व्याख्यानमाला-१९८०-२२

राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी स्तिमित करणारे प्रयत्न केले. अस्पृश्यांच्या मुक्तीलढ्यात त्यांनी एका फार मोठ्या सेनानीची भूमिका पार पाडली. ठिकठिकाणी त्यांनी महार परिषदा घेण्यासाठी दलितांना प्रेरणा दिली. काही परिषदांच्या अध्यक्षस्थानी ते स्वतः विराजमान झाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला सामाजिक आशय देण्यांचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. शिवाजी महाराजांना भारतीय राष्ट्रवादाचे प्रेरणा स्त्रोत व स्थान मानणा-या मंडळींना आजही हा सामाजिक आशय कळलेला नाही, ही दुदैवाचीच गोष्ट नाही का?

राजर्षी शाहू छत्रपती हे भारताच्या इतिहासातील Justinian होते. चातुर्वर्ण्यावर आधारलेल्या प्राचीन व परंपरागत हिंदू कायद्याला कोणत्याही हिंदू राजाने बदलण्याचा प्रयत्न केला नाही ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. उलट त्याचे पावित्र्य टिकवण्याचाच या देशातील राजांनी व राज्यकर्त्यांनी प्रयत्न केले. त्याला वैचारिक आव्हान देण्याचे सामर्थ्य भारतातील शासन कर्त्यांजवळ नव्हते म्हटले तरी चालेल. पण राजर्षी शाहू महाराज याला अपवाद आहेत. ब्रिटिशांच्या अमदानीतील वारे त्यांच्याही संस्थानात आधुनिकतेचे तत्वज्ञान घेवून वाहत होते ही गोष्ट खरी आहे. पण इंग्रजांना जे जमले नाही ते राजर्षी शाहू महाराजांनी करून दाखविले. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचा कायदा केला, अंतरजातीय विवाहांना कायद्याने मान्यत दिली; कुलकर्णी वतने तसेच महार वतने त्यांनी कायद्याने नामशेष केली. सामाजिक सुधारणा घडवून आणणा-या या कायद्यांबरोबरच त्यांनी लोकांची आर्थिक सुबत्ता वाढविण्यासाठी अनेक योजना आखल्या व कार्यान्वित केल्या. शेती विकासाठी त्यांनी राधानगरी धरण बांधले. व्यापार उद्योग वाढविण्यासाठी त्यांनी बाजार पेठांची सोय जनतेला उपलब्ध करून दिली. आपल्या संस्थानात त्यांनी उद्योजकता वाढविण्यासाठी सोयी उपलब्ध करून दिल्या. सहकाराचे तत्वज्ञान आर्थिक क्षेत्रात राबविण्यासाठी त्यांनी उत्तेजन दिले. या सर्व गोष्टींकडे त्यांनी जातीने लक्ष दिले. कोल्हापूर शहराला त्यांनी कला-संस्कृतीचे एक पर्यायी व प्रभावी केंद्र बनविले. अनेक कलाकारांना त्यांनी राज्याश्रय दिला.

राजर्षी शाहू महाराजांनी जे क्रांतीकारी कार्य केले ते भारतातील इतर कुठल्याही समकालिन संस्थानिकाला करता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे, बडोदा संस्थानच्या सयाजीराव गायकवाडांनी सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेसाठी महत्वाचे विधायक कार्य केले हे आपल्याला माहित आहेच. पण राजर्षी शाहू महाराजांचे क्रांतीकारकत्व त्यांच्या जवळ नव्हते. राजर्षी शाहू छत्रपतींनी आपल्या मनगटावर क्रांतीचे कडे घातले होते आणि गळ्यात क्रांतीचा ताईत बांधला होता. त्यांच्या मनगटातील शक्ती व हृदयातील क्रांतीकारक उर्मी अवर्णणीय अशीच होती, आणि म्हणूनच सर्व जातींच्या लोकांचे नेतृत्व त्यांना करता आले. त्यांनी मराठा परिषदा ज्या जोमाने भरविल्या त्याच व तितक्याच जोमाने महार परिषदाही भरविल्या. दिलतांचे नेतृत्व करीत करीतच आंबेडकरां ते पुढे आणण्याचा प्रयत्न करीत होते. आंबेडकरांच्या डोळ्यात त्यांना समाज क्रांतीचे स्फुल्लिंग दिसते. पददलितांना आंबेडकरांच्या रूपाने नेता मिळाला म्हणून त्यांना मनस्वी आनंद वाटला होता. १९२२ साली महाराजांचा अकाली अंत झाला. त्यांचे अकाली निधन झाले नसते तर कदाचित ब्राह्मणेतरांच्या चळवळीपासून दलितांची चळवळ पुढे वेगळी झाली नसती असे मला वाटते आंबेडकरांना त्यानी जरूर साथ दिली असती. जेधे-जवळकरांनी महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी जी भूमिक घेतली होती ती महाराजांनी घेतली नसती. राजर्षी शाहूंच्या मृत्यू नंतर सत्यशोधक चळवळीच्या नेतृत्वाचा ब्रेक तुटला होता. फुले-शाहूंच्या मार्गापासून ती थोडीशी दूर गेली. कर्मवीर विठ्ठल राजमी शिंदेही ह्या धकाधकीत जाऊ शकले नाहीत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org