व्याख्यानमाला-१९७९-२३

महाराजांनी १९०२ सालचा वटहुकूम काढल्यानंतर कोल्हापूर संस्थानच्या नोकरीत हळूहळू बहुजन समाजाचा व मागासलेल्या वर्गांचा भरणा फार मोठ्या प्रमाणात होऊ लागला. शाहू महाराजांच्या मृत्युच्यावेळी महाराजांनी सुरुवातीला मनाशी बाळगलेली इच्छा बहुतांशी फलद्रुप झाली असे म्हणावयास हरकत नाही. महाराजांनी डोळसपणाने आपल्या राज्यातील ब्राह्मणासह सर्व जातीजमातींना नोक-यामध्ये व राज्यकारभारामध्ये योग्य तो न्याय मिळावा म्हणून प्रयत्न केले. परंतू ब्राह्मण समाज त्यांच्या मक्तेदारीला शह बसल्यामुळे दुखावला गेला. वर्तमानपत्रे त्यांच्याच हाती असल्यामुळे महाराजांचेवर चोहोकडून टीकेचा भडीमार सुरू झाला. पुढ कोल्हापूरात जे वेदोक्त प्रकरण निर्माण झाले त्याचे कारण महाराजांनी बहुजन समाजाच्या व अस्पृश्य समाजाच्या उन्नतीसाठी अवलंबलेले धोरण होते हेच दिसून येईल.

महाराजांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. विद्यार्थी वसतिगृहांची सोय केली. माध्यमिक शाळेत व महाविद्यालयात शिष्यवृत्त्या, नादा-या व अर्धनादा-या दिल्या त्यामुळे महाराष्ट्रातील बहुजन समाजातील होतकरू विद्यार्थी शिक्षण घेणेच्या आशेने कोल्हापूर येथे मोठ्या प्रमाणात येऊ लागले. कोकणपट्टी, विदर्भ, खानदेश, मराठवाडा वगैरे लांबच्या भागातून सुद्धा कोल्हापूर येथे विद्यार्थी आले. कोल्हापूर हे त्यावेळी महाराजांच्या नेतृत्त्वामुळे सत्यशोधक समाजाचे व सामाजिक क्रांतीचे एक शक्तीशाली केंद्र झालेले होते. तेथे बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांच्यावर येथील सामाजिक चळवळीचा खोलवर परिणाम होत असे. आणि शिक्षण संपल्यानंतर असे काही विद्यार्थी कोल्हापूर संस्थानच्या नोकरीत अगर ब्रिटीश सरकारच्या नोकरती जात असत किंवा परत आपापल्या जिल्ह्यांत जाऊन स्वतंत्र व्यवसाय करीत असत. महाराष्ट्रातील सत्यशोधक समाजाची चळवळ विदर्भासह सबंध महाराष्ट्रात फैलावली त्याचे कारण छत्रपती शाहू महाराजांचे महाराष्ट्रातील दौरे हे जसे होते तसेच कोल्हापूर येते शिक्षण घेत असता सामाजिक चळवळीचे संस्कार घेऊन जे विद्यार्थी परत आपल्या गावी जात असत ते तिथे अशा चळवळी सुरू करीत असत.

महाराजांनी कोल्हापूरात व कोल्हापूरबाहेर शिक्षणाचा प्रसार करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असता त्यांनी अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्नही हाती घेतला होता. अस्पृश्यांना कोणी पुढारी नव्हता व कोणी वालीही नव्हता. त्यांची स्थिती फार हलाखीची झालेली होती. म. फुल्यांचे शिवाय त्यांच्याकडे कोणाही कर्त्या पुरुषाचे लक्ष गेले नव्हते. पेशवाईत तर त्यांचे हाल कुत्रा सुद्धा खात नव्हता. अस्पृश्य समाजातील व्यक्तीला सकाळी किवा संध्याकाळी घराबाहेर पडण्यास बंदी असे कारण सकाळी किवा संध्याकाळी माणसाची सावली लांबवर पडत असे. अशी सावली ब्राह्मणांच्या अंगावर घराच्या बाहेर जाण्यास परवानगी असे. कारण सूर्य मध्यानीला आला म्हणजे माणसाची सावली त्याचे पायाखालीच पडते. दुपारी सुद्धा अस्पृश्य माणूस रस्त्याने चालला तर त्याला आपल्या कंबरे भोवती रस्त्यापर्यंत लांब अशी झाडाची फांदी लावून चालावे लागत असे. कारण त्यांच्या पाऊलामुळे विटाळलेला रस्ता त्याची फांदीचा उपयोग झाडून काढण्याकडे होत असे. अस्पृश्यांना सोन्या-चांदीचे दागिने वापरता येत नसत. त्यांना रेशमीवस्त्र वापरायला परवानगी नसे. अस्पृश्यांच्या लग्नात घोड्यावरुन त्यांना वरात काढता येत नसे. ही सारी दयनीय परिस्थिती पाहून म. फुल्यांनी अस्पृश्यांचेसाठी पहिली शाळा काढली. अस्पृश्यांना आपल्या पाण्याच्या हौदावर पाणी भरणेस परवानगी दिली त्यामुळे परिस्थितीत हळू हळू बदल होऊ लागला. म. फुल्यांची ही दूर दृष्टी, अस्पृश्यांच्या बाबतीतील दूरदृष्टी महाराजांनी उचलली व आपल्या संस्थानात अस्पृश्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा काढल्या व अस्पृश्य विद्यार्थ्यांचेसाठी तीन स्वतंत्र वसतिगृहे काढली. प्राथमिक शिक्षण महाराजांनी सक्तीचं आणि मोफत केल्यानंतर अस्पृश्यांच्यासाठी स्वतंत्र काढलेल्या शाळा त्यांनी बंद केल्या व अस्पृश्य मुलांना सरकारी शाळेत इतर स्पृश्य मुलाप्रमाणेच प्रवेश देण्यासंबंधी जाहीरनामा काढला. या जाहीरनाम्यात या मुलांना शिकविण्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा पंक्तिप्रपंच किंवा भेदभाव शिक्षकांनी करु नये अशी त्यांना सक्त ताकीद दिली. त्यामुळे हरिजनांची मुले या शाळांतून बिनबोभाट जाऊ लागली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org