कर्मवीर शिंदे हे सर्वांगीण सुधारणावादाचे प्रवक्ते होते. अस्पृश्यता निवारण्याच्या कार्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मुरळीची चाल बंद करावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. शेतक-याच्या प्रश्नालाही त्यांनी हात घातला. १९०६ साली स्थापिलेली त्यांची “डिप्रेस्ड क्लासेस मिशन” ही संस्था समाज सुधारणेच्या कामी कृतीशील राहिली. कर्मवीरांनी स्त्रीशिक्षणाच्या प्रश्नाकडेही अतिशय आस्थेने पाहिले. जीवनाच्या शेवटपर्यंत नंदादीपाप्रमाणे समाजकार्यात ते तेवत राहिले.
महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या कार्यात राजर्षी शाहून महाराजांनी जे कार्य केले ते प्रचंड स्वरूपाचे होते. त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. हा राजा सर्वदृष्टीने प्रचंड व्यक्तिमत्वाचा होता. त्यांना महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातल्या पौरुषाचा नायगारा म्हणता येईल. त्यांचे जीवन म्हणजे सामाजिक क्रांतीचा स्फोटच! His life was an explosion of Maharashtra’s revolutionary imagination. क्रांतीकारकाला देखील कवी इतकीच प्रतिभा आवश्यक असते. शाहू महाराजांना ती लाभली होती. महाराष्ट्रातल्या सामाजिक इतिहासातले ते क्रॉमवेल होते. बहुजर समाजाला व दलितांना त्यांनी मानवी अधिकार व अस्मिता दिली. सामाजिक लोकशाहीचा Magna Carta त्यांनी जातिव्यवस्थेत भरडलेल्या आपल्या जनतेच्या हाती दिला. येथील जातिव्यवस्थेने आमानुषीकरणाच्या खाईत शतकानुशतके सडत ठेवलेल्या मूक व बहिष्कृत लोकांना त्यांनी “माणूसपण” मिळवून दिले. वेदोक्त प्रकरणाने तर महाराजांच्या स्वत्वावर आणि अस्मितेवर घाला घातला होता. त्यांना शूद्र ठरविणा-या ब्राह्मण्याने या प्रकरणात किळसवाण्या क्षूद्रत्वाचे प्रदर्शन केले. राजर्षीनी डिवचलेल्या सिंहासारखी आक्रमक वृत्ती या प्रकरणात दाखविली. परिणामतः एका फार मोठ्या सामाजिक संघर्षाने महाराष्ट्रात पेट घेतला. पंचगंगेचे पाणी विद्रोहाने पेटले. राजर्षी शाहू महाराजांच्या रूपाने महात्मा फुल्यांच्या नंतर समाजाच् खालच्या थरातील सर्व जातींना एक अतिशय विमोचक व आश्वासक शक्ती प्राप्त झाली होती. ती शक्ती जेवढी विद्रोही होती तेवढीच विधायकही होती. राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाला व पददलितांना स्वाभिमान दिला.
राजर्षी शाहू महाराजांनी समाज सुधारणेच्या कार्यात गुंतवून घेतलेल्या व्यक्तींना व संस्थांना आधार दिला. आर्यसमाजाच्या धार्मिक व सामाजिक कार्याला त्यांनी कोल्हापूर संस्थांनात पाया मिळवून दिला. सत्य शोधक चळवळीला तर त्यांच्या प्रेरणेने उधानच आले. जेव्हा ती विकृतीच्या भोव-यात सापडली तेव्हा त्यांनी तिच्याकडे ताटस्थ्याने पाहिले. सत्य शोधक चळवळीला पुढे पुढे “ब्राह्मण समाज” व “ब्राह्मण्य” यातला फरक नीटसा आकलन झाला नाही. भास्करराव जाधवांसारखी एखादीदुसरी व्यक्ती सोडली तर बाकीच्यांना सत्यशोधक समाजाच्या तत्वज्ञानाचा आशय कळू शकला नाही. शाहू महाराजांच्या मनात ब्राह्मणांविषयी तिळमात्रही द्वेष नव्हता. उलट ब्राह्मण समाजानेच त्यांच्याव र आग पाखडली. कारण त्याच्या परंपरागत हितसंबंधाना महाराजांच्या सुधारणावादी राज्यकारभारामुळे धक्का पोहोचला होता.
राजर्षी शाहू महाराजांनी आपली सर्व सत्ता शोषितांच्या व पददलितांच्या पाठीमागे उभी केली. सर्वकष समाज परिवर्तन हा त्यांच्या राज्यकारभाराच केंद्रबिंदू होता. सामाजिक लोकशाहीचा त्यांनी पाया घातला. त्यांनी आपल्या संस्थानातील सर्व जातीतील लोकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली. विविध जातीतील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतिगृहे बांधून दिली. कोल्हापूर शहर हे त्यांनी शिक्षणाचे व वसतिगृहांचे केंद्र बनविले. शिक्षणाच्या अभावामुळे बहुसंख्य लोक सामाजिक व आर्थिक विषमतेमध्ये पिढ्यानपिढ्यापासून भरडले गेले होते. या वस्तुनस्थितीची त्यांना जाणीव होती. म्हणून त्यांनी शिक्षणासाठी आपला खजिना रिकामा करायचे ठरविले होते. पण शिक्षणाची संधी उपलब्ध करूनच ते केवळ थांबले नाहीत; त्यांनी मागासलेल्या सर्व जातीजमातीतील शिकलेल्या लोकांना नोक-याही उपलब्ध करून दिल्या. नोकरीमध्ये मागासलेल्या जातींसाठी ५० टक्के जागा राखून ठेवल्या. गेल्या तीसबत्तीस वर्षांच्या स्वातंत्र्याच्या काळात लोकसत्ताक भारतीय शासनाला जे करता आलं नाही ते ह्य निधड्या छातीच्या, निर्भय वृत्तीच्य व भविष्यवेधी दृष्टीच्या राजाने करून दाखविले होते हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. नियतीलाही वेसण घालण्याची ताकद या पुरुषसिंहामध्ये होती हे इतिहासाला तरी विसरता येणार नाही.