व्याख्यानमाला-१९८०-४३

वस्तुतः सर्वप्रकारच्या विषमतेवर आधारलेल्या समाजामध्ये प्रश्नांशिवाय दुसरे काहीच सापडू शकत नाही. त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणे हे अपरिहार्य असतेच. त्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही. त्यापैकी आर्थिक विकासाचा प्रश्न, अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्न आणि राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न-हे तीन प्रश्न माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. राजकारण, समाजकारण व अर्थकारण एकत्रित आल्याशिवाय त्यांची उत्तरे शोधणं कठीण आहे. साठ टक्क्यापेक्षा अधिक लोक या देशात दारिद्र्यरेषे खालचं जीवन जगताहेत; त्यांना दोन वेळच्या जेवणाची शाश्वती हा देश देऊ शकत नाही; दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असणा-या कामाची हमी हा देश त्यांना देऊ शकत नाही. लोकसंख्या वाढीचा प्रश्न हा युद्धपातळीवर सोडवण्याचा प्रश्न आहे. आर्थिक विकास कासवाच्या गतीने होऊ शकणार नाही. आर्थिक विकास हा समाजवादी धोरण कठोरपणे राबविल्या शिवाय समान्य जनतेपर्यंत पोचू शकणार नाही. अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्न हा राष्ट्रीय प्रश्न मानणे आवश्यक आहे. तो सोडविल्याशिवाय दलित-दलितेरांमधली दरी आम्हाला बुजविता येणार नाही. अस्पृश्यते विरूद्ध आमचा संघर्ष तीव्र झाला पाहिजे. विसाव्या शतकाच्या अंतापर्यंत अस्पृश्यतेचा अंत झालाच पाहिजे. नसेल तर एकविसाव्या शतकाच्या आगमनाचे स्वागत आम्हाला हसतमुखाने करता येणार नाही. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न देखील सोडवणे आवश्यक आहे धर्मांधता आणि जातीसंघर्ष संपल्याशिवाय राष्ट्रीय एकात्मता अस्तित्वात येवू शकणार नाही.

आजच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे प्रमुख उद्दिष्ट सामाजिक पुनर्रचना हे असले पाहिजे. समान उद्दिष्ट असेल तर समान दिशेने समांतरपणे राजकारण आणि समाजकारणाला पुढची वाटचाल करता येऊ शकेल. राजकारण आणि समाजकारण ह्या दोन्ही प्रक्रियांच्या मागे सृजनात्मक प्रेरणा उभ्या कराव्या लागतली. आजच्या राजकारणाने समाजकारणा विषयी नकारात्मक भूमिका घेतली आहे. ती बदलावी लागेल. राजकारण आणि समाजकारण या दोन्हींच्या सामूहिक कृतीतून सांस्कृतिक परिवर्तन घडू शकेल, असे मला वाटते. वास्तविक आम्हाला गरज आहे ती सांस्कृतिक कृतीची. We need cultural action for cultural change in our country.

खरेतर एकेकाळी समाजकारणाने महाराष्ट्रात फार मोठी आघाडी मारली होती. पण आज समाजकारणाची अवस्था ही शेक्सपिअरने चित्रित केलेल्या किंग लियरच्या अवस्थेसारखी झालेली आहे. राजकारणाच्या दारात त्याला थारा मिळत नाही. अर्थकारणाने त्याच्याकडे पाठ फिरविलेली आहे. साहित्यही त्याची फारशी दखल घेत नाही. ते आमच्या समोर नार्सिससच्या (narcissus) भूमिकेत उभे आहे. त्याची ही अवस्था बदलली पाहिजे. आणि ती बदलेल याची मला खात्री आहे. महाराष्ट्राची सृजनशक्ती (creative power) संपलेली नाही, हे लक्षात घ्या. ती संपली असती तर या ठिकाणी मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहाशी एकरूप करण्याचा संघर्षशाली प्रयत्न झाला नसता मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाज सुधारणेच्या कार्याला वाहून घेणारा हमीद दलवाई येथे जन्माला आला नसता. “एक गाव, एक पाणवठा” हा जयघोष उच्चारित दलितांसाठी संघर्ष करणारा बाबा आढाव आपल्याला दिसला नसता, आदिवासींच्या जीवनात प्रकाश आणणारी गोदुताई परुळेकर दिसली नसती अनुताई वाघ दिसली नसती, अंबरसींग सुरवंती किंवा जयंतराव पाटील दिसला नसता. बोहरा धर्मगुरूच्या अन्यायाविरुद्ध बंड करणारा असगरअली इंजिनिअर दिसला नसता. कुष्टरोग्यांच्या जीवनात आशेच्या किरणांची उधळण करणारा बाबा आमट्य़ासारखा महापुरुष दिसला नसता. साहित्यात दलित साहित्यासारखी चळवळ आज उभी आहे. नवप्रबोधनाची ही सुचिन्हे आहेत. प्रबोधन खेड्यापाड्यांपर्यंत जाऊन पोचले पाहिजे. खेड्यापाड्यांपर्यंत शिक्षण जाऊन पोचले आहे, पण प्रबोधन पोचले नाही ही माझी खंत आहे.

बंधुभगिनींनो, यापेक्षा आपला अधिक वेळ घेणार नाही. दोन दिवस आपण माझे विचार अतिशय शांतपणे ऐकलेत. आपण मला खूप प्रतिसाद दिला आहे. कराडकरांचा मी ऋणी आहे. माननीय पी. डी. पाटील व त्यांच्या सहका-यांनी येथे येण्याची मला संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. माननीय यशवंतराव चव्हाणांचा उद्या वाढदिवस आहे. त्यांना दीर्घायुरारोग्य चिंतितो आणि त्यांच्या हातून यापुढेही उदंड देशसेवा घडावी अशी अपेक्षा व्यक्त करतो.

धन्यवाद!

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org