व्याख्यानमाला-१९८०-३०

धर्मांतराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांनी हिंदुधर्मावर कठोर हल्ले करण्याचे काम चालूच ठेवले. Annihilation of Caste या त्यांच्या पुस्तकात त्यांनी विषमतेचा पुरस्कार करणा-या हिंदुधर्मावर व हिंदूंच्या रूढीप्रियतेवर कठोर हल्ला चढविला आहे. श्रमविभागणीच्या आवश्यकतेची पूर्त करण्यासाठी अस्तित्वात आलेल्या चातुर्वर्ण्याने पुढे श्रमिकांचीच विभागणी केली आणि शूद्रांना अमानुष विषमतेच्या खाईत निर्घृणतेने लोटून दिले. आंबेडकरांचे हिंदुधर्माचे विश्लेषण अतिशय वास्तववादी आहे, हे कोणालाही नाकारता येणे शक्य नाही. गांधीजींची हरिजनांविषयीची भूमिका आंबेडकरांना मान्य नव्हती. गांधीजींचा भूतदयावाद त्यांना मान्य नव्हता. गांधीजींनी कर्मसिद्धान्ताचा पुरस्कार केला; वर्णव्यवस्थेचा पुरस्कार केला. आंबेडकरांना अर्थात हे सर्व मान्य नव्हते. आणि म्हणून गांधीजींच्या विरूद्ध त्यांनी वैचारिक भूमिका घेतली. भारतात आजपर्यंत अनेक संत-महात्मे होऊन गेले; पण त्यांना माणसामाणसात खरी सामाजिक समता निर्माण करता आली नाही, या गोष्टीची आंबेडकरांना खंत होती. गांधीजींनी ग्रामस्वराज्याचा पुरस्कार केला; पण ग्रामीण जीवनाच्या अमूलाग्र सामाजिक पुनर्रचनेसाठी तेथील जातिव्यवस्थेच्या विरूद्ध त्यांनी भूमिका घेतली नाही. परंपरेने चालत आलेला गावगाडा तसाच पुढे ओढीत नेण्याला आंबेडकरांचा विरोध होता. अस्पृश्यांनी व खालच्या जातीतील इतर लोकांनी पारंपारिक व्यवसाय सोडून दिल्याशिवाय ग्रामिण जीवनात परिवर्तन घडवून आणता येणार नाही असे आंबेडकरांचे ठाम मत होते. “Mr. Gandhi and the Emancipation of the Untouchables” आणि “What the Congress and Gandhi Have Done to the Untouchables” या त्यांच्या ग्रंथात आंबेडकरांनी गांधीजींच्या दृष्टीकोणावर कठोरपणे टीका केली आहे. अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे पाहण्याच्या या दोन व्यक्तींच्या दृष्टीकोणात मूलभूत फरक होता, याची सविस्तर चर्चा वेळे अभावी मी आपल्या समोर करू शकणार नाही.

पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. दलितांच्या विषयी गांधीजींनी जे कार्य केले त्याचे मोल लक्षात घेणे आवश्यक आहे. गांधीजींवर अप्रामाणिकपणाचा आरोप या संदर्भात केला जातो. तो चुकीचा आहे. त्याच बरोबर आंबेडकरांची विद्रोही विचारसरणीही आपण लक्षात घेतली पाहिजे. Only the wearer know where the shoe pinches अशी एक इंग्रजीत म्हण आहे. “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे” असे आपण दुःखितांच्य दुःखाची तीव्रता पूर्णतः कळत नाही तेव्हा म्हणतो. विद्रोही भाषा वापरणारे आंबेडकर द्वेष्टे होते असे म्हणणा-यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. आंबेडकर हे भारतीय अस्पृश्यांचे खरेखुरे मोजेस होते. गांधीजी आणि आंबेडकर या दोघांनाही आपण समजून घेणे आवश्यक आहे. गांधीजींना ढोंगी म्हणजे हे आंबेडकरांना द्वेष्टे म्हणण्या इतकेच चुकीचे आहे.

सांगायचे तात्पर्या असे की धर्मांतराची घोषणा केल्यानंतर तर आंबेडकरांची हिंदूधर्मावरची टीका अधिक धारदार आणि अधिक मर्मग्राही बनली. पण अलगतेच्या भावनेला किवा फुटीरवादी प्रवृतीला त्यांनी खतपाणी घातले नाही. या देशाला फुटिरतेचा तसा शाप लागलेला आहेच. आणि म्हणूनच भारताला अनेक शतकापर्यंत “राष्ट्रपण” लाभले नाही. “India is a broken reed” असे या देशाचे वर्णन करण्यात येत होते. ते का? हिंदुस्थान हा देश “ब्रोकन रीड” का झाला या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न अनेक भारतीय विचारवंतांनी व नेत्यांनी केला. आंबेडकरांनी देखील तो आपल्या परिने केला. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम केले. या प्रश्नाने त्यांनाही अस्वस्थ केले होते. ज्या परिस्थितीने हा प्रश्न निर्माण केला त्या परिस्थितीने त्याचे व सबंध अस्पृश्य समाजाचे जीवन दुःखी व यातनामय केले होते. ती परिस्थिती निर्माण केली जातिभेदाने; ती परिस्थिती निर्माण केली होती येथील धार्मिक व सामाजिक विषमतेने. आंबेडकरांना सापडलेले या प्रश्नाचे उत्तर म्हणजे जातिभेद! कुठली “ब्रोकन रीड” ही आपल्याला “सिंपनी” (Symphony) देऊ शकत नाही. स्वतःच्या “स्वर” हरवून बसलेल्या गळ्याला “संगीत” निर्माण करता येत नाही. हे सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणूनच आम्हाला आजही राष्ट्रीय एकतेचा, सामाजिक एकात्मतेचा आणि भावनिक एकात्मतेचा लालित्यमय मधूर “सूर” सापडत नाही. आंबेडकरांनी फुटीरादाचा पाठ आपल्या अनुयायांना शिकविला असा तर या देशाचे काय झाले असते याची कल्पनाही करता येणार नाही. दलितासाठी त्यांनी वेगळ्या मतदार संघाची मागणी जरूर केली. दलितांसाठी त्यांनी नोक-यांमध्ये राखीव जागा जरूर मागितल्या, दलितांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी वेगळ्या सवलती जरूर मागितल्या; पण दलितांसाठी वेगळ्या राष्ट्राचा सिद्धांत मात्र त्यांनी कधीही मांडला नाही आणि दलितांच्यासाठी वेगळ्या राष्ट्राची त्यांनी मागणी कधीही केली नाही; त्यासाठी संघर्ष कधी त्यांनी उभारला नाही. बॅरिस्टर जीनांचे अनुकरम त्यांनी केले असते तर? तर ... तर ....? या प्रश्नाचे उत्तर तसे फार सोपे आहे. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तसे फार अवघडही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उलट एकात्म बारतीय समाजाचे शिल्प घडविण्याचा प्रयत्न केला.