व्याख्यानमाला-१९८०-२४

महाराष्ट्रात गांधीयुगाची प्रभा पसरत असताच येथील सामाजिक व राजकीय जीवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने एक वेगळे सामर्थ्य उभे राहात होते. त्या सामर्थ्याचा आविष्कार विवेचक बुद्धिमत्तेतून, धवल चारित्र्यातून आणि धगधगत्या ध्येयवादातून झाला होता हे मी आपणास सांगू इच्छितो. त्या सामर्थ्यातून महाराष्ट्रातील आणि पर्यायाने सबंध देशातील दलितांचे नेतृत्व निर्माण झाले हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. हे सामर्थ्य पुढे येताच महाराष्ट्रातील अस्पृश्यांच्या जीवनाला रूपेरी कडा प्राप्त झाली. त्यांच्यात आशावाद निर्माण झाला; स्वतःच्या अस्मितेची जाणीव त्यांना झाली; आणि स्वतःच्या जीवनातले “स्वत्व” संघर्षाशिवाय आपल्याला प्राप्त होऊ शकणार नाही या गोष्टीचे भान त्यांना अगदी प्रकर्षाने झाले. ‘Educate, agitate and organise’ हा संदेश त्यांन दलित भारताला दिला.

डॉ. आंबेडकरांनी प्रथमतः सामाजिक प्रश्नांना हात घातला हिंदु समाजाची चातुर्ववर्ण्य व जातिव्यवस्थेवर आधारलेली कालबाह्य मूल्यसरणी बदलल्याशिवाय आणि व्यक्तिस्वातंत्र्य, आर्थिक समानता व सामाजिक न्यायाच्या पायावर त्याची पुनर्बांधणी केल्याशिवाय येथील शोषित व पीडित लोकांना आपली उन्नती करून घेता येणार नाही याची त्यांना तीव्र जाणीव होती. ती जाणीव उराशी बाळगूनच त्यांनी आपल्या जीवित कार्याची सुरुवात केली. डॉ. आंबेडकरांनी एकीकडे येथील धार्मिक, सामाजिक व आर्थिक विषमतेच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे त्याविषमतेच्या विरूद्ध प्रत्यक्ष सामाजिक लढे उभे केले. १९२० साली “मूकनायक” हे पाक्षिक त्यांनी सुरू केले. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना या कामी अर्थसाह्य तर दिलेच पण त्याच बरोबर मानसिक आधारही दिला. डॉ. आंबेडकरांनी या नियतकालिकाच्या पहिल्याच अंकात विषमतेवर आधारलेल्या हिंदुसमाजाची वास्तव प्रतिमा वाचकांसमोर ठेवली. आणि ती अशीः “हिंदुसमाज हा एक मनोरा आहे. व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजला आहे. या मनो-याला शिडी नाही. एका मजल्यावरून दुस-या मजल्यावर जाण्याची सोय नाही; मार्ग नाही. ज्या मजल्यावत जन्म होतो त्याच मजल्यात मरावे लागते. ब्राह्मण जात ही सगळ्यात वरच्या मजल्यावर राहते आणि अतिशूत्र सगळ्यात खालच्या मजल्यावर राहते हे सांगण्याची आवश्यकता नाही.” आंबेडकरांनी असे हे वास्तवचित्र जगासमोर उभे केले. इतकेच नव्हे तर हयातभर या समाजाने पोसलेल्या विषमतेची कठोरतेने ते मीमांसा करीत राहिले. प्रथमतः त्यांनी या बंद व अंधा-या मनो-याला समतेच्या तत्वज्ञानाची शिडी देण्याचा प्रयत्न केला. त्याच्या एका मजल्यावर दुस-या मजल्यावर जाण्यासाठी मार्गा तयार करता येईल का याचा त्यांनी विचार केला. ह्या मनो-याची रचना थोडीशी बदलता येईल का याचा त्यांनी प्रतत्न आरंभिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “वर्ण” किंवा “जात” ह्या संकल्पनेची, संस्थेची आणि ऐतिहासिक वास्तवाची व्युत्पत्ती शोधली. त्या संस्थेच्या सांस्कृतिक व्यूहरचनेचा अभ्यास त्यांनी केला. श्रमविभागणीच्या नावावर आपल्या अस्तित्वाच्या, उपयुक्ततेच्या हींदुसमाजाचीच विषम विभागणी केली आहे, हे पटविण्याची खरं तर काहीच आवश्यकता नव्हती. ती एक दारूण वास्तवता होती. या जातिव्यवस्थेमुळे विघटित झालेल्या हिंदुसमाजाला स्थितिशीलतेच्या बंधनातून मुक्त होणे शक्य नव्हते. तिच्यामुळे राष्ट्र म्हणून जगासमोर उभे राहण्याची ताकद हिंदुस्थानला मिळणे शक्य नव्हते. हिंदुसमाज म्हणजेच एक myth आहे ही गोष्ट आंबेडतकरांच्या लक्षात आली. आणि हिंदुसमाज जर एक myth असेल तर हिंदुस्थान हा देश एक reality  म्हणून जगासमोर कसा उबा राहील? हिंदुसमाजातील प्रत्येक वर्ण, त्या त्या वर्णातील प्रत्येक जात आणि त्या त्या जातीतील प्रत्येक पोटजात ही reality असल्यामुळे हिंदूना एकसंध असा “समाज” बनवता आला नाही, “राष्ट्र” ही बनवता आले नाही. अनेक जातींच्या realities मधून हिंदुसमाज नावाचे myth तयार झाले. हिंदुस्थानला राष्ट्र या नावाचे “वास्तव” बनण्यासाठी हिंदुसमाजाला “वास्तव” म्हणूनच जगासमोर उभे राहणे आवश्यक होते. पण ते घडले नाही याला आमचा इतिहास साक्ष आहे. हा इतिहास बाबासाहेबांना माहित नव्हता असे म्हणता येणार नाही. “वर्ण” किंवा “जात” नावाची विषमतेचा पुरस्कार करणारी गोष्ट नष्ट केली तर हिंदुसमाजाची पुनर्रचना करत येईल हा आशावाद त्यांनीही उरी बाळगलेलाच होता. पण त्यांच्या पदरात निराशाच पडू लागली. हिंदुसमाजात “जात” ही स्वायत्त संस्था आहे. तिचे स्वयंभूत्व हिंदुधर्मशास्त्रांनीच मानून केलेले आहे. आणि धर्मशास्त्राला कोण बदलणार? धर्मशास्त्र म्हणजे काही राज्यघटना नाही. कोणत्याही धर्मशास्त्रात ते बदलण्याचे कलम नाही; amendment clause त्यात नाही. ज्यांना मान्य नाही त्यांनी तो धर्म सोडणे हा एकच पर्याय असा लोकांसमोर होता. अनेकांनी तो सोडलाही. अस्पृश्यांच्या समोरही हाच मार्ग होता. पण आंबेडकरांना हा समाज बदलता येईल असे वाट होते. आणि म्हणूनच त्यांनी या समाजाचे वास्तवरूप लोकांसमोर ठेवले; त्यांने जोपासलेल्या विषमतेची ते कठोरपणे मीमांसा करीत राहिले. १९३५ पर्यंत फार मोठ्या उमेदीने त्याची पुनर्रचना करण्याची पराकाष्ठा त्यांनी केली. १९२४ साली “बहिष्कृत हितकारिणी सभा” या नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. तिच्या व्यासपीठावून सुधारमावादाचा त्यांनी अगदी हिरिरीने पुरस्कार केला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org