व्याख्यानमाला-१९७९-२१

कोल्हापूर संस्थानात ज्याप्रमाणे सर्वांगीण विद्यादानाची महाराजांनी व्यवस्था केली होती. त्याचप्रमाणे कोल्हापूर बाहेर महाराष्ट्रांत बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून पुणे, नगर, नाशिक, नागपूर, पंढरपूर, धारवाड या ठिकाणी विद्यार्थी वसतिगृहे स्थापनेसाठी सढळहाताने मदत केली होती. पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे महाराज तहाह्यात अध्यक्ष होते. महाराजांनी या संस्थेच्या फर्ग्युसन कॉलेजला सुमारे ६० हजार रुपये पर्यंत मदत केली आहे. गोर-गरीब मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी म. फुल्यांचे सहकारी गंगाराम भाऊ मस्के यांनी 'डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी' ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेचे महाराज पेट्रन होते. पुण्याची शिवाजी मराठा सोसायटी व त्या संस्थेने शिवाजी मराठा हायस्कूल, ताराबाई मराठा बोर्डिंग आणि मॉडर्न हायस्कूल या संस्थाना महाराजांनी भरघोस आर्थिक सहाय्य केले होते. नाशिकला उदाजी मराठा बोर्डिंगच्या कोनशिला समारंभासाठी महाराज गेले असता त्या संस्थेला तर महाराजांनी मदत केलीच पण तिथल्या महार समाजाने व वंजारी समाजाने आपापल्या समाजासाठी विद्यार्थी वसतिगृहे काढण्यासाठी महराजांचेकडे मदतीची याचना केली तर महाराजांनी त्यांनाही मदत केली. १९२० साली महाराज अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून नागपूरला गेले असता तेथील अस्पृश्य पुढारी कै. गणेश अक्काजी गवई यांनी आपल्या चोखामेळा बोर्डिंगला भेटा द्यावी म्हणून महाराजांना विनंती केली. महाराजांनी भेट ही दिली आणि या संस्थेला पांच हजाराची मदतही केली. महाराजांचे दत्तक-वडिल चौथे शिवाजी महाराज यांचा नगरला अंत झालेला होता. तिथल्या स्थानिक मंडळीनी त्यांच्या स्मरणार्थ तिथे एक वसतिगृह काढलेले होते या ही संस्थेला महाराजांनी भरपूर आर्थिक सहाय्य केले. सध्या त्या संस्थेतर्फे विद्यार्थी वसतिगृहाशिवाय एक माध्यमिक शाळा, कला वाणिज्य, शास्त्र, विधी महाविद्यालय व टिचर्स ट्रेनिंग कॉलेज अशा संस्था काढल्या आहेत. १९१७ सालच्या सुमाराला महाराज खामगांव येथे मराठा शिक्षण परिषदेचे अध्यक्ष म्हणून गेले होते. त्यावेळी महाराजांचे भाषण ऐकून तिथल्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी 'बेरॉर एज्युकेशन सोसायटी' या नावाची एक संस्था काढलेली होती. त्या सस्थेतर्फे एक हायस्कूल सुरु करण्याचा निर्णय घेतला. महाराजांनी त्या संस्थेला आठ हजार रुपये मदत करतो म्हणून सांगितले. परंतु महाराजांच्या अकाली निधनामुळे ती मदत त्या संस्थेला मिळू शकली नाही. त्यामुळे संस्थाही मोडकळीस आली होती. परंतु विदर्भारच्या राजकारणांत बहुजन समाजातलें तरुण कार्यकर्ते डॉ. पंजाबराव देशमुख यांनी हे हायस्कूल आपल्या ताब्यात घेतले. आणि शाहू महाराजांच्या आठ हजार रुपये मदत देणेच्या अभिवचनाची आठवण महाराजांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांना देऊन त्यांचेकडून तेवढी रक्कम घेतली. या आर्थिक मदतीच्या बळावर बेरॉर एज्युकेशन सोसायटीचे नामांतर शिवाजी एज्युकेशन सोसायटीत केले व शिवाजी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. सध्या विदर्भामध्ये या संस्थेची जवळ जवळ दोनशे हायस्कूल्स, १५-३० महाविद्यालये, अनेक विद्यार्थी वसतिगृहे सुरू करुन डॉ. पंजाबराव देशमुख यांनी या संस्थांचे जाळेच निर्माण केलेले आहे. शिवाजी एज्युकेशन सोसायटी आणि त्या सोसायटीच्या या अनेकविध संस्था याचं उगमस्थान शाहू महाराजांनी खामगांवला केलेलं भाषण आणि त्या भाषणाचेवेळी जाहींर केलेली देणगी होती असं म्हणायला हरकत नाही.

कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराजांचे पट्टशिष्य. महाराजांच्या मृत्युनंतर १९२२ साली त्यांनी महाराजांच्या स्मरणार्थ शाहू विद्यार्थी वसतिगृह या नावाची एक संस्था स्थापन करुन रयत शिक्षण संस्थेचा पाया घातला. म. गांधीनी या वसतिगृहाला भेट दिली. त्यांनी भाऊरावांना विचारलं की शाहू महाराजांनी तुम्हाला किती पैसे दिलेले आहेत? भाऊरावानी सांगितलं की महाराज ह्यात असते तर मला पैशाची ददात पडली नसती. परंतू महाराज दिवंगत झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ मी ही संस्था काढलेली आहे. शाहू महाराजांनी मला जर काही दिलं असेल तर समाजसेवेची दृष्टी दिली आहे आणि महाराजांनी दिलेली ही दृष्टी घेऊन मी खेड्यापाड्यांतील समाजाला शिक्षण देण्याचं व्रत घेतलेलं आहे. शिवाजी एज्युकेशन सोसायटी प्रमाणेच रयत शिक्षण संस्थेचा व्यापही महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांत महाविद्यालये, माध्यमिक शाळा, विद्यार्थी वसतिगृहे, अनाथाश्रम वगैरे काढून चालविला आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org