व्याख्यानमाला-१९८०-३८

मित्रहो, अशा परिस्थितीमध्ये लोकांचा राजकारणावर, राजकीय पक्षांवर पुढा-यांवर किती काळ विश्वास राहील हा प्रश्नच आहे. अशा प्रकारे राजकारण बघून सामान्य लोक मात्र भांबावले आहेत, गोंधळले आहेत. सत्तेवर आलेला पक्ष जेव्हा लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही तेव्हा साहाजिकच दुस-या एखाद्या तुल्यबल पर्यायी पक्षाची अपेक्षा बाळगतात. आणीबाणी संपते न संपते तोच जनता पक्षाचा जन्म झाला आणि तो सत्तेवर आला हेच कारण आहे. पण पुढे त्याचे काय झाले याची दुःखद आणि तितकीच हास्यास्पद कहानी मी आपल्या समोर बयान करू इच्छित नाही. ती आपल्याला पूर्णतःमाहित आहेच. एखादा पक्ष सामर्थ्यशाली पर्यायी पक्ष म्हणून टिकू शकला नाही तर नाकारलेल्या पक्षालाच पुन्हा पाठिंबा पाठिंबा देण्याशिवाय लोकांसमोर कसलाही मार्ग उरत नाही. आणि मग देशात नकारात्मक राजकारणाला आरंभ होतो. अशा प्रकारच्या राजकारणाचा एक अनिवार्य भाग म्हणून वैचारिक साम्य व बांधीलकी नसलेल्या पक्षांच्या आघाड्या निर्माण होतात. अशा आघाड्या मर्यादित उद्देशपूर्ती करू शकतील; पण तुल्यबल पर्यायी पक्ष म्हणून त्या टिकू शकत नाहीत. भारतीय राजकारणात ही एक फार मोठी शोकांतिक निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात यापेक्षा वेगळे चित्र दिसत नाही. भाराभर पक्षांच्या अस्तित्वामुळे लोकशाङी प्रक्रियेला बळकटी येणे शक्य नाही. अखिल भारतीय स्तरावर काम करणारे जवळपास सर्वच राजकीय पक्ष दुभंगलेले आहेत. जवळपास प्रत्येक प्रमुख राजकीय पक्षाला दुभंगण्याचा (dichotomy) शाप लागलेला आहे. किमान दोन तुकडे न झालेला एकही प्रमुख पक्ष आपल्याला दाखवता येणार नाही. पक्षविघटनाची ही प्रक्रिया गेल्या दोन दशकांपासून अस्तित्वात आलेली आहे. वैचारिक मतभेदांपेक्षा इतर क्षुल्लक कारणेच त्या विघटन प्रक्रियेला अधिक प्रमाणात जबाबदार आहेत नेत्यांच्या वैयक्तिक मतभेदातून बरेच पक्ष वेगवेगळ्या गटात विभागले गेल्याचे आपणास दिसतात. त्यामुळे एक प्रकारचा राजकीय शक्तीपात या देशात फार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दृश्य आपण पाहात आहोत. महाराष्ट्र याला कसा अपवाद असू शकेल?

राजकीय अस्थिरता हा आमच्या राज्यकारणाचा स्थायीभाव बनलेला आहे. विटांच्या किंवा वाळूच्या ढिगा-याला वास्तू मानता येत नाही. तद्वत माणसांच्या जमावाला पक्ष मानता येणार नाही. पण ढिगा-यातली प्रत्येक वीट किंवा प्रत्येक वाळूचा कण मीच वास्तू आहे असा दावा करू लागला तर काय अवस्था निर्माण होईल? त्याच प्रमाणे एखाद्या राजकीय पक्षातला प्रत्येक कार्यकर्ता मीच नेता आहे असा दावा करून लागला तर त्या पक्षाची काय अवस्था होईल? ती अवस्था आपल्या समोर उभी आहेच ना! वास्तूरचनेच्या विशिष्ठ प्रक्रिये शिवाय कसलीही वास्तू उभी करता येणे शक्य नसते. तसेच पक्षबांधणीच्या विशिष्ठ प्रक्रियेशिवाय कोणताही राजकीय पक्ष उभा करता येत नसतो. लोकांच्या लोंढ्याला पक्ष मानता येत नाही. अशा पक्षाला बहुमताने निवडून दिल्यानंतर रस्त्यातले लोंढे राज्याराज्यातील विधानसभेत जाऊन बसतात. लोकसभेतही रस्त्यातील जमावाचे मानसशास्त्र जाऊन पोचते. आणि मग लोकसभेला व राज्याराज्यातील विधानसभांना बाजारपेठेतील चौररस्त्याचे स्वरूप प्राप्त होते. अशा राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये कोणता पक्ष निवडून येतो हा प्रश्न महत्वाचा नाही. अशा अवस्थेतही लोकशाही राज्यव्यवस्थेवर लोकांचा विश्वास कसा राहू शकेल, हा प्रश्न मात्र अतिशय महत्वाचा आहे.

तेव्हां अशा एका विचित्र अवस्थेमध्ये सापडलेल्या राजकारणामुळे देसात राजकीय नेतृत्वाचा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. राजकीय नेतृत्वाचा हा “क्रायसिस” अराजकाला निमंत्रण देऊ शकतो; आणि अराजकाची अवस्था ही हुकुमशाही प्रवृत्तीला मार्ग निर्माण करून देऊ शकते. राजकीय जीवनात नैतिक मूल्यांची पोकळी निर्माण झाली की नेतृत्वाचा “क्रायसिस” निर्माण होतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे. असा प्रकारच्या पोकळीत आपण आज सापडलो आहोत हे नाकरात येत नाही. आपल्या देशाती राजकीय नेतृत्वाचा “क्रायसिस” हा वैचारिक निष्ठा, मूल्य प्रतिबद्धता आणि गतिमान कार्यप्रवणता या तीन गोष्टींच्या “क्रायसिस” चा परिपाक आहे असे मला वाटते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org