व्याख्यानमाला-१९७९-२२

भाऊराव पाटील यांचे प्रमाणेच कै. भाऊसाहेब हिरे हे नाशिक येथे उदाजी मराठा. बोर्डिंगमध्ये विद्यार्थी म्हणून शिकत असताना महाराजांचेकडून प्रेरणा घेऊन त्यांनी नाशिक व डांग ( गुजरात) जिल्ह्यात शेकडो प्राथ. शाळा व माध्यमिक शाळा काढल्या आहेत. महाराजांनी आणि महाराजांच्या प्रेरणेने सबंध महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार फार मोट्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या समाजकारणावर आणि राजकारणावर फार मोटा परिणाम झाल्याचे दिसून येते.

१८९४ साली महाराजांच्या हातात राज्यसूत्रे आल्यानंतर आणखी एक गोष्टीची त्यांना प्रखरतेने जाणीव झाली. सरकारी नोकरती एकट्या ब्राह्मण जातीचाच भरणा फार मोठ्या प्रमाणात झालेला होता. १८४० सालापासून तो महाराज गादीवर येईपर्यंत कै. बाबासाहेब महाराज, कै. राजाराम महाराज, कै. चौथे शिवाजी महाराज यांच्या अल्पवयस्क कारकिर्दी झाल्या आणि त्यामुळे कोल्हापूर संस्थानच्या राज्यकारभारात ब्रिटिश सरकारचा हस्तक्षेप सुरू झाला. १८४४ साली दाजी पंडित यांची ब्रिटीश सरकारतर्फे कोल्हापूर संस्थानचे कारभारी म्हणून व मेजर ग्रॅहॅम यांची पोलिटिकल सुपरिटेंडेट म्हणून नेमणूक झाली आणि चौथे शिवाजी महाराजांचे वेळी महादेव वासुदेव बर्वे हे कोल्हापूर संस्थानचे कारभारी म्हणून काम करत होते. दाजी पंडितापासून ते महादेव वासुदेव बर्वे यांच्यापर्यंत म्हणजे जवळ जवळ ४० वर्षात कोल्हापूर संस्थानच्या वरीष्ठ श्रेणीच्या नोकरीत युरोपियन आणि पारशी अधिकारी यांच्या नेमणुका झाल्या होत्या व दुय्यम श्रेणीच्या अतिम तत्सम नोक-यामध्ये स्थानिक व बाहेरील ब्राह्मण लोकांचा भरणा फार मोठ्या प्रमाणात झाला होता. एरव्ही संस्थानच्या प्रजाजनांत ३% एवढीच ज्यांची लोकसंख्या होती त्यांनीच संस्थानच्या नोकरीत मात्र ९७% जागा व्यापलेल्या होत्या. ही गोष्ट महाराजांच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही. हीच अवस्था ब्रिटिश हद्दीतही होती. ब्राह्मण समाजाला दोन तीन हजार वर्षापासून विद्येची परंपरा असल्याने आणि विशेषत: पेशवाईच्या काळात सर्व क्षेत्रात त्यांचे प्रभुत्व असल्याकारणाने इंग्रजी राजवट सुरू झाल्यानंतर सुद्धा विद्येबद्दल आस्था असणारा हा एकमेव वर्ग होता. ब्रिटिशांनी पौर्वात्य शिक्षणाला फाटा देऊन पश्चिमात्य शिक्षण पद्धती सुरु केल्यानंतर ब्राह्मण समाजाने संस्कृतकडे पाठ फिरवून इंग्रजी भाषेतील शिक्षणाचे दिशेने वाटचाल सुरू केली. बाकीचा समाज निद्रित होता पण ही एकमेव जात संपूर्णपणाने जागृत होती. शाहू महाराज गादीवर आलें त्यावेळी साक्षरतेचे प्रमाण पाहिले तर ब्राह्मण समाजामध्ये ते सुमारे ८५% असल्याचे दिसून येते. उलटपक्षी बहुजन समाजातील