व्याख्यानमाला-१९७९-४३

गेले दोन दिवस आपण महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे टप्पे या विषयावर माझी दोन व्याख्याने ऐकली. गेल्या दीडशेवर्षांमध्ये पाश्चात्य शिक्षणाच्या प्रभावामुळे पाश्चात्य संस्कृतीशी आपला घनिष्ट संबंध आला. पाश्चात्य संस्कृतीबरोबर नवे विचार, नवे आचार आले आपला धर्म आपल्या चालीरीती आपल्यातील जातिप्रधान व्यवस्था, त्यात असलेले दोष, बाल विधवा, जरठ-कुमारी विवाह, विधवा विवाहाचा निषेध, स्त्री शिक्षण वगैरे नवे विचार नव्या शिक्षणाबरोबर आले. सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, बंधुभाव निर्माण व्हावा, स्त्रियांना शिक्षण मिळावं, अस्पृश्यांना उद्धार व्हावा, उच्चनीचपणा नाहीसा व्हावा, माणसामाणसात कोणताही भेद असू नये. या बाबतीत महाराष्ट्रातील आंग्लविद्याविभूषित पुरोगामी विचारवंत आणि कर्ते सुधारक यांनी चळवळी सुरु केल्या. काल व्याख्यानाचा समारोप करतांना सामाजिक क्रांतीच्या पहिल्या टप्प्याला मी 'झुळूक' व दुस-या टप्याला 'झंझावात' असे नाव दिले. आजच्या व्याख्यानात तिस-या व चौथ्या टप्याबद्दलची माहिती मी सांगितली आहे. महात्मा फुल्यांच्या निधनानंतर सामाजिक क्रांतीची मशाल छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या हाती घेतली. आणि सतत २८ वर्षे प्रतिगामी शक्ती व सनातनी व्यक्ती यांच्याशी अखंडपणे झगडा करीत ती तेवत ठेवली. महाराजांनी बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, धार्मिक वर्चस्वातून त्यांची मुक्तता व्हावी, अस्पृश्यता निवारण व्हावे यासाठी हे कार्य करीत असतांना महाराजांच्यावर वृत्तपत्रांतून व सभासंमेलनांतून शिविगाळ करण्याचे, तंबी देण्याचे प्रयत्न झाले. एवढेच नव्हेतर त्यांच्यावर बाँब फेकून ठार मारण्याच्या योजनाही आखल्या होत्या. स्वत:ला देशाचे पुढारी म्हणवणारी मंडळी या कटात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या भाग घेत होती. म्हणून या काळाला मी 'वादळ' असे नावं देतो.

महाराजांच्या मृत्यूनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सामाजिक क्रांतीचे नेतृत्व गेले. त्यांनी हिंदुसमाजाला जागे करण्याचे अनेकवार प्रयत्न केले. परंतु हिंदुसमाजाला डॉ. आंबेडकरांचे महत्त्व अजिबात पटले नाही. डॉ. आंबेडकरांच्याकडे नेतृत्व गेल्यानंतर अस्पृश्य समाज एका बाजूला व स्पृश्य समाज दुस-या बाजूला असा झगडा १९२४ सालापासून ते १९५६ सालअखेर तीव्रतेने चालू होता. सामाजिक समतेची चळवळ करती असता. डॉ. आंबेडकरांना व त्यांच्या अनुयायांना लाठ्यांचा, काठ्यांचा व दगडांचा मार अनेकवेळा खावा लागला. एवढेच नव्हे तर त्यांना जहरी टीकेच्या अग्निदिव्यातून जावे लागले. अखेरपक्षी भारतीय घटनेचा शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव झाला असला तरी सुद्धा म. गांधी सारखे थोर पुढारी त्यांचे विरोधात उभे राहिली म्हणून त्यांनी दिलेल्या लढ्याचे वर्णन करावयाचे झाल्यास त्याला 'तुफान' हीच संज्ञा योग्य ठरेल.

गेल्या दोन व्याख्यानांचा आढावा घेता १८१८ ते १८४८ हा एक कालखंड, बाळशास्त्री जांभेकर त्यांचे प्रतिनिधी, आणि टप्प्याचे नाव 'झुळूक' दुसरा कालखंड १८४८ ते १८९४ या कालखंडाचे प्रतिनिधी म. जोतिबा फुले. फुल्यानी हाती घेतलेले कार्य पहाता त्याला 'झंझावत' ही संज्ञा योग्य ठरेल. वर नमूद केल्याप्रमाणे तिस-या व चौथ्या कालखंडाचे प्रतिनिधित्व अनुक्रमे छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असल्यामुळे या दोघांही थोर पुरुषांना ज्या प्रतिकुल परिस्थितीतून जावे लागले ते पाहिले तर या दोन कालखंडाना अनुक्रमे 'वादळ' आणि 'तुफान' याच संज्ञा सर्वस्वी उचित ठरतील.

उद्या यशवंतरावजी चव्हाण यांचा वाढदिवस आहे. या शुभमंगल प्रसंगी माझी ही दोन व्याख्याने मी त्यांना अर्पण करतो आणि गेले दोन दिवस माझी व्याख्याने तुम्ही शांतपणाने ऐकली याबद्दल आपणा सर्वांचे व मला व्याख्यानासाठी निमंत्रण दिले याबद्दल नगराध्यक्षांचे आभार मानून मी आपली रजा घेतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org