व्याख्यानमाला-१९८६-११

व्याख्यान दुसरे - दिनांक १३ मार्च १९८६

विषय - "यशवंतराव चव्हाण : काँग्रेस संस्कृतीचे उपासक व प्रवक्ते"    

व्याख्याते - मा. श्री. द्वा. भ. कर्णिक

१९८१ सालच्या सुमाराला यशवंतरावांनी एक दिवस घोषणा केली की मी आता स्वगृही परत जात आहे. लोकांनी त्यांच्यावर कडक टीका केली. काही लोकांनी त्यांचा उपहास केला आणि काही लोकांनी म्हटले की हा केवळ संधीसाधुपणा आहे, ही लाचारी आहे. मी मात्र त्या घोषणेचा विचार करताना एक लेख लिहिला, त्यात यशवंतरावांच्या या घोषणेचे स्वागत केले आणि असं सांगितलं की यशवंतरावांना स्वगृही जाण्याखेरीज गत्यंतरच राहिलेलं नाही. आता स्वगृही म्हणजे अर्थातच इंदिरा काँग्रेसमध्ये सामील होणे. यशवंतरावांचे सबंध जीवन माझ्या डोळ्यासमोरून गेलेले आहे, त्या जीवनामध्ये निष्ठा व्यक्त झाली असेल तर ती फक्त इंडियन नॅशनल काँग्रेसला. काँग्रेसचे ते पहिल्यापासून सेवक होते, निष्ठावान सेवक होते. मी कालच्या व्याख्यानात सांगितलं होतं की वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनात भाग घेतला आणि तेव्हापासून अखेरपर्यंत त्यांनी राजकारण सोडलं नाही, समाजकारण सोडलं नाही आणि काँग्रेसही सोडली नाही. आता काँग्रेस संस्कृती म्हटले की बरेचसे लोक उपहासाने उद्गार काढतात की ही कसली संस्कृती? पण मी ज्या काँग्रेस संस्कृतीचा विचार करतो आहे, किंवा विचार करणार आहे, ती यशवंतरावांच्या काळातील काँग्रेस संस्कृती होय. माझ्या दृष्टीने यशवंतरावांचे दोन गुरु होते. एक महात्मा गांधी, ज्यांना मी त्यांचे आध्यात्मिक गुरू म्हणतो. आणि दुसरे वैचारिक गुरू पंडित जवाहरलाल नेहरू. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर किंवा जाण्यापूर्वी सुद्धा यशवंतरावांनी जी ध्येयदृष्टी ठेवली ती ध्येयदृष्टी देण्याचं श्रेय या दोन, त्यांनी मानलेल्या गुरूंचे आहे. तो संपूर्ण कालखंड पाहिला तर तुम्हाला सांगतो, यशवंतराव या दोन गुरूंच्या पासून कधीही अलग झाले नाहीत हे तुम्हाला आढळून येईल.

मला एक प्रसंग आठवतो, १९३७ साली एम्. एन्. रॉय तुरुंगातून सुटून बाहेर आले आणि त्यांनी लगेच काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. यशवंतरावांच्या संस्कारक्षम मनावर त्याचा फार परिणाम झाला. ज्याला Impact म्हणता येईल तो झाला. त्याक्षणी यशवंतरावांचे बौद्धिक गुरू म्हणून एम्. एन्. रॉय स्थानापन्न झाले. त्यांना त्यावेळी साथ लाभली ती त्यांच्याच जिल्ह्यातील काही प्रमुख कार्यकर्त्यांची, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ह. रा. महाजनी, भय्याशास्त्री वाटवे वगैरे ते कार्यकर्ते होते. आत्माराम बापू पाटीलही रॉयवाद्यांच्या पंथात सामील झाले होते. या मंडळींच्या सहवासात यशवंतरावांना रॉयवादाचे बाळकडू पाजले गेले होते. मला आठवते की सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे जी एक परिषद भरविण्यात आली होती त्या परिषदेत यशवंतराव चव्हाण हे रॉय यांच्या व्यासपीठावर उभे राहिले होते. रॉय यांची निष्ठा काँग्रेसला होती; काँग्रेसच्या नेतृत्वाला नव्हती. त्यांचा सिद्धांत म्हणा, भूमिका म्हणा अशी होती की काँग्रेसचे नेतृत्व लढाऊ वृत्तीच्या आणि कधीही तडजोड न करणा-या ध्येयवाद्यांच्या हाती असले पाहिजे. त्या जहाल नेतृत्वाची संघटना उभारणे हे रॉय यांचे काँग्रेसमधील खरेखुरे आणि नियोजित कार्य होते. रॉय यांच्या दृष्टीसमोर काँग्रेसचे जे चित्र उभे होते ते असे की आज जरी काँग्रेसचे दरवाजे सर्व प्रकारच्या लोकांना, म्हणजे शेतकरी, कामकरी, मध्यमवर्गीय लोक, भांडवलदार आणि जमीनदार यांना मोकळे असले तरी कालांतराने चळवळीच्या दडपणाखाली यातील काही वर्ग साम्राज्यशाहीविरोधी आंदोलनातून बाहेर पडण्यासाठी ब्रिटिश साम्राज्यशाहीशी तडजोड करण्याचाही प्रयत्न करतील आणि म्हणून लढाऊ काँग्रेसजनांनी या वर्गांकडे आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणा-या पुढा-यांकडे कटाक्षाने लक्ष पुरविले पाहिजे आणि संभाव्य तडजोडीची मुळेच खुडून टाकली पाहिजेत. त्या दृष्टीने रॉय यांनी प्रतिस्पर्धी नेतृत्वाची कल्पना पुढे मांडली. अर्थातच गांधीजी, नेहरू या अधिष्टित नेतृत्वाला ते देत असलेले हे आव्हान होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org