निरनिराळ्या जातीमध्ये हे प्रमाण १% पासून ते जेमतेम १०% पर्यंत जात होते. परंतू बहुजन समाजातील जी काही थोडी फार मंडळी शिकलेली असत त्यांना ब्राह्मण समाजाच्या मक्तेदारीमुळे नोकरीची द्वारे संपूर्णपणे बंद होती. म्हणून शिक्षणाच्या चळवळीला चालना देत असताना महाराजांनी विद्येत मागासलेल्या या समाजाला काही खास संरक्षण दिल्याशिवाय नोकरीत व राज्यकारभारात स्थान मिळणार नाही ही गोष्ट हेरून १९०२ साली इंग्लंडला एडवर्ड बादशहाच्या राज्यभिषेक समारंभाला गेले असता तेथूनच एक वटहुकूम काढून विद्येत मागासलेल्या वर्गांसाठी नोकरीत ५०% जागा राखून ठेवल्याचे जाहीर केले. शेकडा ५०% जागा विद्येत मागासलेल्या लोकांचेसाठी राखून ठेवणारा हिंदुस्थानातील ६०० संस्थानिकांपैकी हा एकमेव संस्थानिक होता. इतर संस्थानिक पराच्या गादीवर लोळण्यामध्ये, चंगी-भंगी जीवन जगण्यामध्ये व ख्याली खुशाली मध्ये आपलं आयुष्य कंठीण होते. अशा प्रकारचं जीवन कठण शाहू महाराजांनाही अवघड नव्हतं. परंतू हा लोकांचा राजा होता. राजदंड ही शोभेची वस्तू नसून ते सेवचे साधन आहे. याची जाणीव ठेवणारा हा राजा होता. राजावाड्यातून महारवाड्यात जाणारा हाच पहिला राजा. महाराज महारवाड्यात गेले ते फॅशन म्हणून गेले नाहीत तर त्या लोकांची दु:खं, अडचणी काय आहेत हे समजावून घेणेसाठी त्यांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्यासाठी गेले. गोरगरीब रंजलेले-गांजलेले, नडलेले, नाडलेले, पिडलेले अशा या सगळ्या लोकांना आपल्या मदतीचा हात देण्यासाठी म्हणून हा राजा महारवाड्यात गेला, खेड्यापाड्यात गेला, जंगलात गेला आणि सामान्यातल्या सामान्य माणसाशी मिळून मिसळून वागण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या वेळचा काळ असा होता की अस्पृश्य समाजाबरोबर जेवण करणं त्यांच्या वस्तीत जाणं, त्यांची झुणकाभाकर खाणं ही गोष्ट पापात गणली जात असे. म्हणून अस्पृश्यासह विद्येत मागासलेल्या सर्व लोकांना खास संरक्षण देण्यासाठी नोकरीमध्ये शेकडा ५०% जागा त्यांना देण्याची व्यवस्था केली अशी व्यवस्था करणारा हा हिंदुस्थानातील पहिलाच राजा होता. त्या नंतर २०-२५ वर्षांनी माँटेग्यू चेम्सफर्ड सुधारणांचा अंमल झाल्यानंतर मुंबई प्रांतात व मद्रास प्रांतात राखीव जागा ठेवण्याचा उपक्रम सुरू झाला. त्यामुळे बहुजन समाज व अस्पृश्य समाज यांना काही प्रमाण नोकरीमध्ये निश्चितपणे प्रवेश मिळत होता. परंतू १९३७ साली काँग्रेसचे खेर मंत्रिमडळ आल्यानंतर गुणवत्तेच्या गोंडस नावाखाली Advanced class, Intermediate class, Backward class साठी राखून ठेवलेल्या जागा कमी केल्या त्यामुळे बहुजन समाजाचे अपरिमित नुकसान झाले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org