व्याख्यानमाला-१९७९-२९

सार्वजनिक जीवनात अशा रीतीने डॉ. आंबेडकरांनी प्रवेश केला असला तरी बॅरिस्टरचा कोर्स बडोदा सरकारची स्कॉलरशिप बंद झाल्यामुळे इंग्लंडहून त्यांना मध्येच यावे लागले होते. तेव्हा तो कोर्स पुरा करावा, वकिलीची स्वतंत्र व्यवसाय करुन चरितार्थ चालवावा आणि सामाजिक चळवळीत पडावे असा त्यांचा मानस होता. महाराजांना त्यांनी बॅरिस्टर व्हावे ही कल्पना अतिशय आवडली व त्यासाठी जरूर ते आर्थिक सहाय्य डॉ. आंबेडकरांना देऊन त्यांनी त्यांना इंग्लंडला पाठविले. एवढेच नव्हे तर डॉ. आंबेडकरांच्या गैरहजेरीत त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक कुचंबणा होऊ नये म्हणून डॉ. आंबेडकरांच्या पत्नी कै. रमाबाई यांनाही महाराजांनी आर्थिक मदत केली.
महाराजांच्या बद्दल डॉ. आंबेडकरांना कमालीचा आदर व जिव्हाळा वाटत होता. महाराजांनी सामाजिक समता निर्माण करण्यासाठी बहुजन समाजाच्या चळवळीचे नेतृत्व केलेलं होतं. त्या बद्दल डॉक्टर आंबेडकरांनी इंग्लंडहून पाठविलेल्या एका पत्रामध्ये महाराजांचा गौरव करताना 'सामाजिक लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करणा-या चळवळीचे आपण आधारस्तंभ आहात' अशा आशयाचे उद्गार काढलेले आहेत. ते मूळ वाक्य असे :-

" I hope your Highness is enjoying good health, We need you ever so much for you are the Piller of the great movement towards social democracy which is making its headway in India."

महाराष्ट्र शासनातर्फे लवकरच मी अध्यक्ष असलेल्या संपादक मंडळाच्यावतीने छ. शाहू महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंवर एक इंग्रजी ग्रंथ प्रकाशित करण्याचे ठरविले आहे. या ग्रंथाला काय नाव द्यावे असा प्रश्न आमच्यापुढे उभा होता परंतू शाहू महाराजांच्या चरित्राच्या साधनांचा अभ्यास करीत असता योगायोगाने डॉ. आंबेडकरांचे हे पत्र उपलब्ध झाल्याने आम्ही त्यातील शब्द योजनेचा वापर करुन इंग्रजी पुस्तकाला 'Rajarshi Shahu the Piller of Social Democracy' असे नाव द्यायचे ठरविले आहे. हे पुस्तक लवकरच प्रकाशित होईल.

१९२० साली नागपूर येथे व १९२२ साली दिल्ली येते छ. शाहू महाराजांचे अध्यक्षतेखाली अखिल भारतीय अस्पृश्यांच्या दोन प्रचंड परिषदा झाल्या या दोन्ही वेळेला धेडोंका राजा अशी महाराजांची निर्भत्सना करणारी पत्रके वाटली होती. नागपूरच्या परिषदेच्यावेळी तर महाराजांचे आप्त नागपूरचे लक्ष्मणराव भोसले हे अस्पृश्य अनुयायांसह येणा-या महाराजांचे स्वागत करण्यापेक्षा आपण दूर गेलेलेच बरे म्हणून ते शिकारीस निघून गेले व महाराजांना एक ख्रिश्चन मिशन-याचे बंगल्यात उतरावे लागले. महाराजांनी या दोन्ही परिषदांमध्ये जी भाषणे केली त्या मुळे अस्पृश्य समाजामध्ये नवा जोम, नवा उत्साह, नवी अस्मिता निर्माण झाली. आणि ते महाराजांच्याकडे आपला उद्धारकर्ता या नात्याने पाहू लागले.

महाराजांचा मूळचा पिंड हा मानवतावादी होता. हिंदूसमाज हा जातिभेदानी, वर्णवर्चस्वानी व सामाजिक विषमतेने पोखरलेला आहे. तेव्हा सामाजिक समता निर्माण होणे हे हिंदुसमाजाच्या दृष्टीने व एकूण राष्ट्राच्या दृष्टीने आवश्यक होते. महाराजांनी जातिभेदाचा नायनाट करण्याच्या दृष्टीने कोणी कुठल्याही जातीत जन्माला आलेला असला तरी मनुष्य तेवढा एक हा विचार मनांत आणून अस्पृश्यतेविरुद्ध व ब्राह्मण्याविरुद्ध कडाडून हल्ले केले. माझ्या पेक्षा उच्च कोणी नाही व माझ्या पेक्षा हलकाही कोणी नाही ही उदात्त भूमिका घेऊन महाराज काम करीत होते. परंतू ही भूमिका ज्यांची समाजात मक्तेदारी होती, ज्यांच्या हातात वृत्तपत्रे होती अशा ब्राह्मण समाजाला रूचली नाही. म्हणून स्वत:ला राष्ट्रीय म्हणविणारे मोठे मोठे पुढारी, देशभक्त व क्रांतिकारक यांनी महाराजांची ही भूमिका समजावून घेण्याचा यत्किंचितही प्रयत्न न करता किंवा समजली असली तरी तिचा विपर्यास करुन महाराजांच्यावर विषारी, जहरी आणि विघातक टीका करण्यासाठी आपली लेखणी व वाणी झिजवली.


यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org