व्याख्यानमाला-१९८०-२६

नगराध्यक्ष श्री. पी. डी. पाटीलसाहेब आणि उपस्थित बंधु-भगिनींनो,

कालच्या व्याख्यानात मी महाराष्ट्रातील “काल” च्या समाज कारणाचा व राजकारणाचा थोड्यात मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. आजच्या व्याख्यानात मी “आज” च्या व “उद्या” च्या समाजकारणाचा व राजकारणाचा विचार करणार आहे. १९३५ पर्यंतच्या राजकारणाला व समाजकारणाला मी महाराष्ट्रातील “काल” चे समाजकारण व राजकारण म्हटले आहे. त्याचे कारण असे की १९३५ साली आमच्या समाजकारणाचा व राजकारणाचा एक अतिशय महत्वाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाला. या साली जातीय तत्वावर मतदारसंघ निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली. १९३५ च्या घटना कायद्याने भारतातील विविध जातीधर्मातील लोकांना काही राजकीय अधिकार प्रदान केले; आणि त्या अधिकारांच्या बरोबर भारतीय समाजाच्या विघटनाची नांदीही त्याने घातली. आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या जातींना अशा अधिकारांची आवश्यकता निश्चितच होती. पण त्यांना मिळालेल्या अधिकारांच्या आवरणाखाली फुटीरतेची बीजेही दडली होती. १९३५ नंतरच्या राजकारणाला व समाजकारणाला जे सवरूप प्राप्त झाले ते कमीअधिक प्रमाणात आजतागायत कायम राहिलेले आहे. म्हणूनच मी १९३५ नंतरच्या महाराष्ट्रातील समाजकारण व राजकारणला “आज” चे राजकारण व समाजकारण असे म्हटले आहे. जातीयतत्वावर काही राजकीय अधिकार देणा-या ब्रिटिशांच्या धोरणाने आमच्या सामाजिक जीवना अतिशय दूरगामी परिणाम केले हे सांगण्याची आवश्यकता नाही. या देशातील मुसलमानानी द्विराष्ट्र सिद्धांताची व्याख्या करण्याचा खटाटोप याच सुमारास आरंभिला हे आपणास माहित असेलच. पुढे त्याची परिणती पाकिस्तानच्या निर्मितीत झाली हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही.

पण एक गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे; आणि ती ही की महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य आंदोलनाला तीव्रता प्राप्त झाली. १९३५ चा घटना कायदा देखील ब-याच मोठ्या प्रमाणात त्याची तीव्रता वाढविण्यास उपकारक ठरला. गांधीजींच्या नेतृत्वाखाली येथील राजकारण व समाजकारण एकमेकांच्या जवळ आले आणि एकात्मतेच्या मार्गावर चालू लागले. टिळकयुगात ते एकमेकांना छेद देत होते. गांधीजींनी राजकारणाला सामाजिक आशयगर्भता प्राप्त करून दिली समाज जागृतीशिवाय राजकीय स्वातंत्र्याची चळवळ प्रबळ व प्रभावी होणार नाही याची डोळस जाणीव गांधीजींनी भारतीय जनतेलाकरून दिली. समजाच्या सर्व थरातील – प्रामुख्याने खालच्या थरातील – लोकांचे प्रश्न हाती घेतल्याशिवाय राष्ट्रीय चळवळीसाठी त्यांचे सक्रिय सहकार्य मिळणार नाही, त्यांना त्या चळवळीत सहभागी करून घेता येणार नाही आणि त्यांच्या सहकार्य व सहभागाशिवाय ती ख-या अर्थाने राष्ट्रव्यापी स्वरूप धारण करणार नाही – या सर्वच गोष्टींची जाणीव गांधीजींना होती.

कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच् सारख्या समाज सुधारकांची देखील हीच धारणा होती. समाज सुधारणेचा वेग वाढवणे आवश्यक होते, अगत्याचे होते. त्याशिवाय सामाजिक अभिसरणाची व प्रबोधनाची प्रक्रिया तीव्र होणे शक्य नव्हते. महाराष्ट्रात राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याने समाज क्रांतीचा एक नवीन अध्याय सुरू झाला होता. या ठिकाणची ब्राह्मणेतरांची चळवळ सामाजिक स्वातंत्र्याच्या व समतेच्या दिशेत अग्रेसर झाली होती. सत्यशोधक समाजाचे कार्य ग्रामाणी भागात पसरत होते. बहुजन समाजाची मानसिकता घडविण्याचा एक फार मोठा प्रयत्न या चळवळीने केला. पण दुदैवाने वेशीबाहेरील अस्पृश्य व पददलितांच्या भावनेला स्पर्श करण्याचे सामर्थ्य या चळवळी मध्ये नव्हते. फुल्यांच्या क्रांतीकाही विचारांचा व कार्याचा वसा आणि वारसा तिने सांगितला खरा पण त्या महापुरुषाची “दृष्टी” तिला लाभली नाही. फुल्यांनी अस्पृश्यांसाठी त्या प्रकारे आपल्या घरातील पाण्याचा हौद मोकळा केला त्या प्रकारे त्यांच्या अनुयायांनी गावातील पाणवठे अस्पृश्यांसाठी खुले असावेत हा विचारही मांडला नाही. राजर्षी शाहूंच्या विचारात व कृतीत ती झेप होती पंचगेंचे पाणी त्यांनी पेटविले ते याच जळत्या ध्येयवादाने. आपले क्षत्रीयत्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नातच केवळ धन्यता मानली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org