व्याख्यानमाला-१९७९-२६

कोल्हापूर संस्थानात अगर संस्थानाबाहेर निरनिराळ्या सभा संमेलनांसाठी वा परिषदांसाठी महाराज जात असत. त्यावेळी जाहीररीत्या ते असपृश्यांच्या हातचे पाणी अगर चहा मुद्दाम मागवून घेत असत. त्यामुळे स्पृश्यसमाजच काय तर अस्पृश्य समाज सुद्धा चकीत होत असे.

महाराजांनी प्राचीन काला पासून चालत आलेली आलुता बलुत्याची पद्धती बंद केली व कुलकर्णी आणि महार वतने नष्ट केली. त्यामुळे एक प्रकारच्या गुलामगिरीच्या गर्तेतून या समाजाला वर काढले. ते स्वतंत्रपणाने आपले व्यवसाय करण्यास मोकळे झाले. कोणाला काय द्यायचे असेल अगर घ्यायचे असेल ते नक्त रकमेतच द्यावे किंवा घ्यावे लागे.

कुलकर्णी व महार वतने महाराजांनी नष्ट केली तरी ही दोन्ही वतने नष्ट करण्यामध्ये महाराजांचे भिन्न दृष्टिकोन होते. कुलकर्णी वतन हे स्वामित्त्वाशी निगडीत होते तर महार वतन हे गुलामगिरीशी निगडीत होते. कुलकर्णी व पाटील ही वतने बहामनी कालापासून चालत आलेली होती. पाटील हा गावचा प्रमुख, त्याचं पहिलं स्थान आणि कुलकर्णी त्यांच्या हाताखाली काम करीत असे. परतू कालाच्या ओघात पाटील अडाणी राहिला आणि कुलकर्णी शिकला-सवरला असल्याकारणाने गावच्या सगळ्या व्यवहारांची इत्यंभूत माहिती फक्त त्यालाच असे. हळू हळू कुलकर्णी यांनी पहिलं स्थान पटकावलं आणि पाटलाला दुय्यम स्थानावर समाधान मानून घ्यावं लागलं. कुलकर्णीपणा बद्दल कुलकर्णी यांना सरकारातून वतनी जमीन दिलेली असे. परंतू कुलकर्णी हा गावातल्या सगळ्यात शहाणा व धूर्त माणूस असल्याने व गावातील सावकारही तोच असल्याने सावकारीचे पोटी, लांड्यालबाडीचे पोटी गोरगरिबांच्या जमिनी व नष्टांशाच्या जमिनी आपल्या नावावर चढवून तो गब्बर झाला होता. पेशवाई मध्ये कुलकर्ण्याला भलतेच महत्त्व प्राप्त झाले होते. शाहू महाराजांचे वेळी कोल्हापूर संस्थानातले कुलकर्णी तर एवढे शेफारून गेले होते की महाराजांच्या सार्वभौमत्त्वाला आव्हान देण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली होती. ही गोष्ट लक्षात घेऊन महाराजांनी कुलकर्णी वतने नष्ट केली, म्हणजे त्यांच्या जमिनी काढून घेतल्या असा एक जाणूनबुजून पसरविलेला प्रवाद आहे. परंतु वस्तुस्थिती अशी होती की कुलकर्ण्यांच्या वतनी जमिनी या रयतावा केल्या; त्या जमिनी त्यांचेकडेच राहू दिल्या. परंतु लांडी-लबाडीने कुलकर्ण्यांनी ज्या जमिनी गिळंकृत केल्या होत्या त्या बद्दल चौकशी कमिशन नेमून अशा जमिनी दरबारने आपल्या ताब्यात घेतल्या तसेच ज्यांच्या फसवून जमिनी बळकावल्या होत्या त्या मूळ मालकांना परत केल्या. आणि कुलकर्ण्यांच्या ठिकाणी बहुजन समाजातील व अस्पृश्य समाजातील नवशिक्षित पिढी तयार झाली होती त्यांच्या तलाठी म्हणून नेमणुका केल्या.

महार वतनाच्या बाबतीत मी वर म्हटल्याप्रमाणे हे वतन गुलाम गिरीशी निगडीत होते. या वतनी जमिनींची विभागणी भाऊबंदामध्ये इतकी झाली होती की वर्षाच्या अखेरीला पीक हाती आल्यानंतर त्याच्या ज्या वाटण्या होत त्या इतक्या लहान असत की पायली, अर्धपायली पर्यंत वर्षाची मिळकत असे. पण या महार वतनदारांना जमिनीचा मोह सुटत नसे. आणि या वतनासाठी समस्त महारांना आळीपाळीने कोतवाल, तराळ, पहारेकरी वगैरे गावकीची कामे उपाशी, अर्धपोटी करावी लागत असत. कधी कधी घरात मुलंबाळ आजारी अतानासुद्धा कोणत्याही प्रकारची दया माया न दाखविता त्याला परगावी धाडले जात असे आणि जनावराप्रमाणे त्याला राबवून घेतले जात असे, ही त्यांची शोचनीय अवस्था पाहून या समाजाला गुलामगिरीतून सोडवायचे झाले तर ह्यांची महार वतने नष्ट केल्याशिवाय गत्यंतर नाही. या निर्णयाप्रत महाराज आले. अशा रीतीने महाराजांनी १९१९ साली एक वटहुकूम काढून ही वतने नष्ट केली म्हणजे रयतावा केली आणि गावकीच्या कामासाठी पगारदार नोकर नेमले. बाकीच्या महारांना आपल्या इच्छेप्रमाणे कोणतेही काम करणेस सर्वांनाच परवानगी दिली.


यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org