेश देत असतानाही यशवंतराव काँग्रेसच्या अधिकृत प्रवाहापासून अलग झाले नाहीत यातूनच त्यांची मूलभूत निष्ठा प्रतीत होते असे मला वाटते. त्यानंतर ते रॉय पंथातून अलग झाले व गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या निखालस राष्ट्रवादी प्रवाहात कायम राहण्याचं त्यांनी ठरविलं. आता एक रॉयवादी म्हणून त्यांच्या या भूमिकेबद्दल मला कोणी विचारलं असतं तर मी त्या भूमिकेला मान्यता दिली नसती हे उघड आहे. पण आज मात्र माझ्या मनात विचार येतो की यशवंतरावांचं जे जीवन विकसित झालं, त्यांनी जे कार्य केलं, जे कर्तृत्व गाजविलं, त्याचा साकल्याने विचार केला तर काँग्रेसच्या प्रवाहामधून ते बाहेर पडले असते तर त्यांना निश्चितपणे ही कामगिरी बजावता आली नसती. कल्पना करा, यशवंतरावांनी काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचे मंत्री म्हणून देशाची जडणघडण घडविण्याच्या कामी जे कर्तृत्व गाजविलं ते आमच्या बरोबर राहिले असते तर त्यांना साध्य करता आले असते का? काँग्रेसची संघटना किती प्रबळ होती याची कल्पना करावयाची झाली तर काँग्रेस संघटनेमधून वेळोवेळी जे बाहेर पडले त्यांचे भवितव्य पुढे काय घडले याचा क्षणभर विचार करूया. हे श्रेष्ठ पुढारी होते, कर्तबगार होते. हेच पाहा ना सुभाषबाबू हे धीरोदात्त पुढारी होते. त्यांनी दिगंत कीर्ती मिळविली हे खरे आहे. पण या देशात त्याना आपला वेगळा पक्ष बनविता आला नाही. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या लोकांना, मग ते काँग्रेस समाजवादी असोत, रॉयवादी असोत, कम्युनिस्ट असोत किंवा आचार्य कृपलानी आणि रफी अहमद किडवाई यांच्यासारखे थोर व्यक्तिगत पुढारी असोत, पण काँग्रेसच्या प्रवाहापासून अलग झाल्यानंतर त्यांच्यापैकी कोणालाही निराळं भवितव्य घडविता आलं नाही, त्यांना देशाच्या राजकारणावर, समाजकारणावर आपला प्रभाव पाडता आला नाही. ती चूक यशवंतरावांनी केली नाही असं माझं मत आहे. त्यामुळेच त्यांच पुढचं जीवन उन्नत होत गेलं, विकसित होत गेलं.

यशवंतरावांच्या भावना विचारात घेताना स्वतः रॉय यांनी एकेवेळी जो निर्वाळा दिला होता त्याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छतो, त्यांनी तुरुंगातून काँग्रेस समाजवादी पक्षाला उद्देशून पत्रे लिहिली. त्यात त्यांनी अशी भूमिका घेतली की काँग्रेस ही एक चळवळ आहे. आंदोलन आहे. आणि निरनिराळ्या वर्गाच्या लोकांना त्यात स्थान आहे. आता या संघटनेमध्ये जर कोणी समाजवादी पक्ष काढला तर त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करा. एकतर काँग्रेस त्यामुळे प्रबळ राहणार नाही आणि दुसरी त्याहिपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्या संघटनेमधून बाहेर फेकले जाल. म्हणून रॉय यांनी स्पष्टपणे सूचित केले की काँग्रेस समाजवादी पक्षाने काँग्रेसमध्ये समाजवादी पक्ष संघटित करू नये तर काँग्रेस ही जी प्रचंड साम्राज्यशाहीविरोधी चळवळ आहे, ती प्रबळ करण्यासाठीच आपली शर्थ करावी. रॉय यांनी हा जो संदेश दिला तोच यशवंतरावांनी जन्मभर आचरणात आणण्याचा प्रयत्न केला.

याच दृष्टिकोणातून आपण निःपक्षपातीपणाने तसेच बुद्धिनिष्ठ पद्धतीने संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा विचार केला पाहिजे. या आंदोलनाच्या बाबतीत यशवंतरावांनी जी भूमिका घेतली ती ही की कोणत्याही परिस्थितीत आपण काँग्रेसच्या प्रवाहापासून अलग होणार नाही. फलटण येथे भाषण करताना त्यांनी निर्भीडपणे जाहीर केलं की संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला पाहिजे यात तिळमात्रही संदेह नाही. पण संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपेक्षाही नेहरूंचं नेतृत्व टिकवून धरणं हे आपल्याला आवश्यक वाटतं. त्या भाषणावर सडकून टीका झाली. हा संधिसाधुपणा आहे, नेहरूंचं मन काबीज करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात फूट पाडण्याचा हा डाव आहे असंही त्यावर भाष्य करण्यात येऊ लागलं. पण यशवंतरावांच्या काँग्रेसनिष्ठेचा प्रत्यय आणणारी ही आणखी एक भूमिका होय असं मी तरी निदान त्या भूमिकेचं समर्थन करू शकतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org