व्याख्यानमाला-१९८०-४२

मला काय अभिप्रेत आहे हे आपल्या लक्षात आलेच असेल. आजच्या आमदार व खासदारांना कवीच्या प्रतिभेचे दान प्राप्त करून घ्यावेच लागेल. त्या शिवाय उद्याच्या एकसंध सामाजिक मनाची निर्मिती करता येणार नाही. त्या शिवाय उद्याच्या एकात्म राष्ट्रीय जीवनाची अपेक्षा करता येणार नाही. आजच्या दुखःदायी वास्तवातून उद्याच्य आनंददायी स्वप्नाकडे भारलेल्या मनांनी आपल्याला वाटचाल करता आली नाही ही वस्तुस्थिती आहे. गांधी आणि नेहरू अशा प्रकारचे “कवी” होते. राजकारणात जाऊन अशा प्रकारचे “स्वप्न” साकार करण्याचा, निदान पाहण्याचा प्रयत्न आमच्या लोकप्रतिनिधींनी करावा असे मला वाटते. सांस्कृतिक परिवर्तनासाठी व समृद्धीसाठी याची फार आवश्यकता आहे. आमचे राजकारण अशा प्रकारच्या “पॅशन” (Passion) ने प्रेरित झाले पाहिजे.

महाराष्ट्रासमोर प्रश्न आहे तो दुभंगलेली मने सांधण्याचा जोडण्याचा. How to integrate the mind of Maharashtra? आजच्या परिस्थितीमध्ये तर हा प्रश्न अतिशय बिकट आणि गुंतागुंतीचा बनलेला आहे. सामाजिक जीवनातल्या संघर्षाला मोठ्या लढाईचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विशेषतः दलितांवर होणा-या अन्याय-अत्याचारांचे प्रमाण खूप वाढले आहे. दलित समाज आजही बहिष्कृत आहे. शापित आणि पीडित आहे. त्याच्या पदरात जे काही पडले आहे ते हिसकावून परत घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. माणूस म्हणून जगण्याचे अधिकार त्यांना आम्ही देणार आहोत किंवा नाही? मराठवाड्यात विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रश्नावरून दलितांची घरेदारे जाळण्यात आली. त्यामागे कोणती प्रवृती होती? नामांतराला विरोध करण्याच्या निमित्ताने सवर्ण जातींनी दलितांच्या अस्तित्वार घाव घातले. दलितांची घरे जाळण्या-या लोकांच्या लक्षात हे आले नाही की दलितांच्या घराबरोबर आम्ही आमची माणुसकी देखील जाळीत आहोत. “माणुसकी” जाळून टाकण्याच्या निर्घृण कृत्यामुळे मराठवाड्याची “अस्मिता” उजळून निघणार असेल तर मला काहच म्हणावयाचे नाही. प्रश्न मराठवाड्यातील सवर्ण जातींच्या अस्मितेचा नाही; वस्तुतः तो आहे पुरोगामी महाराष्ट्राच्या अस्मितेचा. फुले, आगरकर, शाहू, आंबेडकर आदी महापुरुषांच्या विचारांचा व कार्याचा वारसा सांगणा-या महाराष्ट्राच्या अस्मितेचा तो प्रश्न आहे. दलितांची घरे जळत असताना या पुरोगामी महाराष्ट्राने नीरोची भूमिका घ्यायची का? नीरोचे वाद्यसंगीत हे अमानुषतेकडे नेणारे संगीत आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो. त्याच्य तालावर बेभान होऊन दलितांच्या घरावरची आग थयथय नाचताना मला तरी दिसते आहे. त्याचे हे तांडवनृत्य थांबवायचे कसे?

मित्रहो, सबंध देशच आज विद्वेषाच्या आगीत सापडला आहे. महाराष्ट्रातही ती आग भडकली आहे. ती विझवण्यासाठी कोणत्या पाणवठ्यावरचे पाणी आणावयाचे? आमचे पाणवठे दलितांची घरे जाळणारी आग विझविण्यासाठी थोडेच आहेत? गावकुसाबाहेरची आग विझविण्यासाठी हे पाणी मिळणार नाही असे मनुस्मृती आपल्याला ओरडून सांगेल. पण ही आग आपल्याला विझवावीच लागेल. मराठवाड्यातील मित्रांना मी हेच सांगितले. आपल्यालाही मी या ठिकाणी तेच सांगतो आहे. ही आग विझविण्यासाठी आम्हाला पाणी आणावेच लागेल. ते पाणी आणावे लागेल. आम्हाला महात्मा फुल्यांच्या हौदातून, ते पाणी आणावे लागेल. आम्हाला राजर्षी शाहूंच्या पंचगंगेतून, आणि ते पाणी आणावे लागेल आम्हाला आंबेडकरांच्या स्पर्शाने पूनित झालेल्या महाडच्या चवदार तळ्यातून. आणि या तीन ठिकाणाहून आणलेल्या पाण्यात सोडावी लागेल आम्हाला साने गुरुजींनी आयुष्यभर ढाळलेल्या अश्रूंची धार! असे “हे” पाणी “ही” आग विझवू शकेल याचा मला आत्मविश्वास आहे. या पाण्यात संघर्ष, रचना आणि मानवता या तिन्ही गोष्टींची ताकद आहे. उद्याच्या महाराष्ट्राची चिंता बाळगणा-यांनी हे काम आजच करणे आवश्यक आहे. जातीय विद्वेषातून महाराष्ट्राला वाचविणे आवश्यक आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org