व्याख्यानमाला-१९८०-१७

न्यायमूर्ती रानड्यांचे व्यक्तिमत्व हे मवाळ व समन्वयवादी होते. समाजसुधारणेसाठी संघर्षाची भूमिका घेणे त्यांना मानवणारे नव्हते. समाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेला जाणीवपूर्वक अधिक गतिशील बनविले पाहिजे असे त्यांना मनापासून वाटत होते. त्यासाठी लोकशिक्षणाची व संघटित प्रयत्नांची गरज असते. या विचाराचे प्रतिपादन निःसंदिग्ध शब्दात त्यांनी केले. रानड्यांच्या नेमस्त व उदारमतवादी विचारसरणीला आग्रही मार्ग मान्य होते; पण आक्रमक मार्ग मात्र तिला मंजूर नव्हते. उत्क्रांतीवादाचे ते खंदे पुरस्कर्ते होते. उत्क्रांती ही निसर्गाच्या नियमानुसार होते. आणि म्हणून समाजकारण देखील उत्क्रांतीच्या मार्गाने झाले पाहिजे अशा त्यांची धारणा होती. रानड्यांनी अध्यात्मिक व भौतिक या दोन्हीही गोष्टींवर सारखाच भर दिला. धर्मकारण, समाजकारण आणि राजकारण करणा-या समकालीन व्यक्तींना व संस्थांना मार्गदर्शन करण्याचा व प्रेरणा देण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. अनेकविध समाजिक संस्थांच्या उभारणीमागे ते प्रेरक शक्ती आणि मार्गदर्शक आधार बनून उभे राहिले. धर्मकारण, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारण या सर्व आघाड्यांवरचा त्यांचा वैचारिक प्रवास अतिशाय महत्वाचा आहे. महाराष्ट्राच्या समाजकारणाला व राजकारणाला न्यायमूर्ती रानड्यांनी इतिहास व अर्थशास्त्राच्या चिकित्सक विचारांची जोड दिली. इतिहासाविषयी अनास्था आणि अर्थकारणाचे अज्ञान या दोन्ही गोष्टी आमच्या अवनतीला कारणीभूत ठरल्या आहेत हे त्यांनी ओळखले होते. पुढे दादाभाई नवरोजींनी आर्थिक प्रश्नांची शास्त्रीय तत्वांवर चिकित्सा करून शोषित भारताचे विदारक चित्र जगासमोर उभे केले. इंग्रजींनी या देशाचे जे भायनक स्वरूपाचे आर्थिक शोषण केले होते त्याची जाणीव दादाभाईंनी आम्हाला करून दिली. रानड्यांच्याही पूर्वी महाराष्ट्रात विष्णुबोवा ब्रह्मचा-यांनी आर्थिक प्रश्नांचा खल केला होता. पण महाराष्ट्रातील सर्व विचारवंतांचे आर्थिक प्रश्नांकडे प्रकर्षाने लक्ष वेधले ते न्यायमूर्ती रानडे यांनी. महाराष्ट्राच् सांस्कृतिक प्रबोधनामध्ये रानड्यांचे फार मोठे योगदान आहे. मराठी साहित्यालाही त्यांनी व्यासपीठ तयार करून दिले होते याची आपल्याला कल्पना असेलच. ज्या विचारांचा किंवा सुधारणांचा त्यांनी आयुष्यभर पाठपुरावा केला त्या प्रत्यक्षतः त्यांना अमलात आणता आल्या नाहीत ही गोष्ट खरी असली तरी त्यांचे विचार सामाजिक प्रबोधनाला चालना देणारेच होते.

न्यायमूर्ती रानड्यांची प्रज्ञा प्रगल्भ आणि वार समतोल होते. त्यांनी विविध संस्थामध्ये दुवा साधण्याचा प्रयत्न केला. जे चांगले दिसेल त्याचे त्यांनी कौतुक केले. त्यांचा वैचारिक वारसा पुढे गोपाळ कृष्ण गोखले यांनी चालविला. रानड्यांप्रमाणे नामदार गोखलेही नेमस्त व उदारमतवादी होते. समाजकारणाच्या प्रेरणा घेऊन त्यांनी राजकारणात पदार्पण केले होते. त्यांची वैचारिक प्रगल्भता त्यांच्या व्यक्तिमत्वाला सातत्याने उजाळा देत राहिली. त्यांचे राजकारण समाजाभिमुख होते. त्यांच्या राजकारणाने सामाजिक संदर्भ सोडले नाहीत, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. राजकारणाने सामाजिक संदर्भ सोडले तर त्याला सामान्य जनतेपर्यंत जाऊन पोहोचता येणार नाही या गोष्टीची नामदार गोखल्यांना चांगलीच कल्पना होती. इतर उदारमतवादी विचारवंतप्रमाणे गोखल्यांचाही भर लोकशिक्षणावर होता. एक आदर्श शिक्षक म्हणून नाव मिळविलेल्या या महापुरुषांने राजकीय क्षेत्रात इतर राजकारण्यांना एक आदर्शच घालून दिला. आजच्या लोक प्रतिनिधींनी, आमदार आणि खासदारांनी गोखल्यांचा आदर्श समोर ठेवला तर भारतातील राजकारणाला नैतिक मूल्यांचे अधिष्ठान मिळेल यात शंका नाही. Servants of India Society  या संस्थेची स्थापना करून गोखल्यांनी राजकारणात सामाजिक आशय घेऊन उतरलेल्या मंडळींना एक आदर्श व प्रभावी असे व्यासपीठ तयार करून दिले. गोखल्यांच्या वैचारिक व राजकीय वारशाने गांधीजींच्या रूपाने आपला अर्थ आणि आशय अभिव्यक्त केला, ही गोष्ट ध्यानात घेतली तर गोखल्यांच्या मोठेपणाचा प्रयत्न आपणास येऊ शकेल.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org