व्याख्यानमाला-१९७९-४२

अपरिमित स्वातंत्र्याला समतेमुळे बाध येतो आणि सदासर्वकाळ समता पहात गेलो तर स्वातंत्र्याला बाध येतो म्हणून दोन्हीवर अंकुश ठेवल्यासाठी बंधुभावाची आत्यंतिक जरुरी आहे. हा बंधुभाव म्हणजे मानवता अशी डॉ. आंबेडकरांची श्रद्धा होती. ज्या धर्मांमध्ये मानवतेला स्थान आहे. व्यक्तिस्वातंत्र्य आहे. संघटना स्वातंत्र्य आहे परंतू अंध:श्रद्धा नाही. अशाप्रकारचा बौद्ध धर्म हा एकमेव धर्म असून हिंदू संस्कृतीशी जुळता-मिळता आहे. बुद्ध धर्म चायना, जपान, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, ब्रह्मदेश, तिबेट, सिलोन या देशांमध्ये गेलेला होता. त्याचा हिंदुस्थानमध्ये शंकराचार्यांच्या आक्रमणामुळे मागमूसही राहिलेला नव्हता. अशा प्रकारचा हा थोर धर्म मी परत हिंदुस्थानात आणला आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे.

डॉ. आंबडेकर यांनी येवल्याच्या सभेत भाषण केले होते की मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि हे शब्द त्यांनी अखेरपक्षी खरे करू दाखविले. कारण बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्यांचं महानिर्वाण झाल आणि अस्पृष्य समाज एका थोर नेत्याला व भारत आपल्या सुपुत्राला मुकला.

आंबेडकरांच्या कालातच सामाजिक क्रांतीसंबंधी आणखी दोन प्रयत्न झाले होते. त्याचाही उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीस नजरकैदेत असताना त्यांनी अस्पृश्यता निवारण्याच्या दृष्टीने धडाडीने काम केले होते. पण त्यांचा हेतू काहीसा राजकीय होता. मोर्ले मिंटो सुधारणांपासून ते १९३५ च्या घटना कायद्यापर्यंत राजकीय हक्कांबाबत लोकसंख्येचे प्रमाण हे महत्वाचे ठरले होते. म्हणून हिंदूंची संख्या जेवढी ज्सास्त त्या प्रमाणात राजकीय हक्क प्राप्त होणार होते. म्हणून मानवतावादी दृष्टीपेक्षा राजकीय दृष्टीनेच सावरकरांनी हे प्रयत्न चालविले होते. असे त्यांच्या बाबतीत म्हणता येईल.

महाराष्ट्रातल्या सामाजिक क्रांतीच्या चळवळीला विचार करता अस्पृश्यांच्या शिवाय आदिवासींची एक जात ठाणे, नाशिक, पुणे, कुलाबा वगैर ठिकाणी आहे. सावकारीखाली पिचलेली कुटुंबाची कुटुंबे या जातीत आहेत त्यांच्या जमिनी सावकारांनी गिळंकृत केलेल्या आहेत. त्यांना घरगडी म्हणून अर्धपोटी जन्मभर सावकारांच्यात काम करावे लागते. या मृतवत झालेल्या समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याची कामगिरी कै. शामराव परुळेकर गोदावरी परुळेकर व कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते यांनी केली आणि वारल्यांनी जो सावकारांच्या, जमीनदारांच्या विरुद्ध जो उठाव केला त्याला सामाजिक चळवळीच्या इतिहासात 'वारल्यांचे बंड' या अर्थाने संबोधले जाते.

डॉ. आंबेडकरांच्या निर्वाणानंतर काही वर्षांनी मुल्ला आणि मौलवी यांच्या कब्ज्यात असलेल्या मुसलमान समाजाला सुधारणेचे वारे लागावे, त्यांच्यात असलेली तलाक पद्धत नाहीशी व्हावी, त्यांना सवतबंदी कायदा लागू करावा या दृष्टीने आणि मुसलमानातील अंधश्रद्धा नाहीशी होऊन भारतनिष्ठा त्यांच्या मध्ये बिंबावी व पाकिस्तानचा ओढा कमी व्हावा या दृष्टीने पै. हमिद दलवाई आणि त्यांचे मोजकेच साथीदार यांनी जे प्रयत्न केले के गौरवास्पद आहेत.

त्याचप्रमाणे डॉ. बाबा आढाव त्यांच्या म. फुले प्रतिष्ठान या संस्थेतर्फे व दलित पॅंथरचे सामाजिक समता निर्माण करण्याच्या दृष्टीने चाललेले प्रयत्न यांच्यासंबंधी विस्तारपूर्वक बोलण्याची इच्छा असूनही त्यांचा गौरवपूर्वक उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org